बुद्धिबळ स्पर्धेत डी. गुकेशने घडविला इतिहास

    दिनांक :22-Apr-2024
Total Views |
- फिडे कॅण्डिडेट्स स्पर्धेवर विजयी मुद्रा
- 40 वर्षांचा विक्रम मोडला

टोरांटो, 
भारताचा 17 वर्षीय ग्रॅण्डमास्टर D. Gukesh डी. गुकेशने फिडे कॅण्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकून इतिहास घडविला आणि जागतिक अजिंक्यपदासाठी तो सर्वांत तरुण आव्हानवीर ठरला. त्याने गॅरी कास्पारोव्हचा 40 वर्षे जुना विक्रम मोडला. गुकेशने 14व्या आणि शेवटच्या फेरीत अमेरिकेच्या हिकारू नाकामुरासोबत सामना बरोबरीत राखला. त्याला या स्पर्धेत 14 पैकी नऊ गुण मिळाले होते. त्यामुळे जागतिक विजेतेपदाचे आव्हान निश्चित होणार होते. चेन्नईचा रहिवासी असलेल्या गुकेशनेही कास्पारोव्हचा विक्रम मोडला. 1984 मध्ये कास्पारोव्ह 22 वर्षांचा होता, तेव्हा त्याने रशियाच्या अनातोली कार्पोव्हला जागतिक विजेतेपदासाठी आव्हान दिले होते.
 
 
PTI04_22_2024_000020A
 
D. Gukesh : गुकेशला बक्षीस म्हणून 88500 युरो (78.5 लाख रुपये) मिळाले. या स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम पाच लाख युरो आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकणारा तो विश्वनाथन् आनंदनंतर दुसरा भारतीय ठरला. गुकेशला विजयासाठी फक्त सामना बरोबरीत राखण्याची गरज होती. दुसरीकडे, कारुआना आणि नेपाम्नियाची यांच्यातील सामनाही अनिर्णीत राहिला. गुकेशने वयाच्या 12 व्या वर्षी ग्रॅण्डमास्टर विजेतेपद पटकावले आणि बुद्धिबळाच्या इतिहासातील तिसरा सर्वांत तरुण ग्रॅण्डमास्टर ठरला. हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्याने रौप्यपदक जिंकले. कारुआना, नेपाम्नियाची आणि नाकामुरा या सर्वांची गुणसंख्या 8 आहे. भारताचा ग्रॅण्डमास्टर आर. प्रज्ञानंदने अझरबैजानच्या निजात अब्बासोव्हचा पराभव करून सात गुणांसह पाचवे स्थान पटकावले.
गुकेशने व्यक्त केला आनंद
विजयानंतर गुकेश म्हणाला, विजयाबद्दल मी आनंदी आहे. मी फॅबियानो कारुआना आणि इयान नेपाम्नियाची यांच्यातील सामना पाहत होतो. यानंतर मी फिरायला गेलो ज्यामुळे मदत झाली.