आसामचे शिवाजी लाचित बडफुकन

    दिनांक :27-Apr-2024
Total Views |
प्रेरणा
- सोनाली ठेंगडी
Lachit Badphukan : एक काळ असा होता की भारतात सगळीकडे मुघलांची सत्ता होती. उत्तरेमध्ये तर मुघलांनी विशेष सत्ता गाजवली. मात्र, भारतात असेही काही भाग आहेत जिकडे मुघल अनेक प्रयत्न करून सुद्धा सत्ता मिळवू शकले नाहीत. एक असाही वीर योद्धा होता ज्याच्या पराक्रमामुळे दिल्लीच्या सुलतानाला आणि मुघलांना पूर्वोत्तर राज्यांमध्ये विजय मिळाला नाही. आसाम राज्यातील योद्ध्यांनी तब्बल 17 वेळा मुघलांचे आक्रमण परतवून लावले आणि पूर्वोत्तर राज्य अजिंक्य ठेवले. 1600 च्या शतकात मुघल साम्राज्य सत्तेच्या शिखरावर होते. जगातील सर्वांत मोठ्या आणि शक्तिशाली साम्राज्यांपैकी एक होण्याकडे मुघल सत्तेची वाटचाल सुरू होती. सर्वांत मोठे साम्राज्य होण्यासाठी जी शक्तिशाली सेना लागते ती त्या काळी मुघल सत्तेकडे होती. साम, दाम, दंड, भेद या सर्व मार्गांचा अवलंब करून मुघलांनी जवळजवळ सर्व भारत आपल्या अंमलाखाली आणला होता.
 
 
Lachit Badphukan
 
आसामचे राजे जयध्वज आणि मुघल यांच्यात युद्ध झाले आणि त्यात आसामचे सैन्य अर्थात अहोमांचा पराभव झाला. 9 जानेवारी 1663 रोजी मीर जुमलासोबत झालेल्या गिलजारीघाटच्या तहानुसार जयध्वज यांना आपली मुलगी आणि पुतणीला मुघलांच्या हरममध्ये पाठवावे लागले. एक लाख रुपयांसह अनेक क्षेत्र गमवावे लागले. बाकीचे पैसे देईपर्यंत त्यांच्या मंत्र्यांच्या मुलांना बंदी बनवण्यात आले. हा पराभव जिव्हारी लागल्याने आणि अपमानाने जयध्वज कोसळले आणि मृत्यूपूर्वी त्यांनी आपला वारस चक्रध्वज याच्याकडून या अपमानाचा बदला घेण्याची आणि मुघलांना आसाममधून हाकलून देण्याची शपथ घेतली. चक्रध्वज यांनी विखुरलेल्या सैन्याची जमवाजमव केली आणि त्यांनीच Lachit Badphukan लाचित बडफुकन यांना आपला सेनापती बनविण्याचा मोठा निर्णय घेतला.
 
 
कोण होते लाचित?
 राजा प्रताप सिंघा यांच्याकाळात अहोम सैन्याचे सेनापती मोमाई तामुली पहिले ‘बोडबरुआ’ म्हणजेच उत्तर आसामचे राज्यपाल देखील होते. त्यांचा मुलगा लाचित याला त्यांनी लहानपणापासूनच सेना कौशल्य, शास्त्र आणि इतर सर्व प्रकारचे शिक्षण दिले. लाचित यांचे सर्व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना अहोम स्वर्गदेवच्या ध्वज वाहकाचे (सोलधर बरुआ) पद मिळाले. सोलधर बरुआ हे पद खाजगी सचिवाचे होते. आपल्या वडिलांकडून लाचितने राज्य व कर्तव्याप्रती निष्ठा, आपली जबाबदारी कुठल्याही परिस्थितीमध्ये चोख सांभाळणे व प्रामाणिकपणा हे गुण घेतले होते. त्यांनी स्वत:ला युद्धाच्या तयारीमध्ये झोकून दिले. ते कडक शिस्तीचे होते व परिश्रम करणे हा त्यांचा स्थायी भाव होता. त्यांची आपल्या कर्तव्याप्रती अढळ निष्ठा होती. समोर कोणीही असले तरी आपण आपले कर्तव्य करण्यापासून चुकायचे नाही, हा त्यांचा दंडक होता. म्हणूनच युद्धाच्या महत्त्वाच्या प्रसंगी जेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपले काका कर्तव्यात कसूर करीत आहेत तेव्हा त्यांनी स्वत:च्या काकांचा शिरच्छेद केला.
उसे गुमाँ हैं की मेरी उडान कुछ कम हैं
मुझे यकीं है की ये आसमान कुछ कम हैं
 
 
असा बुलंद आशावाद आणि कमालीचे शौर्य, धैर्य त्यांच्या ठायी होते.
 ऑगस्ट 1667 मध्ये Lachit Badphukan लाचित यांच्यासह अटन बुर्‍हागोहैन यांनी गुवाहाटी येथे जाण्यासाठी अहोम सैन्याचे नेतृत्व केले. त्यानंतर त्यांनी नोव्हेंबर 1667 मध्ये इताखुली किल्ला मुघलांकडून काबीज केला आणि मुघल सैन्याला मानसच्या पुढे पिटाळून लावले. त्यांनी फौजदार फिरुज खानला युद्धकैदी म्हणून बंदिस्त केले. डिसेंबर 1667 मध्ये बादशाह औरंगजेबाला मुघल सैन्याच्या पराभवाविषयी समजले. त्याने मोठे सैन्य अहोम सेनेचा पाडाव करण्यासाठी पाठवले. त्यात त्याने इतर सैन्यासोबत 30,000 पायदळ, 21 राजपूत सेनापती आणि त्यांची सेना, 18,000 घोडेस्वार तसेच 2,000 तिरंदाज व नौका पाठवल्या. शिवाय राजा रामसिंहाची स्वत:ची मोठी सेना होतीच!
 
 
अलाबोई येथील पराभवामुळे अहोम सैन्याचे मानसिक खच्चीकरण झाले होते. त्यात मुघलांचे इतके प्रचंड सैन्य पाहून त्यांचा धीर खचला. तेथून पळून जावे असे सैनिकांच्या मनात येऊ लागले. या सगळ्याची कल्पना येताच लाचित यांनी आजारपणातून उठून 7 युद्धनौका समुद्रात सोडण्याचा आदेश दिला व स्वत: या मोहिमेचे सारथ्य करण्यास ते सज्ज झाले. काहीही झाले तरी मातृभूमी सोडून मी कुठेही जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. ‘बाहुबली’ चित्रपटातील अखेरचे दृश्य Lachit Badphukan लाचित यांच्या या प्रेरक प्रसंगावरूनच घेतले आहे. आजारपणातून उठून समोर उभ्या राहिलेल्या आपल्या सेनापतींचा निग्रह पाहून आणि त्यांचे प्रेरणादायी विचार ऐकून अहोम सैनिक परत युद्धासाठी सर्व सामर्थ्यानिशी सज्ज झाले. सर्व सैनिक लाचित यांंच्या बरोबर उभे राहिले आणि सैन्याचा आकडा वाढू लागला.
 
 
ब्रह्मपुत्रा नदीच्या मधोमध लाचित यांनी त्यांच्या नौका आणल्या व मुघल सैन्याचा सामना करण्यास ते सज्ज झाले. अहोम सैन्याच्या नौका लहान होत्या आणि युद्धातील डावपेचात्मक हालचाली करण्यास त्या सक्षम होत्या. याउलट मुघल सैन्याच्या अजस्त्र नौकांच्या हालचालींवर त्यांच्या आकारामुळे मर्यादा होती. मुघल नौका हालचाल करू शकत नसल्याने नदीमध्ये अडकल्या व तुंबळ युद्धामध्ये अहोम सैन्याने मुघल सैन्याचा दणदणीत पराभव केला. मुघल नौसेनाधीपती मुन्नावर खान युद्धात ठार झाला. शिवाय अनेक सैनिक व सेनापती सुद्धा युद्धात ठार झाले. अहोम सैन्याने मुघल सैन्याचा मानसपर्यंत पाठलाग केला. मानस ही अहोम राज्याची पश्चिम सीमा होती. लाचित यांनी आपल्या सैनिकांना मुघलांच्या पलटवाराविषयी सजग राहण्यास बजावले होते.
 
 
हे युद्ध 1671च्या मार्च महिन्यात झाले असा अंदाज आहे. या सैन्यामध्ये Lachit Badphukan लाचित बडफुकन यांनी आपल्या सैन्यासह पराक्रम गाजवून अहोम राज्याचे रक्षण केले. अहोम राज्याचा सन्मान परत मिळवून दिला. परंतु युद्धाच्या परिश्रमांमुळे त्यांची प्रकृती ढासळली. त्या आजारपणातून ते बरे होऊ शकले नाहीत. अखेर एप्रिल 1672 मध्ये लाचित बडफुकन यांनी अखेरचा श्वास घेतला. लाचित यांनी आपल्या कार्यकाळात मुघलांना अनेकवेळा पराभवाचे तोंड पाहायला लावले. एवढेच नव्हे, तर मुघलांच्या ताब्यातील गुवाहाटी सोडवून त्यांना तिथून अक्षरश: पिटाळून लावले. गुवाहाटी मिळविण्यासाठीच्या ऐतिहासिक युद्धाला सराईघाटाचे युद्ध म्हणून ओळखले जाते. या युद्धात मुघलांची ताकद कितीतरी पटीने जास्त होती. तरीही लाचित यांच्या रणनीतीपुढे त्यांचे काहीही चालले नाही.
 
 
आराजा उदायादित्य यांनी लाचित यांची समाधी लाचित मैदान हुलुंगपारा, जोरहाट येथे बांधली. खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स अकादमी (एनडीए) येथे 2000 साली आसामचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल एस. के. सिन्हा यांनी लाचित बडफुकन यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. एवढेच नाही तर दरवर्षी एनडीएमधून सर्वोत्तम गुणांनी उत्तीर्ण होणार्‍या कॅडेट्ला लाचित मेडलने सन्मानित केले जाते.
 
 
आसामचे शिवाजी, ईशान्येतील महाराणा प्रताप
Lachit Badphukan लाचित यांना आसामचे शिवाजी असेही म्हटले जाते. कारण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच मुघलांची रणनीती वारंवार हाणून पाडली आणि युद्धाच्या मैदानातही त्यांना धूळ चारली. संपूर्ण देशात राज्य करणार्‍या मुघलांना अखेरपर्यंत ईशान्येकडे डोळे वर करून पाहण्याची हिंमत झाली नाही, याचे एकमेव कारण लाचित होते. असे असूनही इतक्या प्रचंड कर्तृत्ववान योद्ध्याविषयी उर्वरित देशाला फार काही माहिती नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र सत्तेवर येताच आसामच्या जोरहाट येथे लाचित यांचा 125 फूट उंच पुतळा उभारला आणि त्यांच्याविषयीच्या धड्याचा एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात समावेश केला. आजही आपल्या भाषणांमध्ये पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे दोघे छत्रपती शिवाजी महाराज आणि लाचित बडफुकन आपला आदर्श असल्याचे सांगतात. अशा या योद्ध्यासाठीच कवी म्हणतात....
बिना त्याग कोई श्रीराम नहीं
बिना विजय अब विश्राम नहीं
पुष्पों पर चलना जिनकी पहचान नहीं
डरना योद्धा का काम नहीं...
 
-7755938822