अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात कुणाचे पारडे जड?

निवडणुकीनंतरचे विश्‍लेषण

    दिनांक :24-Apr-2024
Total Views |
अर्जुनी मोरगाव, 
Arjuni Morgaon Assembly Constituency : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील 18 उमेदवारांचे भाग्य 19 एप्रिल रोजी मशिनबंद झाले. 4 जूनला निकाल जाहीर होणार असला तरी, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात कुणाचे पारडे जड राहिले, याबद्दल चर्चा रंगू लागल्या आहेत.
 
 
arjuni
 
या लोकसभा क्षेत्रात नक्षलप्रभावित अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव व गोरेगाव तालुक्यातील काही गांवे जोडून हे विधानसभा क्षेत्र आहे. मतदान टक्केवारीत हा विधानसभा क्षेत्र जिल्ह्यात आघाडीवर आहे. या विधानसभा क्षेत्रात 1,27,089 पुरुष व 1,26,853 महिला मतदार असे एकूण 2,53,942 मतदार आहे. यातील 91,199 पुरुष व 88,765 महिला अशा 1,79,964 मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी 70.87 आहे. या क्षेत्रात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे व महाविकास आघाडीचे डॉ. प्रशांत पडोळे यांच्यात मुख्य लढत पहायला मिळाली. सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय ते स्थानिक पातळीवरील नेते, पदाधिकार्‍यांसह महायुतीच्या कार्यकर्त्यांची फौज असल्याने त्यांना विजयाची खात्री आहे.
 
 
 
तर डॉ. पडोळे यांच्या प्रचारार्थ रोहित पवार यांची प्रचारसभा व नाना पटोले यांनी मतदारसंघ पिंजून काढला असून ते देखील नागरिक महाविकास आघाडीला कौल देतील याची खात्री देत आहेत. मतदानानंतर आता विजयाचे गणित मांडले जात आहे. दोन्ही उमेदवारांमध्ये चुरस असली तरी जयपराजयाचे गणित मांडताना निवडणूक रिंगणात असलेल्या वंचित, बसपा व अपक्ष उमेदवार सेवक वाघाये यांचे मताधिक्यही महत्व ठेवणार आहे. या तीन उमेदवारांचे मताधिक्य वाढले तर याचे सर्वाधिक नुकसान महाविकास आघाडीचे प्रशांत पडोळे यांचे होणार असून या मताधिक्याचा लाभ महायुतीचे सुनील मेंढे यांना होवून ते विजयी ठरतील अशा चर्चा आहेत. त्यामुळेया तिन्ही उमेदवारांचे मताधिक्य किती वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात कुणाचे पारडे जड ठरणार याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. कारण या लोकसभा निवडणुकीतील जयपराजयावर आगामी विधानसभा निवडणुकीचे समीकरण अवलंबून राहू शकते, अशी जाणकारांमध्ये चर्चा आहे.