छत्तीसगडमधील अकराही जागा जिंकण्याचा भाजपाचा विश्वास

24 Apr 2024 19:22:10
नवी दिल्ली, 
Chhattisgarh-BJP : नक्षलप्रभावित छत्तीसगडमध्ये लोकसभेच्या 11 जागांसाठी तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात बस्तरमध्ये 19 एप्रिलला मतदान झाले. दुसर्‍या टप्प्यात राजनांदगाव, महासमूंद आणि कांकेर या तीन मतदारसंघात मतदान होणार आहे, तर तिसर्‍या आणि राज्यातील अंतिम टप्प्यात रायपूर, रायगड, द्रुग, सरगुजा, कोरबा, जांजगिर चंपा आणि बिलासपूरसह सात लोकसभा मतदारसंघात 7 मेला मतदान होणार आहे.
 
 
bjp
 
2023 मध्ये राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करीत भाजपाला बहुमत मिळाले. विष्णुदेव साय मुख्यमंत्री झाले. त्यामुळे यावेळी राज्यात भाजपाचा आत्मविश्वास वाढला आहे. तर, विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि गटबाजीमुळे काँग्रेस पक्षाने आत्मविश्वास गमावलेला आहे.
 
 
Chhattisgarh-BJP : राज्यातील लोकसभेच्या 11 पैकी 4 जागा अनुसूचित जमातीच्या, तर एक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने 11 पैकी नऊ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला फक्त दोन जागा मिळाल्या होत्या. बस्तर आणि कोरबा वगळता उर्वरित 9 जागा भाजपाने जिंकल्या होत्या. भाजपाला त्यावेळी 50.70 टक्के, तर काँग्रेसला 40.90 मते मिळाली होती. यावेळी भाजपाने 11 जागा जिंकण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे, निवडणूकपूर्व सर्व सर्वेक्षणांत भाजपाला नऊ ते दहा जागा दाखवण्यात आल्या आहेत.
 
 
Chhattisgarh-BJP : भाजपा आणि काँग्रेस यांच्यात सरळ लढत होत असून, दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना राज्यात पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकींमध्ये 29 नक्षलवादी मारले गेले होते. मात्र, यानंतरही बस्तरसारख्या नक्षलप्रभावित भागात 64 टक्के मतदान झाले. यामुळे नक्षलवाद्यांचा दबाव झुगारण्याचा निर्धार राज्यातील मतदारांनी केल्याचे दिसून आले. छत्तीसगडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रचारसभा घेतल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0