कन्नौज हा समाजवादी पक्षाचा गढ

    दिनांक :27-Apr-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
Kannauj LokSabha : कन्नौज लोकसभा मतदारसंघ हा समाजवादी पक्षाचा गढ मानला जातो. या मतदारसंघात झालेल्या 16 लोकसभा निवडणुकांपैकी दहा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे उमेदवार विजयी झाले. त्यातही मुलायमसिंह यादव यांचा परिवार येथून सहावेळा विजयी झाला. काँग्रेस आणि भाजपा उमेदवार येथून प्रत्येकी दोनवेळा विजयी झाले. लोकदल आणि जनता पक्षानेही प्रत्येकी एकवेळा या मतदारसंघातून विजय मिळवला. मात्र बसपाला या मतदारसंघाने कधी साथ दिली नाही.
 
 
Kannauj Lok Sabha
 
1967 मध्ये या मतदारसंघातून सोशालिस्ट पक्षाचे डॉ. राममनोहर लोहिया विजयी झाले होते. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या शीला दीक्षितही या मतदारसंघातून 1984 मध्ये जिंकल्या होत्या. 1996 मध्ये भाजपाचे चंद्रभूषणसिंह या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर 23 वर्षांनी म्हणजे 2019 मध्ये भाजपाचे सुब्रत पाठक या मतदारसंघातून निवडून आले. या मतदारसंघातून तीन वेळा निवडून येण्याचा विक्रम छोटेसिंह यादव आणि अखिलेश यादव या दोन यादवांच्याच नावावर आहे. मात्र, सलग तीन वेळा विजयी होण्याचा बहुमान अखिलेश यादव यांच्या नावावर आहे.
 
 
 
Kannauj LokSabha  : 1980 मध्ये छोटेसिंह यादव जनता पक्षातर्फे विजयी झाले होते. 1989 आणि 1991 मध्ये ते जनता दलातर्फे निवडून आले. अखिलेश यादव 2000, 2004 आणि 2009 असे सलग तीन वेळा जिंकले. 1999 मध्ये मुलायमसिंह यादव यांनी संभल आणि कन्नौज अशा दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि दोन्ही ठिकाणी विजयी झाले होते. नंतर संभल मतदारसंघ आपल्याकडे कायम ठेवत त्यांनी कन्नौजचा राजीनामा दिला होता. या मतदारसंघात नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी आपल्या मुलाला अखिलेश यादवला उतरवले होते. अखिलेश यादव यांच्या राजकीय कारकीर्दीला येथूनच सुरुवात झाली होती. कन्नौज लोकसभा मतदारसंघात येणार्‍या पाच विधानसभा मतदारसंघापैकी चार मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. विशेष म्हणजे, या मतदारसंघातील जातीय समीकरणही वेगळे आहे. या मतदारसंघात यादव, मुस्लिम आणि ब्रा ण मतदार प्रत्येकी 16 टक्के आहे, तर 10 टक्के राजपूत आहे. दलित मतदार 20 टक्के असून, आणि अन्य मतदारांची संख्या 14 टक्के आहे.