‘त्या’ न्यायाधीशाला कामावर घेण्यास हायकोर्टाचा नकार

    दिनांक :23-Apr-2024
Total Views |
- न्यायपालिकेवर परिणाम करणारे वर्तन करू नये
 
मुंबई, 
Bombay High Court : मद्यधुंद अवस्थेत न्यायालयात येण्याचा आरोप असलेल्या दिवाणी न्यायाधीशाला पुन्हा कामावर घेण्यास नकार देताना, न्यायाधीशांनी सन्मानाने वागले पाहिजे आणि न्यायपालिकेच्या प्रतिमेला हानी पोहोचेल असे वर्तन करू नये, असे मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. अनिरुद्ध पाठक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कथित अयोग्य वर्तनामुळे आणि अनेक वेळा मद्यधुंद अवस्थेत न्यायालयात आल्यामुळे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभागाच्या पदावरून काढून टाकण्याच्या निर्णयाला आव्हान दिले. पाठक यांना विधी व न्याय विभागाने जानेवारी 2022 न्यायिक सेवेतून काढून टाकले होते.
 
 
Bombay High Court
 
Bombay High Court : या आदेशाला त्यांनी आव्हान दिले होते. नंदुरबारच्या प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी अहवाल सादर केल्यानंतर हा आदेश देण्यात आला. निष्कासनाचा आदेश विकृत वाटत नाही किंवा कोणताही विचार न करता देण्यात आला, असेही वाटत नसल्याचे न्या. ए. एस. चांदूरकर आणि न्या. जे. एस. जैन यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळताना सांगितले. न्यायाधीश आणि न्यायिक अधिकार्‍यांनी सन्मानाने वागले पाहिजे आणि न्यायपालिकेच्या प्रतिमेला बाधा पोहोचेल किंवा न्यायिक अधिकार्‍यासाठी अशोभनीय असे वर्तन करू नये, हा सर्वमान्य नियम आहे, असे न्यायालयाने म्हटले. पाठक यांची मार्च 2010 मध्ये दिवाणी न्यायाधीश ज्युनियर डिव्हिजन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांची बडतर्फी होईपर्यंत त्यांची विविध जिल्ह्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली होती.