भुजबळांच्या माघारीनंतरही नाशिकचा गुंता कायम

    दिनांक :22-Apr-2024
Total Views |
- शिवसेना, राकाँच्या वादात भाजपाची पुन्हा उडी
 
नाशिक, 
Nashik LokSabha : नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले. तरीही या मतदारसंघात महायुतीचा तिढा कायम आहे. ही जागा शिवसेनेकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला असतानाच भाजपाने पुन्हा या जागेवर दावा केल्याने नवा पेच निर्माण झाला आहे.
 
 
barne
 
Nashik LokSabha : नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाझे यांनी उमेदवारी घोषित करून तीन आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. दुसरीकडे महायुतीच्या जागा वाटपात नाशिकचा तिढा अजूनही कायम आहे. महायुतीत शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत; तर हा मतदारसंघ भाजपाला मिळावा, अशी मागणी भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे. यासंदर्भात रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाशिकच्या भाजपा पदाधिकार्‍यांनी भेट घेऊन या मतदासंघात भाजपाचा उमेदवार देण्याची मागणी केली आहे.
हेमंत गोडसेंना पक्षातूनच आव्हान
Nashik LokSabha : नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपाचे तीन आमदार आहेत. नाशिक, त्र्यंबकेश्वर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये भाजपाची अधिक ताकद असल्याने ही जागा भाजपालाच सुटावी, अशी मागणी नाशिकच्या भाजपा पदाधिकार्‍यांनी केली आहे. तर, येथील जागेसाठी खासदार हेमंत गोडसे हे इच्छुक असतानाच शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत नाशिक लोकसभेतून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.