वंचितच्या उमेदवाराची माघार, प्रणिती शिंदेचा मार्ग मोकळा

    दिनांक :22-Apr-2024
Total Views |
- गायकवाड यांची पक्षाविरोधात खदखद
 
सोलापूर, 
सोलापूर लोकसभा मतदारसंघात महायुती, महाआघाडी आणि वंचितची तिरंगी लढत होती. अशातच सोमवारी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार Rahul Gaikwad राहुल गायकवाड यांनी अर्ज मागे घेतला. पक्षाने मला युद्धाच्या मैदानात उतरवले. त्यासाठी बंदूक दिली पण त्यात गोळ्याच नसल्याने मी माघार घेत असल्याचे ते म्हणाले.
 
 
Rahul gayakwad
 
Rahul Gaikwad गायकवाड रिंगणातून बाहेर पडल्याने याचा फायदा काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना होणार आहे. स्थानिक कार्यकारणी मदत करणार नाही, हे लक्षात आल्याने त्यांनी माघार घेतली. त्यांच्या या निर्णयामुळे मतदारसंघात निवडणुकीचे गणित बदलणार आहे. भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्या अडचणी वाढणार असून, प्रणिती यांना फायदा होणार असल्याचा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. अर्ज मागे घेतल्यानंतर गायकवाड म्हणाले, माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लक्षात आले की, भोळीभाबडी जनता आंबेडकर या एका नावासाठी भावनिक आहे. पण, चळवळीसाठीची फळी पोकळ आहे. ही फळी मला निवडून आणण्यासाठी पोषक नाही.
माझ्यासाठी लढणारे कार्यकर्तेच नाही
गायकवाड म्हणाले, मी गेल्या 15 दिवसांत खूप काही अनुभवले. पक्षाच्या कार्यकारिणीचा स्वार्थ आजही तेवढाच घट्ट आहे. तिथे मला बाबासाहेबांचे स्वप्न दिसत नाही. मी सोलापूरच्या मैदानात लढण्यासाठी उतरलो होतो, पण माझ्यासाठी लढणारे कार्यकर्तेच नसल्याचे पाहून मी मैदान सोडले. मी अर्धवट लढलो तर भाजपाला मदत केल्यासारखे होईल.