रामनवमी उत्सवातील हिंसाचाराचा अहवाल द्या

    दिनांक :26-Apr-2024
Total Views |
- उच्च न्यायालयाचा एनआयएला आदेश
 
कोलकाता, 
Calcutta High Court : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात रामनवमी उत्सवादरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणावर दाखल याचिकेवर शुक्रवारी कोलकाता उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी खंडपीठाने राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएला अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.
 
 
Calcutta High Court
 
Calcutta High Court : उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टी. एस. शिवगनानम व न्यायाधीश हिरणमय भट्टचार्य यांच्या न्यायासनाने सुनावणीवेळी हिंसाचार प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यासंदर्भात आक्षेप असल्यास यावर भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. मुर्शिदाबादमध्ये 13 व 17 एप्रिल रोजी झालेल्या हिंसाचारात बॉम्बसह बंदुकीचा वापर करण्यात आला होता. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी केलेल्या कारवाईवर असमाधान व्यक्त करीत विश्व हिंदू परिषद व मुस्लिम राष्ट्रीय मंचने दोन जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. यावर मागील आठवड्यात झालेल्या सुनावणीवेळी पोलिस अधीक्षकांनी कारवाईचा अहवाल सादर केला होता. पोलिसांच्या अहवालावर असमाधान व्यक्त करीत खंडपीठाने आता एनआयएला याप‘करणी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. तसेच 10 मे रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे.