भारत बुद्धिबळाचे शक्तिकेंद्र!

    दिनांक :27-Apr-2024
Total Views |
वेध
- मिलिंद महाजन
Indian Chess : दक्षिण भारतातील चेन्नईच्या दोन युवा ग्रॅण्डमास्टरने भारताचे नाव जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात उच्च स्तरावर नेले आहे. पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन् आनंद याच्या पावलावर पाऊल ठेवत आर. प्रज्ञानंद व डी. गुकेश यांनी जागतिक बुद्धिबळाच्या पटावर ठसा उमटवला आहे. आधी 18 वर्षीय आर. प्रज्ञानंदने फिडे विश्वचषक 2023 च्या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले आणि आता जगातील निवडक आठ बुद्धिबळपटूंच्या फिडे कॅण्डिडेट स्पर्धेत चेन्नईच्या 17 वर्षीय डी. गुकेशने विजेतेपद पटकावले. उपविजेतेपद मिळवितानाच प्रज्ञानंदने फिडे कॅण्डिडेट स्पर्धेसाठी आपली पात्रता मिळविली, तर गुकेश गतवर्षी डिसेंबरमध्ये चेन्नई ग्रॅण्ड मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकून या कॅण्डिडेट स्पर्धेसाठी पात्र ठरला.
 
 
D.-GUKESH
 
टोरंटोमध्ये 2024 फिडे कॅण्डिडेट बुद्धिबळ स्पर्धेत पदार्पण करणार्‍या पाच भारतीयांपैकी डी. गुकेशने खुल्या विभागात विजेतेपदाचा मान मिळविला. गुकेशने 14 व्या आणि अंतिम फेरीत अमेरिकेच्या हिकारू नाकामुरासोबत सहज बरोबरी साधली व जागतिक विजेतेपदासाठी आव्हान निश्चित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत संभाव्य 14 पैकी 9 गुणांसह विजेतेपदाचा मान मिळविला. या वर्ष अखेर गुकेशचा सर्वोच्च विजेतेपदासाठी विश्वविजेत्या चीनच्या डिंग लिरेनविरुद्ध लढण्यास पात्र ठरला आहे. 17 वर्षीय गुकेशने रशियन बुद्धिबळातील दिग्गज गॅरी कास्पारोव्हने 40 वर्षांपूर्वी केलेला विक्रम मोडीत काढला. हा विक्रम केला तेव्हा कास्पारोव्ह 22 वर्षांचा होता. तेव्हा कास्पारोव्ह 1984 मध्ये देशबांधव अ‍ॅनातोली कार्पोव्हशी टक्कर देण्यासाठी पात्र ठरला; ज्यामुळे तो त्यावेळचा सर्वात युवा आव्हानकर्ता ठरला होता. गुकेशने हा विक्रम मोडल्याबद्दल कास्पारोव्हनेही त्याचे कौतुक केले. कास्पारोव्ह 1985 ते 1993 पर्यंत जगज्जेता राहिला.
 
 
 
अभिनंदन डी. गुकेश! टोरंटोमधील भारतीय भूकंप हा Indian Chess बुद्धिबळ विश्वातील बदलत्या उत्क्रांतीचा कळस आहे. गुकेश व डिंग लिरेन यांच्यादरम्यान विश्वविजेतेपदासाठीच्या लढतीचे आयोजन भारतातच होण्याची शक्यता आहे. ग्रॅण्डमास्टर व पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन् आनंद याने भारतात रुजवलेल्या बुद्धिबळ संस्कृतीची ही फलश्रुती आहे. त्याच्यामुळेच आज भारतात हजारो युवकांसह बहुतेक किशोरवयीन मुले-मुली बुद्धिबळ खेळत आहेत. आज बर्‍याच अव्वल कनिष्ठ खेळाडूंमध्ये चीन व भारतीय बुद्धिबळपटूंचीच नावे आहेत. गुकेशच्या यशामुळे ती आणखी वाढेल. आता डी. गुकेशचे पुढील लक्ष्य जगज्जेतेपद पटकावणे तसेच जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत जास्तीत जास्त काळ प्रथम क्रमांकावर राहणे हे आहे. कास्पारोव्ह 1984 ते 2005 मध्ये नियमित स्पर्धात्मक बुद्धिबळातून निवृत्ती होईपर्यंत एकूण 255 महिने जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर होता. गुकेश विश्वविजेता होण्याच्या समीप आहे व त्यानंतर त्याचे काही वर्षे विश्वक्रमवारीत प्रथम क्रमांकावर राहण्याचे ध्येय असेल. 11 वर्षांचा असल्यापासून गुकेशला प्रसन्ना प्रशिक्षण देत आहे.
 
 
Indian Chess : कॅण्डिडेट स्पर्धेदरम्यान प्रसन्ना दूरध्वनीवरून गुकेशच्या संपर्कात असायचे. त्यांनीच अखेरच्या टप्प्यात गुकेशला धीर दिला. या निकालाची काळजी करू नको. आपल्याकडे अजूनही स्पष्ट संधी आहे. तू केवळ सध्या जसा खेळत आहे, तसाच खेळत राहा, असा सल्ला प्रसन्ना यांनी गुकेशला दिला होता. 14 फेर्‍यांच्या विजेतेपदाच्या स्पर्धेत अखेर गुकेशने बाजी मारली. डी. गुकेशला विश्वनाथन् आनंदसोबत त्यांच्याच निवासस्थानी बुद्धिबळाचा डाव खेळण्याचे भाग्य लाभले. वेस्टब्रिज-आनंद बुद्धिबळ अकादमीमध्ये आनंद गुकेशचा मार्गदर्शकही होता. गुकेश 2017 मध्ये चेन्नई ओपन ग्रॅण्डमास्टर्स स्पर्धेच्या चौथ्या फेरीत गुकेश स्पीड किंग ऑफ इंडिया आर. आर. लक्ष्मणविरुद्ध खेळला. 2018 मध्ये सर्बियामध्ये डी. गुकेशने ग्रॅण्डमास्टर्स राऊंड रॉबिन ऑर्बिज-2 स्पर्धा जिंकली. गुकेशला एसेस व स्पोर्टस्टारच्या ‘बेस्ट यंग अचिव्हर ऑफ द इयर’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मी फिडे कॅण्डिडेट विजेतेपद पटकावल्यामुळे बरेच लोक बुद्धिबळ खेळण्यास प्रेरित होतील व बुद्धिबळाची लोकप्रियता वाढेल, असा विश्वास डी. गुकेशने व्यक्त केला आहे. एकंदरीत आता भारत जागतिक बुद्धिबळाचे शक्तिकेंद्र होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. भारताने विश्वविजेते बुद्धिबळपटू घडविण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे. डी. गुकेश व डिंग लिरेनदरम्यान विश्वविजेतेपदासाठी होणार्‍या लढतीचे आयोजन करण्यासही भारत उत्सुक आहे. 
 
- 7276377318