इंद्रजित गुप्ता सर्वाधिक 11 वेळा लोकसभेचे सदस्य

    दिनांक :25-Apr-2024
Total Views |
दिल्ली वार्तापत्र
- श्यामकांत जहागीरदार
Indrajit Gupta : लोकसभेच्या 102 मतदारसंघांत पहिल्या टप्प्यातील मतदान आटोपले. दुसर्‍या टप्प्यातील 89 मतदारसंघांत शुक्रवार, 26 एप्रिलला मतदान होत आहे. यावेळी एकूण 7 टप्प्यांत म्हणजे 1 जूनपर्यंत लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार असून 4 जूनला मतमोजणी आहे. लोकसभेची ही 18 वी निवडणूक आहे. या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना पहिल्यांदा निवडून येण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत असताना देशात असे अनेक नेते आहेत; ज्यांनी 10-11 वेळा लोकसभेवर निवडून येण्याचा विक्रम नोंदविला आहे.
 
 
Indrajit-Gupta
 
लोकसभेच्या इतिहासात सर्वाधिक म्हणजे 11 वेळा खासदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम काँग्रेस वा भाजपाच्या सदस्याने नाही तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्याने केला आहे. Indrajit Gupta इंद्रजित गुप्ता 1960 ते 2001 या काळात 1977 च्या एका निवडणुकीचा अपवाद वगळता लोकसभेवर 11 वेळा निवडून आले. कोलकाता दक्षिण-पश्चिम, अलिपूर, मिदनापूर आणि बशीरहाट अशा चार वेगवेगळ्या मतदारसंघांतून ते निवडून येत होते. एच. डी. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांच्या मंत्रिमंडळात ते गृहमंत्रीही होते. खासदार असतानाच त्यांचे निधन झाले. गुप्ता एकूण 36 वर्षे लोकसभेचे सदस्य होते. इंद्रजित गुप्ता यांच्या खालोखाल माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी, लोकसभेचे माजी अध्यक्ष माकपाचे सोमनाथ चॅटर्जी तसेच काँग्रेसचे नेते पी. एम. सईद 10 वेळा लोकसभेवर निवडून आले होते. तीन वेळा पंतप्रधानपद भूषविलेले वाजपेयी चार वेगवेगळ्या राज्यांतून लोकसभा निवडणूक जिंकले होते. पहिल्यांदा ते जनसंघातर्फे लोकसभेची निवडणूक जिंकले. त्यानंतर 1977 मध्ये जनता पक्षातर्फे तर 1980 पासून भाजपाचे खासदार म्हणून ते निवडून येत होते. वाजपेयी यांनी सर्वात प्रथम उत्तरप्रदेशच्या बलरामपूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकली.
 
 
1957 ते 1971 या काळात ते बलरामपूरचे खासदार होते. 1971 ते 1977 ग्वाल्हेर, 1977 ते 1984 नवी दिल्ली आणि 1991 ते 2009 या काळात वाजपेयी यांनी लखनौचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले. 1984 च्या निवडणुकीत वाजपेयी यांचा पराभव झाला, अन्यथा सर्वाधिक म्हणजे 11 वेळा लोकसभेचे खासदार होण्याच्या इंद्रजित गुप्ता यांच्या विक्रमाची त्यांनी बरोबरी केली असती. मात्र, सर्वाधिक काळ म्हणजे 12 वेळा संसदेचे सदस्य असल्याचा बहुमान वाजपेयी यांच्या नावावर आहे. त्यांनी 10 वेळा लोकसभेचे तर 2 वेळा राज्यसभेचे सदस्यपद भूषवले. वाजपेयी यांचा विक्रम कोणाला तोडता आला नाही आणि भविष्यात तोडता येईल, असे वाटत नाही. वाजपेयी यांच्या खालोखाल संसदेच्या दोन्ही सभागृहाचे 11 वेळा सदस्य राहण्याचा विक्रम भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या नावावर आहे.
 
 
1971 ते 2009 या काळात माकपाचे सोमनाथ चॅटर्जी 10 वेळा लोकसभेवर निवडून आले होते. पश्चिम बंगालच्या बर्धमान, जाधवपूर आणि बोलपूर मतदारसंघांचे त्यांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केले. भारत-अमेरिका अणुकराराच्या मुद्यावरून संपुआ सरकारविरुद्ध आलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या वेळी अध्यक्ष म्हणून सरकारची बाजू घेतल्यामुळे माकपाने त्यांना पक्षातून निलंबितही केले होते. 1967 ते 2004 या काळात काँग्रेसचे नेते असलेले सईद लक्षद्वीप मतदारसंघातून सलग 10 वेळा लोकसभेत निवडून आले होते.
 
 
Indrajit Gupta : जॉर्ज फर्नांडिस, कमलनाथ, माधवराव शिंदे, गिरीधर गमांग, खगपती प्रधानी हे नेते 9 वेळा लोकसभेवर निवडून आले होते. काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री आणि आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ छिंदवाडा मतदारसंघातून लोकसभेवर 9 वेळा निवडून आले होेते. 1980 मध्ये ते पहिल्यांदा छिंदवाडातून लोकसभेवर निवडून आले. माजी रेल्वे आणि संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस 9 वेळा लोकसभेवर निवडून आले होते. सर्वात प्रथम 1967 मध्ये ते दक्षिण मुंबईतून संयुक्त समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून आले. 1977 ची निवडणूक फर्नांडिस यांनी बिहारच्या मुजफ्फरपूर मतदारसंघातून लढवली आणि जिंकली. या मतदारसंघाचे त्यांनी तीन वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व केले. नंतर बिहारच्या नालंदा मतदारसंघातूनही फर्नांडिस यांनी निवडणूक लढवली. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री माधवराव शिंदे यांनीही 9 वेळा लोकसभेची निवडणूक ग्वाल्हेर मतदारसंघातून जिंकली होती. ओडिशाचे मुख्यमंत्रिपद भूषविलेले गिरीधर गमांग यांनी कोरापूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक 9 वेळा लढवली आणि जिंकली. काँग्रेसचे खगपती प्रधानी यांनी पण ओडिशाच्याच नौरंगपूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक 9 वेळा जिंकली.
 
 
Indrajit Gupta : 93 वर्षांचे समाजवादी पक्षाचे शफीकुर रहमान बर्क 9 वेळा लोकसभेवर निवडून आले होते. नवीन संसद भवनात कामकाज सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात जास्त वयाचे म्हणून शफीकुर रहमान बर्क आणि सर्वात कमी वयाच्या म्हणून चंद्राणी मुर्मू यांच्या नावाचा उल्लेख केला होता. 2019 मध्ये ओडिशातून लोकसभेवर विजयी झाल्या तेव्हा मुर्मू 25 वर्षांच्या होत्या. बर्क 1996 मध्ये पहिल्यांदा मुरादाबाद मतदारसंघातून विजयी झाले होते. 2019 मध्ये खासदार म्हणून शपथ घेताना बर्क यांनी ‘वंदेमातरम्’ म्हणण्यास नकार दिल्यामुळे खळबळ उडाली होती. आठ वेळा लोकसभा निवडणूक जिंकलेले जवळपास अर्धा डझन नेते आहेत. लोजपाचे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान बिहारच्या हाजीपूर मतदारसंघातून आठ वेळा लोकसभेवर निवडून आले. 1977 मध्ये याच मतदारसंघातून देशात सर्वाधिक मतांनी निवडणूक जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन इंदूर लोकसभा मतदारसंघातून आठ वेळा जिंकल्या होत्या. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्या लोकसभेच्या अध्यक्षही होत्या. माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी आतापर्यंत आठ वेळा लोकसभेवर निवडून आल्या आहेत. यावेळी त्या सुलतानपूर लोकसभा मतदारसंघातून नवव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पाच, सहा आणि सात वेळा लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांची संख्या जवळपास शंभरच्या घरात आहे. यात भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि भाजपाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. अडवाणी यांनी आपल्या संसदीय कारकीर्दीची सुरुवात राज्यसभेतून केली. 1970 मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आले. राज्यसभेत ते चार वेळा सदस्य होते, विरोधी पक्षनेतेपदही त्यांनी भूषवले. 1989 मध्ये पहिल्यांदा त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. 2019 पर्यंत सात वेळा अडवाणी लोकसभेवर निवडून आले. म्हणजे अडवाणी चार वेळा राज्यसभेचे तर सात वेळा लोकसभेचे असे 11 वेळा संसदेचे सदस्य होते. यावेळी सुलतानपूरमधून मनेका गांधी निवडून येतील, यात कोणालाही शंका नाही. त्यामुळे यंदा सर्वाधिक म्हणजे 9 वेळा लोकसभेत येणार्‍या खासदार म्हणून त्यांच्या नावाची नोंद होणार आहे. 
 
- 9881717817