राजीवप्रताप रुडी विजयाची हॅट्ट्रिक करणार का?

    दिनांक :23-Apr-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
Rajeev Pratap Rudy : सारण हा तसा कोणत्याही एका पक्षाचा बालेकिल्ला राहिला नाही. 1957 मध्ये प्रजासमाजवादी पक्षाचे राजेंद्रसिंह येथून विजयी झाले. 1962, 1967 आणि 1971 मध्ये काँग्रेसचे रामशेखर प्रसाद सिंह सलग तीनवेळा या मतदारसंघातून जिंकले. 1977 मध्ये आणिबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत जनता पक्षाचे उमेदवार म्हणून लालूप्रसाद यादव निवडून आले. 1980 मध्ये जनता पक्षाचे सत्यदेवसिंह आणि आणि 1984 मध्ये रामबहादूरसिंह विजयी झाले. 1989 मध्ये जनता दलातर्फे लालूप्रसाद यादव यांनी या मतदारसंघातून दुसर्‍यांदा विजय मिळवला. 1991 मध्ये जनता दलाचेच लालबाबू राय निवडून आले.
 
 
Rajeev Pratap Rudy
 
1996 मध्ये भाजपाने या मतादरसंघात पहिल्यांदा आपले खाते उघडले. Rajeev Pratap Rudy राजीवप्रताप रुडी येथून विजयी झाले. 1998 मध्ये राजदचे हिरालाल राय यांनी रुडी यांचा पराभव केला. 1999 मध्ये पुन्हा रुडी यांनी हा मतदारसंघ भाजपाकडे खेचून आणला. 2004 मध्ये लालू यादव यांनी या मतदारसंघातून तिसर्‍यांदा आणि 2009 मध्ये चौथ्यांदा विजय मिळवला. 2014 आणि 2019 मध्ये राजीवप्रताप रुडी या मतदारसंघातून निवडून आले. विशेष म्हणजे, लालूप्रसाद यादव आणि राजीवप्रताप रुडी छपरा आणि सारन मतदारसंघातून प्रत्येकी चारवेळा लोकसभेवर निवडून आले. 1977, 1989, 2004 आणि 2009 मध्ये लालू यादव, तर 1996, 1999, 2014 आणि 2019 मध्ये रुडी विजयी झाले. या मतदारसंघात लालूप्रसादांनी रुडींना पराभूत केले; मात्र रुडी लालू यादवांना कधी पराभूत करू शकले नाही.
 
 
 
रोहिणी आचार्य Rajeev Pratap Rudy राजीवप्रताप रुडी यांच्यावर हल्ला चढवत असल्या, तरी रुडी मात्र त्यांच्यावर टीका करीत नाही. माझी लढाई लालूप्रसादांशी आहे, असे ते म्हणत आहेत. लालूांच्या राजवटीतील जंगलराजची ते जनतेला आठवण करून देतात. लालूप्रसादांना या मतदारसंघात दुसरा उमेदवार मिळत नाही, त्यामुळे ते कधी आपल्या पत्नीला उभे करतात, कधी व्याह्याला तर कधी मुलीला उमेदवारी देतात, असा रुडी यांचा आरोप आहे. आपल्या वडिलांना किडनी दिल्यामुळे रोहिणी यादव यांच्याबद्दल मतदारसंघातील लोकांत एक प्रकारची आपुलकी आहे; मात्र ही आपुलकी मतांमध्ये परिवर्तित होईल की रुडी विजयाची हॅट्ट्रिक करतील, याचे उत्तर 4 जूनच्या मतमोजणीनंतरच मिळणार आहे.