महादेव बेटिंग अ‍ॅपचा भारतातील प्रमुख अटकेत

    दिनांक :26-Apr-2024
Total Views |
- उत्तर प्रदेश एसटीएफने आवळल्या मुसक्या

लखनौ, 
कोट्यवधींच्या घोटाळ्यासह बेकायदेशीर सावकारी प्रकरणात आरोपी असलेला Mahadev Betting App महादेव बेटिंग अ‍ॅपचा भारतातील प्रमुख अभय सिंह व त्याचा साथीदार संजीव सिंह यांना गुरुवारी रात्री उत्तर प्रदेश एसटीएफने लखनौ येथून अटक केली. अ‍ॅपचा सूत्रधार दुबईत पसार झालेला अभिषेक सिंह याचा अभय हा नातेवाईक आहे. आरोपींना शुक‘वारी न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
 
app
 
एसटीएफ अधिकार्‍याने सांगितले की, आरोपी ग्रामीण भागातील नागरिकांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या नावाने सिम कार्ड खरेदी करायचे आणि ते दुबईत अभिषेकडे कुरियर करून पाठवायचे. गेमिंग अ‍ॅपच्या माध्यमातून टेलिग्राम व व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप  बनवून क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, हॉर्स रायडिंग, लुडो, तीन पत्ती व निवडणुकीवर बेकादेशीर ऑनलाईन सट्टा लावला जात होता. तसेच यातून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जायची. प्रकरणाची चौकशी सुरू असताना Mahadev Betting App बेटिंग अ‍ॅपशी संबंधित आरोपीची गोपनीय माहिती मिळाली. त्याआधारे लखनौ येथील एका हॉटेलातून अभय सिंह व संजीव सिंह यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केली असता अभय हा महादेव बेटिंग अ‍ॅपचे भारतातील नेटवर्क सांभाळत असल्याचे समोर आले आहे. तसेच तो अ‍ॅपचा प्रमुख व सध्या दुबईत राहत असलेल्या अभिषेक सिंहचा आतेभाऊ असल्याचे उघडकीस आले आहे.
32 बोगस कंपन्यांची नोंदणी
आरोपी अभय याने ग्रामीण भागातील नागरिकांना 25 हजार रुपये महिना पगार मिळण्याचे आमिष देऊन त्यांच्या नावावर मोबाईल सिम कार्ड खरेदी केले. यामध्ये छत्तीसगडच्या भिलाई येथील चेतन जोशी नावाच्या आरोपीचेही नाव समोर आले आहे. सध्या चेतन दुबईत अभिषेकसोबत असल्याची माहिती समोर आली आहे. ताब्यातील आरोपींना 2021 पासून 32 बोगस कंपन्या बनविल्या होत्या.