10 किमीच्या परिसरात धुराचे लोळ, नागरिक त्रस्त

    दिनांक :22-Apr-2024
Total Views |
- गाझीपूर कचरा डेपो आगप्रकरणी गुन्हा दाखल
 
दिल्ली, 
पूर्व दिल्लीतील Ghazipur Garbage Depot गाझीपूर कचरा डेपोला (लँडफिल साईट) रविवारी सायंकाळी आग लागली. या आगीमुळे दहा किमीपर्यंतच्या परिसरात धूर पसरल्याने नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. सोमवारी दुपारपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले नव्हते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
 
PTI04_22_2024_000016A
 
नागरिकांच्या जिवितास नुकसान पोहोचविणे, वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणे व वातावरण तसेच आरोग्यास हानी पोहोचविण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकार्‍याने दिली. अग्निशमन विभागाच्या अधिकार्‍याने सांगितले की, आगीतून निघणारा धूर खूप विषारी आहे. त्यामुळे आग नियंत्रित आणणार्‍या कर्मचार्‍यांना श्वास घेण्यासह डोळ्यालाही त्रास होत आहे. मागील 15 तासांपासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग कशामुळे लागली याची माहिती तपासानंतरच समोर येईल.
केजरीवाल सरकारचा निष्काळजीपणा जबाबदार : भाजपा
या घटनेवर दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले, Ghazipur Garbage Depot गाझीपूर येथील कचरा डेपोला लागलेली आग ही अरविंद केजरीवाल शासित महानगरपालिकेच्या भ‘ष्टाचाराचे उदाहरण आहे. सरकारच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला. आजूबाजूला रहिवासी परिसर असताना कचरा डेपोस परवानगी दिली गेली. येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दिल्ली सरकारचा एकही मंत्री घटनास्थळी गेलेला नाही. यातून लक्षात येते की, सरकार नागरिकांच्या समस्यांप्रती किती बेजबाबदार आहे. भाजपाचे सरकार आल्यास आम्ही कचरा डेपो हटवून दुसरीकडे स्थानांरित करू.
घटनेची चौकशी करू : मंत्री आतिशी
दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी म्हणाल्या की, तापमानवाढीमुळे आग लागल्याची शक्यता आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. भाजपाने याला राजकीय रंग देऊ नये. महापालिकेचे उपमहापौर मोहम्मद इक्बाल यांनी घटनास्थळी भेट दिली.