काँग्रेसवर वर्चस्व गाजवणारे वामपंथी भूत

    दिनांक :27-Apr-2024
Total Views |
दृष्टिक्षेप
तृप्ती श्रीवास्तव
‘अबकी बार 400 पार’ असा नारा तुम्ही देत आहात. पण हे कसे साध्य होणार?
Lok Sabha Elections : विश्वास ठेवा, यंदाच्या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 400 पेक्षा अधिक जागा मिळतील. महाभारत युद्धाच्यावेळी भगवान श्रीकृष्णाने ‘पांचजन्य’ शंख फुंकून युद्ध सुरू झाल्याची घोषणा केली होती. अगदी त्याचप्रमाणे आता ‘निवडणूक युद्धा’ची घोषणा झाली असून निवडणुकीचा शंखनाद झाला आहे. याआधीही आम्ही जेव्हा-जेव्हा अशाप्रकारचे मत व्यक्त केले तेव्हा प्रत्येकवेळी त्यापेक्षाही अधिक जागा मिळाल्या आहेत. एका उदाहरणाद्वारे हा मुद्दा समजून घेता येईल. नुकत्याच काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. लोक म्हणत होते, ‘राजस्थानमध्ये काट्याची टक्कर आहे, मध्य प्रदेशात भाजपाला कमी जागा मिळतील आणि छत्तीसगडमध्ये भाजपाचा पराभव होणार, हे निश्चित आहे. मात्र, निवडणुकीचे निकाल सर्वांसमोर आहेत. या तीनही राज्यांत भाजपाने प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. मध्य प्रदेशात 18 हजार अशा मतदार संघांचा शोध घेण्यात आला, जेथे गेल्या चार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा सतत पराभव होत होता. या 18 हजारपैकी 12 हजार मतदान केंद्रांवर लक्ष केंद्रित केल्यास व त्यावर अधिक मेहनत घेतल्यास भाजपाचा विजय होऊ शकतो, असा निष्कर्ष निघाला आणि अखेर तसेच घडले. भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धती व्यूहरचना केली, उत्तम नियोजन केले, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आणि आम्ही त्या जागा जिंकू शकलो. त्यामुळेच ‘मोदी है तो मुमकिन है’, असे म्हटले जाते.
 
 
Sudhanshu-Trived-And-Trupti-Shrivastav
 
पश्चिम बंगालची ममतांपासून सुटका करण्यासाठी भाजपावर विश्वास ठेवता येईल का?
गेल्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये आम्ही 20 जागा जिंकू असे सांगितले होते आणि 18 जिंकून दाखविल्या होत्या. पश्चिम बंगाल हे असे राज्य आहे जिथे 12 वर्षांपूर्वी म्हणजे 2011 पर्यंत चीननंतर कम्युनिस्टांची पकड होती. आज तेथून वामपंथी पूर्णपणे संपले आहेत. दुसरीकडे विधानसभेत भाजपाच्या जागा 3 वरून 78 झाल्या आहेत. भाजपाला मिळालेल्या मतांची टक्केवारी 38 वर पोहोचली आहे. पश्चिम बंगालमधूनही काँग्रेस जवळपास गायब झाली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान ममता बॅनर्जींवर चंडी पाठ करण्याची वेळ आली होती. तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत लोकांवर अत्याचार होत आहेत, कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडत आहेत. धोकादायक पद्धतीने तुष्टीकरणाचे राजकारण केले जात आहे. संदेशखालीतील भीषण घटनांकडे जे लोक एक सामान्य घटना म्हणून पाहत आहेत, त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की अशाच घटना पुढे नोवाखालीचे रूप धारण करतात. (स्वातंत्र्याच्या वेळी नोवाखालीत हिंदूंची कत्तल झाली होती.) या घटनांमुळे लोक अस्वस्थ आणि भयभीत झाले आहेत. असेच लोक भाजपासोबत येत आहेत. विश्वास ठेवा, यावेळी भाजपा तृणमूल काँग्रेसचा निश्चितच पराभव करेल.
 
 
दक्षिण भारतात सनातन परंपरेची सर्वाधिक मंदिरे आहेत. असे असतानाही दक्षिण भारतातील नेते सनातनविरोधी वक्तव्ये करीत आहेत. अशा स्थितीत तिथे भाजपाची काय तयारी आहे?
Lok Sabha Elections : हे बघा, ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र घेऊन आम्ही चारही दिशांनी वाटचाल करीत आहोत. दक्षिण भारतात भाजपा कमकुवत असल्याचा अपप्रचार केला जात आहे. मात्र, वस्तुस्थिती ही आहे की दक्षिण भारतात काँग्रेसपेक्षा भाजपाचे अधिक खासदार आहेत. तो काळ वेगळा होता जेव्हा दक्षिण भारतात भाजपाचा फारसा प्रभाव नव्हता. आज आसाममध्ये आम्ही दुसर्‍यांदा सरकार स्थापन करण्यात यशस्वी झालो आहोत. पश्चिम बंगालमध्ये आम्ही प्रमुख विरोधी पक्ष आहोत. आज दक्षिण भारतात आमचे कार्यकर्ते ज्या तडफेने, उत्स्फूर्तपणे आणि समर्पितपणे कार्य करीत आहेत, ते पाहता तिथे आम्हाला चांगल्या संख्येने जागा मिळू शकतील, याची खात्री वाटते. आंध्र प्रदेशात भाजपा चांगली कामगिरी करणार आहे. तामिळनाडूमध्ये रालोआ जे मुद्दे उपस्थित करीत आहे, जे विविध विषय हाताळत आहे ते तामिळनाडूच्या राजकारणाला वेगळ्या दिशेने घेऊन जातील, हे निश्चित. आजपर्यंत कोणीही संवेदनशील कच्चातिवू बेटाचा मुद्दा उपस्थित केला नव्हता. मात्र, मोदीजी पहिल्यांदाच यावर आवाज उठवत आहेत. जगातील सर्वांत मोठा हॉल ‘भारत मंडपम्’ नवी दिल्लीत बांधण्यात आला. त्याच्या बाहेर नटराजाची मूर्ती आहे, जी तामिळनाडूतील तंजावर येथून आणली होती. वास्तविक दक्षिण भारताला जे स्थान प्राप्त व्हायला हवे होते ते कधीही प्राप्त होऊ दिले नाही. आमच्या देशात पर्यटकांना विविध प्रकारच्या प्रेक्षणीय वास्तू, वारसा स्थळे दाखविण्यात येतात. पण रामेश्वरमसारखे दक्षिणेतील भव्य मंदिर क्वचितच दाखविण्यात येते. या मंदिरावर जो दगड ठेवला आहे तो तिथे कसा ठेवण्यात आला हे आजतागायत कोणालाच माहीत नाही. आज दक्षिण भारतात सांस्कृतिक अस्मितेचा उद्घोष होताना दिसत आहे. त्यामुळेच दोन विचारसरणींमध्ये संघर्ष सुरू आहे. एक विचारसरणी म्हणते की, सनातन धर्म समूळ नष्ट झाला पाहिजे. तर दुसर्‍या बाजूला उदयोन्मुख भारत आहे. आमच्या कार्यकाळात आयफोनचा सर्वात मोठा कारखाना दक्षिण भारतात स्थापन झाला. एचसीएल या कंपनीचे मुख्यालय बंगळुरू येथे आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन कंपनी मायक्रोसॉफ्टचे पहिले कार्यालय बंगळुरूमध्येच उभारण्यात आले आहे.
 
‘दक्षिण भारत एक वेगळा देश निर्माण करायला हवा, असे काँग्रेस नेते डी. के. सुरेश यांनी म्हटले आहे. यावर आपली काय प्रतिक्रिया आहे?
ही त्यांची मानसिकता आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी धर्माच्या नावाखाली देशाचे दोन-तीन तुकडे करण्यात आले. आज भाषा आणि प्रांताच्या नावावर पुन्हा देश तोडण्याची भाषा सुरू झाली आहे. मला यामागील सत्य सांगायचे आहे. उत्तर भारतात शेती आणि त्याचा प्रभाव अधिक दिसून येतो, परंतु शेतकरी म्हणून मच्छीमारांना मान्यता नव्हती, त्यांची स्वतंत्र ओळख नव्हती. मात्र, आमच्या सरकारने मच्छीमारांना शेतकरी म्हणून मान्यता दिली आहे. सर्वाधिक मच्छीमार दक्षिण भारताच्या किनारी भागात आहेत. आता त्यांना शेतकरी म्हणून मान्यता मिळाल्याने त्यांना शेतकर्‍यांसारख्याच सुविधा मिळणार आहेत. आता सागरमाला प्रकल्पाचेच उदाहरण बघा. त्याअंतर्गत संपूर्ण किनारी भागात रस्त्यांचे जाळे विणण्यात आले आहे, राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणण्यात आले आहे. त्यामुळे विकासाला नवी गती प्राप्त झाली आहे. ‘इंडिया आघाडी’ची मानसिकता ही ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या मानसिकतेचे प्रतीक आहे.
 
 
जो कोणी भाजपामध्ये सामील होतो, त्याचे ‘पाप’ धुतले जाते, असा आरोप इंडिया आघाडीने केला आहे. यावर आपले काय म्हणणे आहे?
Lok Sabha Elections : ‘वॉशिंग मशिन’बद्दल बोलणारे बहुधा ‘घाणीची मोळी’ घेऊन जात असावेत. यापेक्षा जास्त स्वतःची खिल्ली उडवताना तुम्ही कोणी पाहिले नसेल. होय, मी प्रामाणिकपणे सांगतो की, भाजपात सामील झालेल्यांपैकी कोणाचेही आरोप मागे घेतलेले नाहीत. आम्ही आरोपावर ठाम आहोत. काँग्रेसची अंतर्गत स्थिती विचारात घेण्यासारखी आहे. त्यांचे युवा नेते पक्षाला रामराम ठोकत आहेत. गौरव वल्लभ आणि संजय निरुपम यांनी काँग्रेसचा अक्षरश: ‘पंचनामा’ केला आहे. जेव्हा श्रीरामजन्मभूमीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होता तेव्हा काँग्रेस नेत्यांनी ‘प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त’ योग्य नसल्याचे सांगितले. विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे राहुल गांधी यांनी कोणत्या मुहूर्तावर आपली न्याय यात्रा सुरू केली, हे पाहिले पाहिजे. कारण त्यांची यात्रा सुरू होताच काँग्रेस नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्यास सुरुवात केली. राहुल गांधींची न्याय यात्रा गुवाहाटीला दाखल झाल्यावर चैपाटी येथे देवडा यांनी पक्ष सोडला. राहुल पश्चिम बंगालमध्ये पोहोचल्यावर दीदींनी तोंड फिरवले. ते जेव्हा झारखंडला दाखल झाले तेव्हा त्यांच्या मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पद सोडावे लागले. राहुल गांधी बिहारमध्ये पोहोचल्यावर ‘इंडिया आघाडी’चे सूत्रधार नितीशकुमार यांनी त्यांना जबरदस्त धक्का दिला. राहुल गांधींची यात्रा उत्तर प्रदेशात पोहोचताच जयंत चौधरी इंडिया आघाडीतून बाहेर पडले. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या लोकांचे म्हणणे आहे की, धर्मविरोधी वामपंथी जवळपास नाहीसे झाले आहेत, तेच भूत काँग्रेसमध्ये शिरले आहे.
 
राहुल गांधी मोदींचा पराभव करण्याविषयी बोलत आहेत. पण ते स्वत: दक्षिण भारतातील वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत. यावर तुमचे काय मत आहे?
आपल्याला भाजपाशी लढायचे आहे, असे राहुल गांधी म्हणतात. पण ते अशा ठिकाणाहून निवडणूक लढवतात जिथे भाजपाची फारशी ताकद नाही. गुजरातमधून बाहेर पडल्यानंतर मोदीजी उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून निवडणूक लढवत आहेत. एकेकाळी आमची मतांची टक्केवारी 20 पेक्षाही खाली गेली होती. यानंतर मोदीजींनी ती शीर्षस्थानी नेली. एकीकडे हे नेतृत्व आहे आणि दुसरीकडे ते नेतृत्व आहे. राहुल गांधी अमेठीपासून दूर वायनाडला गेले. यापलीकडे ते जाऊ शकत नाहीत कारण त्याच्यापलीकडे समुद्र येतो. त्यानंतर त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) नाव बदलवून ‘इंडिया आघाडी’ असे केले. काका हाथरसींची एक काव्यपंक्ती आहे-‘‘नाम बदलनेसे न बदले हैं तकदीर, युद्ध छोडकर भागते नाम भले रणधीर। इसलिए भाग्यचंद्र की आज तक सोयी है तकदीर।’’
 
 
नरेंद्र मोदी केजरीवालांना घाबरतात. त्यामुळेच त्यांनी केजरीवालांना दारू घोटाळ्याच्या नावाखाली तुरुंगात टाकले आहे, असे ‘इंडिया आघाडी’ वाले म्हणतात. यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे?
गेल्या 12 वर्षांत आम आदमी पक्षाने विचित्र प्रकारचे आरोप केले आहेत. त्यांच्या कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा? हा तोच पक्ष आहे ना की, ज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ‘तुमच्याकडे कोणी लाच मागितली तर नकार देऊ नका, त्याची नोंद करा आणि मला येऊन सांगा’ असे सांगितले होते. आज त्यांचे आमदार, मंत्री यांच्या नोंदी का नाही केल्या? पूर्वी जे अण्णा हजारेंच्या चरणांपाशी बसत होते ते आज लालूप्रसाद यादवांच्या पायाशी बसले आहेत. आम आदमी पार्टीच्या चारित्र्यामध्ये ज्या प्रकारचे परिवर्तन आले आहे ते पाहता आपण एवढेच म्हणू शकतो, ‘‘देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान।’’
 
 
Lok Sabha Elections : भारतीय राजकारणात भाजपा हा एकमेव असा पक्ष आहे ज्याने आजपर्यंत कोणत्याही तत्वनिष्ठ मुद्यावर आपली भूमिका बदललेली नाही. आम्ही कुणाशीही आघाडी केली असलो तरी त्या सर्वांमध्ये आमचा जाहीरनामा सारखाच राहिला आहे. जाहीरनाम्यातील काही मुद्यांबाबत नेहमी असेच म्हणण्यात येत होते की हे विषय मार्गी लागणे शक्य नाही. मात्र, ज्याची कुणी कल्पनाही केली नसती किंवा जे अशक्यप्राय वाटत होते असे मुद्दे भाजपाने यशस्वीपणे व शांतपणे मार्गी लावले आहेत. मला वाटते की मोदीजींच्या नेतृत्वाखाली भाजपाने राजकारणात विश्वासार्हता प्रस्थापित केली आहे. विरोधी पक्षांमध्ये ही विश्वासार्हता अजिबात नाही. विरोधकांचा असा एकही मुद्दा नाही की ज्यावर त्यांनी भूमिका बदलली नाही. या मुद्यावर भाजपा इतर सर्व राजकीय पक्षांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे आणि मोदीजींनी ते वेगळेपण शिखरावर नेण्याचे काम केले आहे. भविष्यासाठी विशिष्ट जाहीरनामा तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यासाठी सातत्याने बैठकांचे सत्र सुरू आहे. आम्ही जनतेकडून सूचनाही मागवल्या आहेत. जनभावनेनुसार आम्ही जाहीरनामा बनवतो. केवळ ही एक निवडणूक हे भाजपाचे उद्दिष्ट नाही. 25 वर्षांचा कालावधी हा अमृतकाळ असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे आणि या 25 वर्षांत समृद्ध भारताचा जो आधार बनेल तो पुढील 1,000 वर्षांपर्यंत भारताचा आधार बनवेल असे म्हटले आहे. म्हणजेच आमचा विचार, चिंतन एका निवडणुकीपर्यंत मर्यादित नाही, तर पुढील एक हजार वर्षांपर्यंत आहे. आमचा विचार निवडणुकाभिमुख नसून सभ्यताभिमुख आहे.
भारत एका मोठ्या परिवर्तनाकडे वाटचाल करीत आहे. प्रचाराचा तिसरा टप्पा म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जाईल.
भारताचे हे परिवर्तित व बलशाली रूप पाहता
‘‘अरुण गगन पर महाप्रगती का अब ये मंगल गान उठा। करवट बदला, अंगड़ाई ली, सोया हिन्दुस्थान उठा। असे आपण म्हणू शकतो. निद्रिस्त भारत आता जागा होऊ लागला आहे. जगाला दडपण्यासाठी नाही तर सहकार्य व समन्वयाच्या ऐक्यसूत्रात जगाला गुंफण्यासाठी तो जागा झाला आहे.
(पांचजन्यवरून साभार)