अवकाळी पावसाने महाराष्ट्र हैराण

    दिनांक :24-Apr-2024
Total Views |
वेध
गिरीश शेरेकर
Unseasonal rain : मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व एप्रिल महिन्याच्या पहिल्या, दुसर्‍या आणि आता तिसर्‍या आठवड्यातही अवकाळी वादळी पावसाने विदर्भ व उर्वरित महाराष्ट्रात हजेरी लावली. हवामान विभागाने तशी पूर्वसूचना दिली होती. हिवाळा संपताना आणि उन्हाळ्याची सुरुवात होत असताना उत्तर भारत, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात अवकाळी पाऊस दरवर्षी येतो. तो येण्याच्या पाठीमागचे प्रमुख कारण म्हणजे, भारतीय द्वीपकल्पाच्या दोन्ही बाजूने अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर आहे. महाराष्ट्रात या दोन्ही दिशांकडून येणारे वारे वाहत असतात. या वार्‍यांची दिशा वेगवेगळी असते. समुद्राकडून येणार्‍या वार्‍यांमध्ये बाष्प असते. हे वारे उष्ण असतात. हे वारे महाराष्ट्रात वाहात असतानाच उत्तरेकडून थंड आणि कोरडी हवा वाहू लागते. हे दोन्ही परस्परविरोधी वारे एकमेकांशी भिडतात. महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती त्यासाठी अनुकूल असते. त्यामुळे महाराष्ट्रात मार्चमध्ये पाऊस पडतो. यंदा तो एप्रिल महिन्यातही पुन:पुन्हा येत आहे. त्या पाठीमागचे कारणही तेच सांगितले जात आहे. वेगवेगळ्या कारणाने हवामानावर होणार्‍या विपरीत परिणामामुळे वातावरणातला हा बदल दिसतो आहे. पण, अशा बदलामुळे नुकसानीची तीव्रता वाढली आहे. हवामान समतोल राहावे, यासाठी जागतिक पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. पण, आभाळच इतके फाटले आहे की, ठिगळ लावावे कुठे, हा प्रश्न आहे.
 
 
Unseasonal rain
 
Unseasonal rain : गेल्या महिनाभरात दर आठवड्यात आलेल्या वादळी पावसाने एकट्या अमरावती जिल्ह्यात 60 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात गहू, कांदा, मोसंबी, आंबा, संत्रा आदी पिकांचा प्रामुख्याने समावेश आहे. जनावरांचे मृत्यू, घरांची पडझड, वीज खांब पडणे व वाहिन्या तुटणे, झाडे पडणे, असे अनुषंगिक नुकसानही भरपूर झाले आहे. कमी-अधिक प्रमाणात विदर्भातील अन्य जिल्ह्यांमध्येही आणि मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात व अन्य भागात हीच स्थिती आहे. 21 व 22 एप्रिलला पुन्हा अवकाळीचे आगमन झाले. उन्हाची तीव्रता वाढत असतानाच मधात पाऊस येत असल्याने अनेकांना चिंतेत टाकले आहे. अमरावती जिल्ह्यातही हा पाऊस झाला. याशिवाय भंडारा जिल्ह्यातील सिहोरा, तुमसर, साकोली, लाखनी व भंडारा परिसरातल्या पिकांचे पावसामुळे नुकसान झाले. वीज पडल्याने एकाचा मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड व मारेगाव तालुक्यांना अवकाळी पावसाने झोडपले. विजांचा कडकडाट झाला. चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील काही भागांत पाऊस आला. चंद्रपूर-मूल मार्गावरील झाडे पडली. गोंदिया जिल्ह्याला पावसाचा फटका बसला. हे चक्र येथे थांबणारे नाही. हवामान विभागाने जो अंदाज 23 एप्रिल रोजी व्यक्त केला, त्यानुसार वाहणार्‍या उष्ण वार्‍यांमुळे दक्षिण मराठवाडा आणि लगतच्या पश्चिम विदर्भावर चक्रीवादळ चक्राकारपणे फिरते आहे. त्यामुळे 23 ते 26 एप्रिल दरम्यान विखुरलेला हलका व मध्यम पाऊस, वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे. वातावरण उष्ण व दमट राहील. याच काळात पूर्व विदर्भातही पावसाची शक्यता आहे. त्यानंतर महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
 
 
 Unseasonal rain : निसर्गावर झालेल्या अत्याचारातून ही अवकृपा आपल्या वाट्याला आली आहे. तिचा सामना आपल्याला करावाच लागणार आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अवकाळीचे झोडपे पडत असल्याने शेतकर्‍यांसोबतच राजकारण्यांचाही जीव कासाविस होत आहे. आचारसंहिता असली तरी सत्ताधार्‍यांकडेच सर्वांचे लक्ष असते. ते लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्रिद्वय देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी जाहीर सभांमधून सोयाबीन व कापूस उत्पादकांना राहिलेल्या नुकसान भरपाईची हमी दिली आहे. चार हजार कोटी त्यासाठी राखून ठेवल्याचे त्यांनी सांगितले. त्यात आता नव्या नुकसानीची भर पडणार आहे. शेतकर्‍यांना व अन्य नुकसानग्रस्तांना काही द्यायचे म्हटले तरी 4 जूननंतर संपुष्टात येणार्‍या आचारसंहितेनंतरच त्यावर काही निर्णय होण्याची शक्यता आहे. सरकार आपल्यापरीने मदत करेल, पण या चक्रातून सुटका केव्हा होईल, हा खरा प्रश्न आहे. हवामान बदलाची जी स्थिती दिसते आहे, त्यावरून सहजासहजी सुटका होण्याची चिन्हे नाही. शाश्वत उपाययोजना त्याही जागतिक पातळीवर आणि त्याच्या संकल्पपूर्वक अंमलबजावणीतून आश्वासक चित्र भविष्यात पाहायला मिळू शकते. पण, तो लांबचा प्रवास आहे. सध्या जी स्थिती आहे, त्यापेक्षा जास्त विक्राळ स्वरूप वातावरणाचे होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकाने निसर्गाचा समतोल सांभाळण्याला प्राधान्य द्यावे, ही अपेक्षा आहे. 
 
- 9420721225