मतदान कमी झाल्याचा निव्वळ बागुलबुआ!

    दिनांक :23-Apr-2024
Total Views |
- नागेश दाचेवार
 
मुंबई, 
Lok Sabha Elections : पहिल्या टप्प्यात पार पडलेल्या 102 मतदारसंघातील निवडणुकीत विदर्भातील पाच मतदारसंघांचा समावेश होता. या पाचही मतदारसंघांत मतदान कमी झाल्याची ओरड सुरू झाली. मात्र, मतदान कमी झाल्याचा हा निव्वळ बागुलबुआ असून, मागील वर्षीच्या तुलनेत मतदानात वाढ झाल्याचे प्रत्यक्ष आकड्यांवरुन स्पष्ट होते.
 
 
Lok Sabha Elections
 
18 व्या लोकसभेसाठीच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 102 मतदारसंघात मतदान नुकतेच पार पडले. 102 मतदारसंघात महाराष्ट्राच्या विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि भंडारा-गोंदिया या पाच मतदारसंघांचा समावेश होता. या पाचही लोकसभा क्षेत्रातील नागरिकांनी मतदानाकडे पाठफिरवली आणि मतदान कमी झाल्याचा कांगावा विविध समाज माध्यमे, प्रसार माध्यमे करू लागल्याचे पहायाला मिळत आहे. यांचे ऐकून, पाहून नागरिकांमध्येदेखील या चर्चेला सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अंतिम आकडेवारीवर नजर टाकली, तर मतदान कमी झाल्याचा सगळा बागुलबुआ असल्याचे निदर्शनास येते.
 
 
मागील लोकसभा निवडणुकीत पाच मतदारसंघांतील आकडेवारीची तुलना केली तर, केवळ भंडारा-गोंदिया मतदारसंघ वगळता अन्य चारही मतदारसंघांत मतदान वाढले असल्याचे निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीवरून दिसते. भंडारा-गोंदिया मतदारसंघात 2019 मध्ये 12 लाख 46 हजार 543 इतके मतदान झाले होते. यावेळी 10 लाख 25 हजार 446 एवढेच मतदान झाले असून, 2 लाख 21 हजार 97 एवढे मतदान कमी झाल्याचे दिसत आहे.
 
 
Lok Sabha Elections : मुळात टक्केवारीच्या आधारावर मतदान कमी झाल्याचा अंदाज वर्तविल्या जात असल्याने हा घोळ होत आहे. प्रत्यक्षात 2019 मध्ये नोंदणीकृत मतदार कमी होते. त्यातुलनेत झालेल्या मतदानाची टक्केवारी ही सहाजिकच जास्त निघाली. यावेळी नोंदणीकृत मतदारांच्या सं‘येत मोठी वाढ झाली. त्यातुलनेत मतदान झाले नाही. 2019 मध्ये झालेल्या मतदानात केवळ एक-दोन लाख मतदान जास्त झाले आहे. बरं, या पाच मतदारसंघापैकी नागपूर 0.64 टक्के आणि गडचिरोली-चिमूर 0.45 टक्के एवढी एकटक्यांपेक्षा कमी झालेली असून, चंद्रपूरच्या टक्केवारीतर 3 टक्क्यांनी वाढ आहे. असे असताना केवळ नोंदणीकृत मतदारांच्या आकड्यावरून टक्केवारी काढल्या गेल्याने मतदान कमी झाल्याचे चित्र उभे केले जात आहे.
2019, 2024 मध्ये झालेली या पाच मतदारसंघांतील आकडेवारी
 
मतदारसंघ       मतदान 2019       टक्केवारी मतदान 2024       टक्केवारी
नागपूर             11,87,215             54.94 12,07,344                54.30
चंद्रपूर             12,39,486             64.89 12,41,952                  67.57
गडचिरोली-चिमूर 11,42,698         72.33 11,62,434                   71.88
भंडारा-गोंदिया 12,46,543             68.81 10,25,446                   67.04
रामटेक          11,97,805                62.30 12,20,844                61.00