- तिघांना अटक, चौथ्याचा शोध सुरू
ठाणे,
IPL Satta : भिवंडीतील एका हॉटेलवर पोलिसांनी छापा मारून आयपीएलवर लोकांकडून सट्टा लावणार्यांच्या टोळीचा पर्दाफाश करून या प्रकरणी छत्तीसगडमधील तीन जणांना अटक केली आहे. 25 एप्रिल रोजी विशेष कृती दल आणि ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी सेलच्या अधिकार्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली होती, अशी माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी शुक‘वारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.
अटक केलेल्या त्रिकुटासोबत भागीदारी करून छत्तीसगडमधून रॅकेट चालवणार्या आणखी एका आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक सध्या सुरू असलेल्या आयपीएल कि‘केट सामन्यांवर सट्टा लावण्यासाठी लोकांना बोलवत होते. त्यानुसार, भिवंडीतील कोनगाव गावात एका हॉटेलवर गुरुवारी संध्याकाळी छापा टाकण्यात आला.
IPL Satta : तीन आरोपी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यावर सट्टा घेताना पकडले गेले. त्यावेळी ते मोबाईल अॅप वापरत होते आणि त्यांनी लोकांकडून एकूण 11,86,811 रुपये गोळा केले होते, असेही शिवराज पाटील यांनी सांगितले. छत्तीसगडमध्ये बसून लोकांकडून सट्टा घेणार्या चौथ्या आरोपीने लोकांकडून 7 लाख 3 हजार रुपये गोळा केले. पकडलेल्या तिघांनी बनावट कागदपत्रे बनवून सिमकार्ड मिळवले होते. छाप्यांदरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून प्रत्येकी 1.97 लाख रुपये किमतीचे 12 मोबाईल, एक टॅबलेट आणि लॅपटॉप जप्त केले आहे. चौथ्या आरोपीला कोरबा येथून पकडण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे.