प्रादेशिक पक्षांच्या राष्ट्रीय घोषणांची मस्करी!

    दिनांक :27-Apr-2024
Total Views |
मुंबई वार्तापत्र
नागेश दाचेवार
Maharashtra Politics : महाराष्ट्रात दोन परिवारांच्या मालकीचे दोन राजकीय पक्ष आहेत. यातल्या एका पक्षाने राष्ट्रीय दर्जाची सैर करून परत येण्याचा बहुमान पटकाविला असून दुसर्‍याने राष्ट्रीय स्तरावर जाण्याचे प्रयत्न केले तेव्हा अनामत जप्त करून घेण्याचा पराक्रम आपल्या नावे केला आहे. आजघडीला हे दोन्ही पक्ष अधांतरी आहेत. आज तर राष्ट्रीय दर्जा बाजूलाच राहिला, प्रादेशिक पक्षसुद्धा नाहीत, नव्हे नोंदणीकृत पक्षच आहे की नाही, अशी परिस्थिती यांची झालेली आहे. मूळ शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे विभाजन झाले आहे. त्यामुळे दोन्ही परिवारांचा दावा असलेले दोन्ही पक्ष या दोन्ही लोकांच्या हातून गेले आहेत. आता दोन-चार आमदार-खासदार घेऊन तुणतुणं वाजविण्याचं काम दोन तथाकथित मालक करताना दिसत आहेत. आता यांच्या पुढे खर्‍या अर्थानं सर्वप्रथम आपले राजकीय अस्तित्व वाचविण्याचे आव्हान असताना, हे राष्ट्रीय पातळीवरील घोषणा करण्यात व्यस्त दिसत आहेत. आपल्याकडे नोंदणीकृत पक्ष नाही, असलं-नसलं सारं वाहून गेलं असताना पहिले आपल्या दिव्याखालचा अंधार दूर करण्याऐवजी राष्ट्रीय धोरणाविषयक घोषणा करणे हास्यास्पदच म्हणावे लागले.
 
 
thakare
 
Maharashtra Politics : पहिल्या टप्प्याच्या निवडणुका पार पडल्यानंतर दुसर्‍या टप्प्याच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आपला जाहीरनामा प्रकाशित केला. खर्‍या अर्थानं निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यातील निवडणुकांआधी हा जाहीरनामा येणे अपेक्षित होते. पहिल्या टप्प्यात आमचे उमेदवार रिंगणात नाही. काँग्रेसचे आहेत, म्हणून आम्ही आमचा जाहीरनामा प्रकाशित करणार नाही. जेव्हा आमचे उमेदवार रिंगणात असतील तेव्हाच आमचा जाहीरनामा आम्ही प्रकाशित करू, हे या दोघांचे धोरण म्हणजे काँग्रेस पक्षाला एकटे पाडण्याचे दिसते किंवा यांची वज्रमूठ अद्याप घट्ट नाही, हेच यातून सिद्ध होते. एकवाक्यता असेल तर आणि नरेंद्र मोदींविरोधात एकजुटीने निवडणूक लढायची असेल आणि हुकूमशाही विरोधात लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र येऊन लढायचं असेल, तर आमचे उमेदवार रिंगणात नाही म्हणून आमचा जाहीरनामा नंतर प्रकाशित करू, हे धोरण काही आघाडी धर्मात बसणारे नाही. बरं, स्वतःच्या उमेदवाराचे मतदान दुसर्‍या दिवशी असताना आदल्या रात्री जाहीरनामा प्रकाशित केला तर त्यांच्यातरी काय उपयोगी पडला? मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी काही कालावधी तर लागतोच ना... त्याहून गमतीशीर बाब म्हणजे, दोन प्रादेशिक पक्ष, त्यांनी जाहीर केले वचननामा आणि शपथनामा. या वचन आणि शपथनाम्यात बोटावर मोजण्याइतक्या घोषणा केल्या. त्यातील अधिकांश घोषणा केंद्र सरकार स्तरावरच्या. आता लोकसभेच्या 543 जागांपैकी उद्धव ठाकरे लढणार 21 जागा आणि शरद पवार लढणार 10 जागा. दोघांच्या जागांची बेरीज केली तर ती 31 होते. बरं, यातल्या निवडून येणार किती ते भगवान भरोसे आहे. तरी 31 च्या 31 यांच्याच येतील असे गृहीत धरले तर केंद्रात सत्ता यायला 272 जागा लागतात. मग 241 जागा आणणारे मोठे भाऊ असणार आणि तुमचा त्यात खारीचा वाटा असेल. आणि हो, या सगळ्या काल्पनिक गोष्टी सुरू आहे, बरं का... असं होण्याची सूतराम शक्यता आजच्या परिस्थितीत तरी दिसत नाही.
 
 
 
यांचे सगळे सहकारी मिळून 100 पार करणार नाहीत, अशी देशातील परिस्थिती आहे आणि हे लोकं ‘खयाली पुलाव’ शिजवून, स्वप्नातच ‘इमले’ बांधत आहेत. 2019 मध्ये महाविकास आघाडी बनविली. त्या आघाडीचे प्रमुख शरद पवार आणि आघाडी सरकारचे प्रमुख उद्धव ठाकरे होते. तीन वर्षे राज्यात सरकार चालविले. तरुणांना नोकर्‍या दिल्या नाहीत, शेतकर्‍यांचे सातबारा कोरे करणे तर सोडा; साधी मदत दिली नाही. हेक्टरी 50 हजार देण्याची मागणी करणारे 50 हजार देणे तर सोडा; ते देण्याची साधी घोषणाही करू शकले नाहीत. बाबासाहेबांचे स्मारक उभारण्यासाठी अजित पवार, वर्षा गायकवाडांसह अन्य काही लोकांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; त्यानुसार तीन वर्षांत साधी समिती स्थापन करू शकले नाही. 25 वर्षे मुंबई महापालिकेवर सातत्याने सत्तेत राहूनही मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांपासून मुंबईकरांची मुक्तता केली नाही. पावसाळ्यातील पाणी तुंबण्यापासून सुटका करण्यात असमर्थ राहिले. शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री असूनही राज्यातील शेतकर्‍यांसाठी काही करू शकले नाही. केंद्राच्या निधीत साधे झुकते माप महाराष्ट्राला देऊ शकले नाही. भरघोस निधी देण्याचे तर दूरच राहिले; कुठले प्रकल्प नाही. शेतकर्‍यांच्या मालाला कधी काय भाव दिला? कापसाला काय भाव दिला? 10 वर्षे कृषिमंत्री राहिलेल्या शरद पवारांनी 1700 आणि 2500 पर्यंत भाव दिला होता. आज केंद्र सरकारने दिलेला भाव 6600 आहे. पण नुसती रडारड करणे हा एकमेव धंदा उचलला आहे या लोकांनी. स्वत:च्या हाती सत्ता असताना काही करायचे नाही आणि दुसर्‍यांकडून जादूची छडी फिरविल्याप्रमाणे अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजे म्हणून डांगोरा पिटायचा.
 
 
Maharashtra Politics : स्वतःचा अंधार दूर करण्याची आजची स्थिती नसणारे, कृषी मालाला हमी भाव, केंद्र स्तरावरचा रोजगार, जीएसटी, घरगुती गॅसच्या किमती कमी करणार, पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करणार, अग्निवीर योजना बंद करण्यासारखी आश्वासनं जाहीरनाम्यातून या दोघांनी दिली. ही म्हणजे शेखचिल्लीची स्वप्ने पाहण्यासारखी स्थिती झाली आहे. ऐकण्यातला एक किस्सा आहे... मुंबईतल्या एका कंपनीची ‘मार्केटिंग व्हाईस प्रेसिडेंट हवा’ म्हणून पेपरात जाहिरात येते. एक एमबीए केलेला तरुण मुलगा त्या जागेसाठी अर्ज करतो. मुलाखतीसाठी त्याला बोलावणे येते. मुलाखतीत कंपनीचा मालक त्याला पहिला प्रश्न पगाराच्या व इतर सुखसोयींच्या अपेक्षांविषयी विचारतो. तेव्हा तरुण म्हणतो, मला महिना 9 लाख पगार हवा. मालक- मान्य... अजून काही?, शोफर ड्रिव्हन एसयुव्ही कार... मान्य, अजून काही?, ऑफिसजवळ थ्री बेडरूम हॉल किचन फुल्ली फर्निश्ड फ्लॅट. मान्य... अजून काही? एक कुक आणि दोन 24 तास होम सर्व्हंट. मालक तेदेखील मान्य करतो आणि अजून काही विचारतो. उमेदवार आवंढा गिळतो... आणि धीर करून म्हणतो, ‘काय मस्करी करता साहेब... मी तुमच्या कंपनीची गेल्या तीन वर्षांची बॅलन्सशिट नेटवर चेक केली आहे. तुमची कंपनी तोट्यात आहे... एवढं तुम्ही देऊ शकत नाही.’ मुलाखत घेणारा कंपनीचा तो मालक शांतपणे म्हणतो. ‘मस्करीची सुरुवात कोणी केली?’
 
 
असाच प्रकार उद्धव साहेब, पवार साहेब तुमच्याही बाबतीतला आहे. तुम्ही 543 पैकी जागा लढवणार 21 आणि 10. त्यात देवेंद्रजी पवार साहेबांना बारामती आणि माढ्याच्या बाहेर पडू देत नाहीयेत. दस्तुरखुद्द सुप्रियाताई जिंकतील की नाही याबाबत शंका आहे आणि जनतेला एवढी आश्वासनं? 4 जूनला मतदार तुमची ‘मस्करी’ करतील तेव्हा... मतदारांना उलटून प्रश्न विचारू नका. कारण, मस्करीची सुरुवात तुम्हीच केली आहे. 
 
- 9270333886