अर्थविश्व बहरतेय, बोलणे महागतेय...

    दिनांक :21-Apr-2024
Total Views |
अर्थचक्र
- महेश देशपांडे
economic cycle : अर्थनगरीतला ताजा फेरफटका विविध क्षेत्रांमधला आर्थिक विकास अधोरेखित करीत आहे. रिअल इस्टेट क्षेत्राचा दीड लाख डॉलरचा होऊ घातलेला आकार, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेली 13 हजार कोटींची गुंतवणूक, ‘इंडिगो’चे जगातील तिसरी मोठी विमान वाहतूक कंपनी बनणे लक्षवेधी असले, तरी लोकसभा निवडणुकीनंतरही मोबाईलवर बोलणे महाग होणार असल्याचीही चर्चा आहे. वेगाने होत असलेल्या प्रगतीमुळे येत्या काही वर्षांमध्ये रिअल इस्टेट क्षेत्राचा आकार लक्षणीय वाढू शकतो. ‘नाईट फ्रँक’ आणि ‘सीआयआय’च्या अलिकडील अहवालात म्हटले आहे की, भारतीय रिअल इस्टेट क्षेत्राचा आकार पुढील 10 वर्षांमध्ये 1.5 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढू शकतो. ‘नाईट फ्रँक इंडिया’ आणि ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज’ यांनी मिळून ‘इंडियन रिअल इस्टेट - ए डिकेड फ्रॉम नाऊ’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात म्हटले आहे की, 2034 पर्यंत भारतीय रिअल इस्टेट क्षेत्राचा आकार 1.5 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढेल आणि एकूण आर्थिक उत्पादनात त्याचे योगदान 15 टक्के असेल. सध्या भारतीय रिअल इस्टेट क्षेत्राचा आकार सुमारे 482 अब्ज डॉलर आहे आणि आर्थिक उत्पादनात त्याचे योगदान 7.3 टक्के आहे. अहवालानुसार, निवासी आणि कार्यालयीन अशी दोन्ही क्षेत्रे पुढील 10 वर्षांमध्ये भारतीय रिअल इस्टेटच्या वाढीस हातभार लावणार आहेत; मात्र निवासी क्षेत्राचे योगदान कार्यालय क्षेत्रापेक्षा कितीतरी पटीने अधिक असणार आहे. भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रातील निवासी क्षेत्राचे योगदान 906 अब्ज डॉलर्स असेल, तर कार्यालय क्षेत्रात त्याला 125 अब्ज डॉलर्सचे योगदान देईल.
 
 
FDI
 
नाईट फ्रँक म्हणते की, शहरांमध्ये घरांची मागणी येत्या काही वर्षांमध्ये मजबूत राहणार आहे. 2024 ते 2034 दरम्यान शहरांमध्ये 7.8 कोटी नवीन घरांची आवश्यकता असेल. इतर विभागांबद्दल बोलायचे झाल्यास 2034 पर्यंत उत्पादन क्रियाकलापांसाठी वापरल्या जाणार्‍या स्थावर मालमत्तेचा महसूल 28 अब्ज डॉलर्स असेल तर गोदामांचा आकार 8.9 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत अहवालात म्हटले आहे की, परिस्थिती अनुकूल राहिल्यास पुढील 10 वर्षांमध्ये देशाच्या जीडीपीचा आकार सुमारे अडीच पट वाढू शकतो. भारताच्या जीडीपीचा आकार सध्या 3.75 ट्रिलियन डॉलर्स इतका आहे. 2034 पर्यंत हा आकार 10.3 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) भारतात भरपूर पैसा ओतल्याची माहिती आकडेवारीसह समोर आली आहे. एप्रिलच्या पहिल्या 12 दिवसांमध्ये ‘एफपीआय’च्या माध्यमातून 13 हजार 347 कोटी रुपये आले आहेत. ही गुंतवणूक भारतीय समभागांमध्ये करण्यात आली आहे. 2024 मध्ये आतापर्यंत ‘एफपीआय’च्या माध्यमातून 24 हजार 240 कोटी रुपये देशात आले आहेत. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये केलेल्या खरेदीनंतर आता एप्रिलमध्येही हाच ट्रेंड दिसून येत आहे. ‘एफपीआय’ने केलेल्या विक्रीमुळे शेअर बाजार घसरला होता.
 
 
 
economic cycle : आकडेवारीनुसार, ‘एफपीआय’ने फेब्रुवारीमध्ये अंदाजे 1 हजार 539 कोटी रुपयांची आणि मार्चमध्ये 35 हजार 98 कोटी रुपयांची खरेदी केली होती. जानेवारीमध्ये ‘एफपीआय’ने 25 हजार 744 कोटी रुपयांची इक्विटी विकली होती. येथे भारत-मॉरिशस कर कराराचा परिणाम पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्ही. के. विजयकुमार यांनी सांगितले की, भारत आणि मॉरिशस यांच्यातील कर करारामुळे ‘एफपीआय’ने 8 हजार 27 कोटी रुपयांची विक्री केली. हा करार पुढील काळात ‘एफपीआय’ गुंतवणुकीवर परिणाम करीत राहील. मध्य पूर्वेत सुरू असलेला तणाव आणि इस्रायल आणि इराण यांच्यातील संभाव्य युद्धाचा धोका यांचाही ‘एफपीआय’वर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ‘एफपीआय’साठी येणारे दिवस कठीण असू शकतात. तथापि, त्यांनी आशा व्यक्त केली की, ‘एफपीआय’ने पैसे काढले तरी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (डीआयआय) त्याची भरपाई करू शकतात. किरकोळ विक्रेते आणि उच्च नेट वर्थ व्यक्ती (एचएनआय) भारतीय बाजाराच्या वाढीबद्दल आशावादी आहेत. त्यामुळे ‘एफपीआय’च्या विक्रीवर फारसा परिणाम होणार नाही.
 
 
लोकसभा निवडणुकीनंतर सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसू शकतो आणि हा धक्का टेलिकॉम कंपन्या देऊ शकतात, अशी एक बातमी अलिकडेच ऐकायला मिळाली. एका अहवालानुसार जिओ आणि एअरटेलसारख्या दूरसंचार कंपन्या टॅरिफ वाढविण्याचा विचार करीत आहेत. देशातील लोकसभा निवडणुका संपल्यानंतर या कंपन्या मोबाईल दरात कधीही वाढ करण्याची घोषणा करू शकतात. असे झाल्यास जूनमध्ये संपणार्‍या निवडणुकांनंतर लोकांना मोबाईल फोन वापरणे महाग होणार आहे. त्यामुळे दर जास्त वाढू शकतात. ‘अँटिक स्टॉक ब्रोकिंग’ या विश्लेषक संस्थेच्या हवाल्याने ही भीती व्यक्त करण्यात आली आहे. ‘अँटिक स्टॉक ब्रोकिंग’चा विश्वास आहे की, जियो आणि एअरटेलसारख्या मोठ्या टेलिकॉम कंपन्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर आपले प्लॅन्स महाग करू शकतात. निवडणुकीनंतर टेलिकॉम कंपन्या 15 ते 17 टक्क्यांनी दर वाढवू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे. मात्र, मोबाईल कंपन्यांनी याबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.
 
 
economic cycle : अलिकडेच जाहीर आकडेवारीनुसार किरकोळ महागाईचा दर मार्च महिन्यात पाच टक्क्यांच्या खाली आला आहे. देशात जूनपर्यंत निवडणुकांचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. देशात लोकसभा निवडणुकीसाठी पुढील काही आठवडे विविध टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे 2024 चे निकाल जाहीर होतील. यानंतर मोबाईल सेवेचे दर वाढवले जाऊ शकतात. ‘अँटिक स्टॉक ब्रोकिंग’च्या मते दर वाढविल्याने टेलिकॉम कंपन्यांना फायदा होणार आहे. त्यातल्या त्यात भारती एअरटेलला सर्वात मोठा फायदा होऊ शकतो. एअरटेलचा प्रतिवापरकर्ता सरासरी महसूल (एआरपीयू) सध्या 208 रुपये आहे. 2026-27 या आर्थिक वर्षात तो 286 रुपयांपर्यंत वाढू शकतो. रिपोर्टनुसार, जिओ सध्या टेलिकॉम उद्योगातील सर्वात मोठी कंपनी आहे. गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये जिओचा बाजारातील हिस्सा 21.6 टक्क्यांवरून 39.7 टक्क्यांवर पोहोचला आहे.
 
 
याच सुमारास भारताची इंडिगो एअरलाईन मार्केट कॅपच्या बाबतीत जगातील तिसरी सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी बनल्याची बातमी समोर आली आहे. कंपनीचे मार्केट कॅप 17.6 बिलियन डॉलर (सुमारे 1.47 लाख कोटी) पर्यंत पोहोचले आहे. ‘साऊथ वेस्ट एअरलाईन्स’ला मागे टाकत ‘इंडिगो’ने हे स्थान मिळविले आहे. जागतिक विमान कंपन्यांच्या या यादीत अमेरिकास्थित डेल्टा एअरलाईन्स पहिल्या क्रमांकावर आहे. तिचे मार्केट कॅप 30.4 अब्ज डॉलर (सुमारे 2.53 लाख कोटी रुपये) आहे. रेयनियर होल्डिंग्ज 26.5 अब्ज डॉलर (2.16 लाख कोटी रुपये) मार्केट कॅपसह दुसर्‍या स्थानावर आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये इंडिगो मार्केट कॅपच्या बाबतीत जागतिक एअरलाईन्सच्या यादीत 14 व्या क्रमांकावर होती. ‘इंडिगो’ने डिसेंबर 2023 मध्ये ‘युनायटेड एअरलाईन्स’ला तर यावर्षी जानेवारीमध्ये ‘एअर चायना’ला आणि फेब्रुवारीमध्ये ‘सिंगापूर एअरलाईन्स’ला मागे टाकले. कंपनीच्या शेअर्समध्ये सहा महिन्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
 
 
economic cycle : गेल्या एका वर्षात कंपनीच्या समभागांनी 102.55 टक्के परतावा दिला आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये 50.25 टक्के, एका महिन्यात 18.25 टक्के आणि यावर्षी 1 जानेवारीपासून 27.78 टक्के वाढ झाली आहे. 10 मार्च रोजी तो 4.73 टक्के वाढीसह 8,306 रुपयांवर बंद झाला. ‘इंडिगो’ म्हणजेच ‘इंटरग्लोब एव्हिएशन’चे शेअर्स 10 एप्रिल रोजी 4.73 टक्के वाढले आणि 3,806 रुपयांवर बंद झाले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात ‘इंडिगो’चा वाटा 60.2 टक्के आहे. प्रवाशांच्या संख्येच्या बाबतीत ‘एअर इंडिया’ दुसर्‍या स्थानावर आहे. तिचा वाटा 12.2 टक्के आहे. तथापि, टाटा समूहांतर्गत चालणार्‍या विमान कंपन्यांचा एकूण वाटा 28.2 टक्के आहे.
(लेखक आर्थिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)