ब्रिटनमध्ये वाढतोय् इस्लामिक कट्टरतावाद

इराणचे पाठबळ असल्याचे भक्कम पुरावे

    दिनांक :27-Apr-2024
Total Views |
विश्व
- सोनाली मिश्रा
Islamic fundamentalism in Britain : इराण ब्रिटनमध्ये इस्लामिक कट्टरता वाढवत आहे का? एका ब्रिटिश संस्थेच्या अहवालाच्या आधारे हा प्रश्न निर्माण झाला आहे. वस्तुस्थिती ही आहे की अलिकडच्या काळात, ब्रिटनमध्ये इस्लामिक कट्टरतावादाच्या अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये इस्लामचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या कथित अपमानाच्या विरोधातील आंदोलनाला प्रोत्साहन देणे तसेच ‘द लेडी ऑफ द हेवन’ या चित्रपटाला विरोध करणे यासारख्या प्रमुख घटनांचा समावेश आहे. इंग्लंडमधील शाळाबाहेर आणि रस्त्यावर निदर्शने आयोजित करण्यात इराण महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचा स्पष्ट आरोपही ‘यूके पॉलिसी एक्सचेंज’ च्या अहवालात करण्यात आला आहे.
 
 
Iran 4.jpg
 
इस्लाम व प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या कथित अपमानाच्या घटनांचा निषेध करण्यासाठी इंग्लंडमध्ये ठिकठिकाणी निषेध आंदोलनाचे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनांमागे इराणच असून ब्रिटिश मुस्लिमांवर इराणच्या इस्लामिक राजवटीचा प्रभाव आहे, असे यूके पॉलिसी एक्सचेंजने आपल्या अहवालात म्हटले आहे. या घटनांवरून इराणचे ब्रिटनशी वर्तन शत्रुत्वाने भरलेले असल्याचे, अहवालात म्हटले आहे. तसेच ब्रिटन सरकार एकीकडे सायबर सुरक्षेसाठी वचनबद्ध असताना दुसरीकडे इराण हे या क्षेत्रात ब्रिटनसाठी सर्वात मोठे आव्हान असल्याचे सांगण्यात आले आहे. स्कॉटिश फुटीरतावादाला चालना देण्यासाठी इराण कशाप्रकारे बनावट संकेतस्थळांचा वापर करीत आहे याचाही तपशील या अहवालात देण्यात आला आहे.
 
 
Islamic fundamentalism in Britain : या थिंक टँकच्या अहवालात अशा घटनांचाही उल्लेख करण्यात आला आहे ज्यामध्ये ब्रिटिश मुस्लिम समुदायावर इराणचा वाढता प्रभाव दिसून येतो. या अहवालात ब्रिटनमधील शाळांमधील दोन घटनांचा उल्लेेख आहे, ज्यात इस्लाम व प्रेषितांच्या अपमानासंदर्भात निषेध आंदोलन करण्यात आले. या घटनांपैकी पहिली घटना 2021 मध्ये बेटले ग्रामर स्कूलची आहे. बेटले ग्रामर स्कूलमधील एका शिक्षकाला लपून बसावे लागले. कारण त्याने आपल्या विद्यार्थ्यांना मोहम्मद पैगंबरांचे व्यंग्यचित्र दाखविले होते. या घटनेच्या निषेधार्थ जिहादी मुस्लिमांनी आंदोलन केले होते. दुसरी घटना वेकफिल्डमधील एका शाळेत घडली होती. या शाळेतील चार विद्यार्थ्यांना शाळेतून निलंबित करण्यात आले. कारण त्यांच्यापैकी एकावर कुराणाची प्रत फाडल्याचा आरोप होता. यासोबतच इस्लाम धर्माचे प्रेषित मुहम्मद पैगंबर यांची कन्या फातिमा यांच्यावर आधारित चित्रपटाच्या विरोधात झालेल्या आंदोलनाचाही या अहवालात उल्लेख आहे. या चित्रपटाला मुस्लिम देशांनी देखील विरोध केला होता आणि ब्रिटनमध्येही या चित्रपटाला मोठा विरोध झाला होता. रस्त्यावर अशी उघडउघड निदर्शने करणार्‍या मुस्लिमांना इराणचे ‘वैचारिक पाठबळ’ मिळत असल्याचे थिंक टँकच्या अहवालात म्हटले आहे. तसेच इंग्लंडच्या इस्लामिक केंद्राचे (इस्लामिक सेंटर ऑफ इंग्लंड) संचालन इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या प्रतिनिधीद्वारे केले जाते आणि ते युकेमधील इराणच्या ‘अस्तित्वाचे’ मुख्य केंद्र आहे, असा दावाही या अहवालात करण्यात आला आहे. आयसीएल हे केवळ एक धार्मिक केंद्र नाही तर या केंद्राच्या माध्यमातून इराण ब्रिटनमध्ये आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
 

Iran-2 
 
काय म्हणतो ‘पॉलिसी एक्सचेंज अहवाल’?
पॉलिसी एक्स्चेंजच्या अभ्यासात असेही आढळून आले आहे की, इराणकडून ब्रिटनच्या सुरक्षाविषयक तसेच धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक मूल्यांना देखील धोका आहे. किंबहुना, इराण अशा धर्मांध, जिहादी आणि सरकार पुरस्कृत मौलानांना पश्चिम लंडनमध्ये पाठवत आहे, जे ब्रिटनच्या एकता आणि अखंडतेसाठी अतिशय धोकादायक आहेत. पॉलिसी एक्स्चेंजने केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की इराणने ब्रिटनमध्ये राजकीय-धार्मिक संरचना स्थापन करण्यासाठी अनेक दशके मेहनत केली आहे आणि ही धार्मिक संरचना आहे इस्लामिक सेंटर ऑफ इंग्लंड. ही ब्रिटनमधील नोंदणीकृत धर्मादाय संस्था आहे. इराण या केंद्राचा वापर ब्रिटनची मूल्ये नष्ट करण्यासाठी आणि अपवित्र कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आधार म्हणून करतो, असेही पॉलिसी एक्सचेंज तर्फे केलेल्या अध्ययनातून स्पष्ट झाले आहे.
 
 
Islamic fundamentalism in Britain : ‘तेहरान कॉलिंग’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या या अहवालात ब्रिटनमध्ये सर्वत्र पसरणार्‍या इस्लामिक कट्टरतावादाविषयी सविस्तर लिहिले आहे. हा कट्टरवाद ब्रिटनवर दिवसेंदिवस आपली पकड कशी घट्ट करीत आहे, हे देखील या अहवालात तपशीलवार लिहिले आहे. या अहवालाच्या सुरुवातीलाच 1989 मध्ये ब्रिटिश लेखक सलमान रश्दी यांच्याविरुद्ध निघालेला फतवा आणि 2022 मध्ये ‘लेडी ऑफ द हेवन’ या चित्रपटाच्या विरुद्ध झालेल्या आंदोलनाचाही उल्लेख आहे. यासोबतच इराण सरकारवर नाराज व असंतुष्ट असलेल्या व त्या सरकारवर टीका करणार्‍या ब्रिटनमधील इराणी नागरिक आणि पत्रकारांना दिल्या जाणार्‍या धमक्यांचाही या अहवालात उल्लेख आहे.
 
 
पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शविण्यासाठी इंग्लंडमध्ये जी निदर्शने झाली यात इराणसमर्थित आंदोलकांचाही समावेश होता. अप्रत्यक्षपणे या निदर्शनांमध्ये इराणचाही सहभाग होता, असेच म्हणावे लागेल. तसेच इराणला ब्रिटनच्या मूल्यांवर नियंत्रण ठेवून ब्रिटिश नागरिकांना बंधक बनवायचे आहे. इराणला आपले सांस्कृतिक वर्चस्व हवे आहे, असे या अहवालात म्हटले आहे. पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ इंग्लंडमध्ये जी काही निदर्शने झाली त्यामागे इराण आणि इराण समर्थित संघटनांचा मोठा वाटा होता. या अहवालात लंडनमधील अनेक इराणी समर्थक कार्यकर्ते आणि गटांचा उल्लेख आहे जे लंडनच्या रस्त्यावर इस्लामिक देश इराणचे समर्थन करताना दिसतात. असाच एक गट म्हणजे अल हशद अल शबाब मिलिटियाज (पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्स पीएमएफ).
 
 
Islamic fundamentalism in Britain : इस्लामिक सेंटर ऑफ इंग्लंडमध्ये काम करण्यासाठी कोणत्याही इराणी नागरिकाला व्हिसा देऊ नये, अशी शिफारस पॉलिसी एक्सचेंजच्या या अहवालात करण्यात आली आहे. वास्तविक पाहता इस्लामिक सेंटर ऑफ इंग्लंड स्वत:ला शिया धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणवून घेते, ज्यामध्ये एक विश्वस्त इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सर्वोच्च धार्मिक नेतृत्वाचा प्रतिनिधी असेल. आयसीएलमधील इराणी प्रतिनिधित्व लंडनमधील इराणी दूतावासापासून वेगळे आहे, जे इराण सरकारचे अधिकृत प्रतिनिधित्व आहे, असेही या अहवालात नमूद केले आहे.
(पांचजन्यवरून साभार)