प्रदर्शन व समारंभांनी मैदानाची रया घालवली

जुन्या शहरातील सर्वात मोठे मैदान, खेळाडूंचा आधारस्तंभ

    दिनांक :25-Apr-2024
Total Views |
व्यथा उद्याने व मैदानांची 
रेशीमबाग मैदानाची व्यथा
नागपूर,
Reshimbagh Ground जुन्या नागपुरातील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध मैदान म्हणजे रेशीमबाग मैदान हे मैदान आजवर केवळ खेळाडुंचे आश्रयस्थान असल्यामुळे हे मैदान एक आधार होता. अजूनही खेळाडुंसाठी काही भाग राखीव असला तरी प्रदर्शने व समारंभांमुळे या मैदानाची मूळ ओळख आणि रया गेली असल्याचे जाणवते.
 
 
Reshimbagh Ground
 
संपूर्ण रेशीमबाग मैदानाचे तीन भागात विभाजन आहे, आणि त्यावर तीन शैक्षणिक संस्थांचा अधिकार आहे, त्या म्हणजे दादासाहेब धनवटे नगर विद्यालय, सी. पी. अ‍ॅण्ड बेरार शिक्षण संस्था आणि न्यु इंग्लिश शिक्षण संस्था. त्यापैकी दोन्ही बाजू खेळाडुंसाठी वापरात येत आहेत, व त्यावर क्रीकेट अकादमी सुरू आहे. Reshimbagh Ground नियमित क्रीडापटू सरावात गुंतले असतात. तरीही मध्यभागी आणि तुळशीबागेकडील भागातील मैदानात निरनिराळे सभा, समारंभ, सत्संग, सर्कस, प्रदर्शन आदी आयोजने सुरू असतात. त्यामुळे मैदानाच्या मध्यभागात मैदानाची स्थिती खालावलेली दिसते. हे मैदान सरसकट समतल नाही, दुसरे म्हणजे मैदानाच्या काठावर प्रचंड कचरा साचलेला दिसतो. या परिसरातील रहिवासी आणि मैदानाच्या भिंतीच्या कडेला असणारे छोटे दुकानदार आजवर मैदानाच्या आत व्यवसाय करीत होते. पण आता भिंतीचे बांधकाम सुरू झाल्यामुळे दुकाने फुटपाथवर आली आणि कचरा आत पडतोय अशी स्थिती आहे.
 
मुख्य म्हणजे या मैदानाला लागून पाच ते सहा प्रभाग आहेत, म्हणजे मोठ्या संख्येने नगरसेवक अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून मैदानात येतात पण या मैदानाची स्वच्छता ठेवावी असे कुणाच्याही मनात येत नाही, किंवा मनपाचे झोनल अधिकारी देखील स्वच्छतेविषयी गंभीर नाहीत, पर्यायाने अनेक महिन्यांपासून कचरा पडून आहे, कोणता मोठा कार्यक्रम असेल तेवढ्या पुरेत निर्धारित जागा स्वच्छ करतात आणि त्याठिकाणी गोळा झालेला कचरा भिंतीजवळील कोपर्‍यात आणून टाकतात. या मैदानाला प्रवेशद्वार आहेत, काही लहान तर काही मोठी आहेत. Reshimbagh Ground पण संपूर्ण मैदानाला भिंतीचे कुंपण असावे, कुंपणाजवळून हायमास्ट पोलवरील दिवे असावे, एकसमान दरवाजे असावेत, प्रत्येक दोन दिव्यांच्या मध्यभाग एक उंच झाड असावे अशी योजना कुणी आखलेली दिसत नाही. पूर्वी कधी योजना आखली असेल तरी ती प्रत्यक्षात उतरलेली दिसत नाही. सायंकाळनंतर मद्यपी, समाजकंटक, टारगट मुले, गुन्हेगार आदींचा वावर याठिकाणी असतो. रात्री मैदानाची दारे बंद असावी, मैदानात सुरक्षा रक्षक असावे असे कुणालाच वाटत नाही अशी स्थिती आहे. इतर शहरात मैदानांची देखभाल ज्या पद्धतीने ठेवली जाते, त्याची पाहणी एकदा मनपा अधिकार्‍यांनी करण्याची गरज आहे. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे पावसाळ्याचे पाणी मैदानात साचून तलाव होतो. त्यासाठी समतलीकरण आणि पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करण्याची देखील गरज आहे.
 
फुटकळ दुकानांची गर्दी
रेशीमबाग मैदानात केवळ क्रीडा आयोजने होत होती, तोवर मैदानाबाहेर फुटकळ दुकाने नव्हती, आता रेशीमबाग चौकापासून सिरसपेठ चौकापर्यंत मैदानाच्या भिंतीजवळ फुटकळ दुकानांची गर्दी झाली आणि मैदानाच्या काठावर असलेल्या कचर्‍यात या दुकानदारांचे देखील योगदान असल्याचे जावणते. आता भिंतीचे बांधकाम झाल्यावर या भिंती रंगविण्याची गरज आहे. पण या दुकानांमुळे हे रंगकाम कुणालाच दिसणार नाही, हेही तेवढेच खरे आहे.