बुधा वदति जयंत्युत्सवः, मेधा वदति जन्मोत्सव।

    दिनांक :24-Apr-2024
Total Views |
धर्म-संस्कृती
- प्रा. दिलीप जोशी
चैत्री पौर्णिमेला Hanuman Jayanti हनुमान जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. हनुमंतरायांचा जन्म त्रेता युगात चित्रा नक्षत्रावर चैत्र पौर्णिमेला सकाळी 6.03 वाजता झाला. भारतीय कालगणनेनुसार हनुमंतरायांच्या जन्माला साधारण 1 कोटी 85 लक्ष 58 हजार 113 वर्षे झाल्याचे मानले जाते. इतक्यात काही वर्षांत दरवर्षीच हनुमान जयंती आली की ‘हनुमान जयंती नाही तर हनुमान जन्मोत्सव म्हणा’ असे विचार माध्यमांवर येतात. त्यावर चर्वितचर्वण होते. अनेक जण कुठलाही तार्किक विचार न करता सवयीप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर तो मुद्दा सर्वत्र बिनधास्त प्रसारित (फॉरवर्ड) करतात. त्यामुळे मुद्दे बिंबविण्यात बर्‍याच अंशी सफलताही मिळते. ‘जयंती नव्हे जन्मोत्सव’ सांगणारे हा तर्क देतात की जयंती मृत व्यक्तीची किंवा मृत महापुरुषांची केली जाते. भगवान हनुमान हे चिरंजीव आहेत. त्यामुळे त्यांचा मृत्यू झालाच नाही. म्हणून हनुमंतरायाचा जन्मदिवस हा जयंती म्हणू नका तर जन्मोत्सव म्हणा, असे प्रतिपादन त्यांच्याकडून केले जाते.
 
 
Hanumanji
 
याउलट जन्मोत्सव हा केवळ शब्दच्छल असून हिंदू धर्मीयांना संभ्रमात टाकण्याची कृती आहे. अनेको वर्षांपासून अनेको देवदेवतांची जयंती साजरी केली जाते. त्यात चिरंजीव देवताही येतात. याशिवाय प्रत्येक जन्म उत्सवाची सांगता पारण्याने होत असते. जन्मोत्सवाचे पारणे योग्य वाटत नसून पारणे जयंतीचेच सयुक्तिक वाटते. म्हणून हा बुद्धिभेद आणि वृथा वाद असल्याने ‘हनुमान जयंतीच म्हणा’ असे एक मत आहे.
हिंदू धर्मात सप्त चिरंजीव मानले जातात.
अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमांश्च बिभीषणः।
कृपः परशुरामश्च, सप्तैते चिरजीविनः॥
 
 
Hanuman Jayanti : म्हणजे अश्वत्थामा, बळीराजा, महर्षी व्यास, भगवान हनुमान, बिभीषण, कृपाचार्य आणि भगवान परशुराम हे सात चिरंजीव आहेत. त्यांना मृत्यू आलेलाच नसल्यामुळे त्यांचे अस्तित्व आजही भूतलावर आहे. रामायणातही भगवान हनुमानाच्या मृत्यूचा कुठेच उल्लेख नाही; उलट काही रामायणात हनुमंतराय सीतामातेच्या शोधात अशोक वाटिकेत गेले असता आनंदित होऊन सीतामातेने ‘चिरंजीवी भव’ हा आशीर्वाद दिल्याचे वर्णन आहे. भगवान हनुमान साक्षात रुद्राचे अवतार महारुद्र आहेत. सीतामाईचा आशीर्वाद संधी समजून रामनाम प्रचार-प्रसार करण्याचे ध्येय ठेवून चिरंजीव हनुमानजी भूतलावर आजही कार्य करीत आहेत. अनेकांना याची अनुभूती रामनाम संकीर्तनात येते. म्हणूनच सर्व रामायण कथा-संकीर्तनात हनुमंतरायाचे विशेष आसन मांडले जाते. खरं तर तो परब्रह्म परमात्मा गुणत्रयातीत, अवस्थात्रयातीत, देहत्रयातीत, कालत्रयातीत आहे. हनुमंतादी ही सर्व त्या अरूपाची रूपे आहेत.
 
 
Hanuman Jayanti : ‘नातुडे मुख्य परमात्मा म्हणोनी करावी लागे प्रतिमा’ हे शाश्वत सत्य आहे. तार्किकच विचार करायचा असेल तर आपण भगवान गणेश जयंती, भगवान परशुराम जयंती, भगवान वेदव्यास जयंती, भगवान हनुमान जयंती साजरी करतो. जसे भगवान हनुमान चिरंजीव आहेत तसेच भगवान परशुराम आणि भगवान व्यासही चिरंजीव आहेत. पण अक्षय्य तृतीयेला जन्मोत्सव साजरा करताना आपण ‘परशुराम जयंती’ म्हणूनच मोठ्या धूमधडाक्यात साजरी करतो. चिरंजीव म्हणून स्थान असलेले भगवान व्यास. गुरुपौर्णिमेला व्यास जयंती तर सर्वत्र श्रद्धायुक्त अंतःकरणाने साजरी होते. भगवान गणेशाची जयंती आपण पत्रिका वाटून लोकोत्सव म्हणून साजरी करतो. भगवान गणेश तर साक्षात परब्रह्म स्वरूप जन्म-मृत्यूच्या पलीकडले आहेत. याव्यतिरिक्त भगवान मार्कंडेय जयंती मोठ्या उत्साहात दक्षिण भारतात साजरी होते. ते मार्कंडेयदेखील चिरंजीव मानले जातात.
 
 
याशिवाय कूर्म जयंती, वराह जयंती, नृसिंह जयंती, वामन जयंती, मत्स्य जयंती, कल्की जयंती या देवता अवतारांची जयंती आपण साजरी करतोच. यातील कल्की अवताराचे प्रयोजन तर पुढे आहे. जे जन्मालाही आले नाहीत त्यांचीही जयंती साजरी केली जाते. याशिवाय शनी जयंती, दत्त जयंती, कालभैरव जयंती, नारद जयंती आपण साजरी करतो. ही सर्व त्या निर्गुण निराकाराची सगुण साकार रूपे आहेत. आपण ‘रथ सप्तमी’ म्हणतो ती सूर्य जयंती किंवा अर्क जयंती म्हणूनच अनेक ठिकाणी साजरी होते. सूर्यनारायण भगवान तर प्रत्यक्ष नित्य दर्शन देणारी साकार देवता आहे. हिंदू धर्मात अनसूया जयंती, सरस्वती जयंती, अन्नपूर्णा जयंती, गीता जयंती, नर्मदा जयंती, गायत्री जयंती, लक्ष्मी जयंती, गंगा जयंतीही आपण साजर्‍या करतोच. हे सर्व तर आजही साक्षात आहेत. या देवतांच्या जन्माच्या कथा आहेत, पण त्यांच्या निर्वाण कथा नाहीत किंवा गंगा, नर्मदा यांच्या निर्वाण कथा कशा असतील. तरीही त्यांची जयंती भव्य प्रमाणात साजरी होतेच. यातील दोन-चार नावे सोडली तर इतर सर्वच जयंत्या म्हणून प्रचलित आहेत. असो.
 
 
खरं तर सर्व देवता जन्ममृत्यूच्या पल्याड असून ‘एकोहं बहुस्याम’ परब्रह्म परमात्म्याची ती लीला आहे. माझ्या दृष्टीने जन्मोत्सव आणि जयंती दोन्हीही एकच. Hanuman Jayanti हनुमान जयंती म्हणा किंवा जन्मोत्सव; पण महारुद्र मारुतीरायाची पूजा रोजच करा. निदान हनुमान जयंतीच्या दिवशी तरी श्रद्धेने पूजा नक्कीच करीत राहा. 
हनुमंतरायाची साधना महत्त्वाची; व्यर्थ वाद दुय्यम आहे. अनेक अरिष्ट दूर करणारे संकटमोचक हनुमान आपल्या अर्चनेचा भाग असावा. जयंती-जन्मोत्सव हा वृथा वाद आहे. ‘कलौ कलहः प्रियः’ म्हणजे कलियुगात वृथा वाद प्रिय वाटतो. माणसं पूजा कमी आणि वाद अधिक करतात. पण तो टाळून मथितार्थ महत्त्वाचा समजायला हवा.
थोडक्यात जयंती म्हणा की जन्मोत्सव. यात व्यर्थ वेळ घालविण्यापेक्षा आर्त भावाने त्या परमेश्वराची अर्चना महत्त्वाची. कलियुगात हनुमंतरायाची मनोभावे प्रार्थना निश्चित फलदायी आहे, हे उघड प्रतिज्ञापत्र. जयंती म्हणा की जन्मोत्सव; दोन्हीचा अर्थ आणि फळ सारखेच!
बुधा वदति जयंत्युत्सवः, मेधा वदति जन्मोत्सव।
जन्मदिन इत्येव अर्थंच, द्वयोरपि समं फलं॥
चला तर व्यर्थ वाद टाळूया आणि महारुद्र हनुमान नित्यनेमाने पुजू या...!
 
- 9822262735