पालकांना मानसोपचाराची गरज...

    दिनांक :27-Apr-2024
Total Views |
यंगिस्तान
- जयेश शत्रुघ्न मेस्त्री
Parents need psychotherapy : इतर देशांच्या आणि धर्मांच्या तुलनेत हिंदू धर्मात मुलांवर संस्कार करण्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आपल्याकडे विवाह हा संस्कार आहे, तो कॉन्ट्रॅक्ट नाही. मूल जन्माला येण्याआधीच गर्भसंस्कार केले जातात. मूल वाढवतानादेखील ते मोठं होऊन जबाबदार नागरिक कसं बनेल, यावर भर दिला जातो. आजच्या आधुनिक युगात संस्कार करण्याच्या दृष्टीने सुटी पडल्यावर पालक मुलांना अ‍ॅक्टिव्हिटी क्लासेसला घालतात. आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांना नव्या गोष्टी कळाव्यात आणि कोणत्याही प्रकारे ते वाईट मार्गाला जाऊ नयेत, हा यामागचा विचार असतो.
 
 
indian Parents
 
मुलं मोठी होऊन कशी वागतील, हे आपण आता सांगू शकत नाही. पण त्यांचं पालनपोषण चांगल्या पद्धतीने व्हावं, ही पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. अर्थात काही लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट असू शकते, त्यामुळे मुलांची सगळीच स्वप्ने त्यांना पूर्ण करता येणार नाहीत. पण संस्कार करायला पैशांची गरज नसते. समजा, तेवढी समज जरी पालकांना नसली तरी त्यांच्यावर वाईट संस्कार कोणतेही सुज्ञ पालक करणार नाहीत. विवेकानंद म्हणतात, आपल्याकडे गरीब माणूस अधिक नीतिमत्ता पाळणारा व प्रामाणिक असतो. आपण जुन्या लोकांना बोलताना ऐकलं असेल की, मी पैसे नाही कमावले, पण इज्जत खूप कमावली.
 
 
विवेकानंदांचा एक वाचलेला किस्सा आठवतो... अमेरिकेमध्ये पराक्रम गाजवून विवेकानंद भारतात आले तेव्हा ते त्यांच्या आजोळी थांबले होते. तिथे त्यांची आई त्यांना भेटायला आली. विवेकानंद आणि त्यांच्या आईचं नातं खूपच चांगलं होतं. त्यांनी संन्यास घेतल्यानंतरही आईची सेवा केली आहे, हे विशेष. बर्‍याच वर्षांनंतर दोघांची भेट झाली होती. आई विवेकानंदांकडे पाहतच राहिली. तिचा ‘नोरेन’ आता एक महान संन्यासी झाला होता, हिंदू धर्माचा तत्त्ववेत्ता झाला होता. दोघांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले. विवेकानंदांनी आपल्या आईला नमस्कार केला. पाणावलेल्या डोळ्यांनी माउली म्हणाली, ‘‘बाळा, तुला आशीर्वाद देऊ की तुझे आशीर्वाद घेऊ.’’ मला वाटतं कोणत्याही पालकासाठी हा आनंद दिव्य आहे. आपली मुलं इतकी मोठी झाली पाहिजेत की, त्यांना पाहून आपल्याला प्रश्न पडायला हवा, ‘तुला आशीर्वाद देऊ की तुझे आशीर्वाद घेऊ?’ यापेक्षा दुसरं सुख कोणतं आहे.
 
 
हे सगळं सांगायचं कारण सध्या सोशल मीडियावर व्हायरल ‘बुलबुल’ या 12 वर्षांच्या मुलीची चर्चा होत आहे. तिचं खरं नाव माहीत नाही. मात्र, तिला सगळे याच नावाने ओळखतात. ती सध्या खूप प्रसिद्ध झाली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ती काय करते? ती चांगली अभिनेत्री आहे का? ती चांगली गायिका आहे का? चांगळी खेळाडू आहे का? किंवा तिच्या बौद्धिक क्षमतेमुळे ती लोकप्रिय झाली आहे? तर, यापैकी काहीही घडलेलं नाही. ती ऑर्केस्ट्रामध्ये नाचते आणि रील्स बनवते. नृत्य ही कला आहे. कोणत्याही वयात लोकांसमोर नृत्य सादर करणे यात वाईट काहीच नाही. मात्र ती ज्या प्रकारे नृत्य करते; किंबहुना तिला ज्या प्रकारे नृत्य करायला सांगितले जाते, ती कला नसून विकृती आहे. अतिशय अश्लील गाण्यावर, त्याहून अतिशय अश्लील हावभाव करत नृत्य करणार्‍या या पिटुकल्या मुलीला पाहून मला खूपच दुःख झालं. कारण माझा मुलगा 12 वर्षांचा आहे. ती माझ्या मुलाच्या वयाची...
 
 
Parents need psychotherapy : एका व्हिडीओमध्ये तर ही मुलगी कोणा एका माणसाकडून नाचत नाचत पैसे घेत होती. तो माणूसही मोठ्या बायकांना पैसे द्यावेत तशा पद्धतीने तिच्याशी वागत होता. हे दृश्य भयानक आहे. एका स्थानिक पत्रकाराने घेतलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली की, ‘‘कुछ लोग कहते है, 200 रुपये देता हूं, खेत में चल.’’ हे वाक्य ऐकल्यावर मला एकदम चटका बसला. 12 वर्षांची इवलुशी पोरगी; जिचं वय अभ्यास करण्याचं आणि खेळण्याचं, बागडण्याचं. तिच्याविषयी लोक इतका वाह्यात विचार करतात. याला कारणीभूत तिचे पालकच आहेत. मग पत्रकाराने तिला विचारलं की, ‘‘अशा वेळी तू काय करतेस?’’ ती म्हणाली, ‘‘मी माझ्या मावशीला सांगते. मग मावशी त्यांच्यावर ओरडते.’’
 
 
या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत, यात तिची शून्य चूक आहे. दोष तिच्या पालकांचा आहे. केवळ पैशांसाठी आपल्या मुलीला गलिच्छ आणि अश्लील नृत्य करायला लावत आहेत. त्यांच्यामुळेच लोक तिच्याशी घाणेरडं वर्तन करतात. तिला तिच्या पालकांनी वयाआधीच प्रौढ बनवून टाकलं आहे. या व्हायरल बुलबुलचं एक उदाहरण झालं. तिची परिस्थिती बिकट आहे म्हणून तिला हे काम करावं लागतंय हे जरी गृहीत धरलं तरी सध्या इन्स्टाग्राम, फेसबुकवर रील्सच्या माध्यमातून जे घडतंय ते भयानक आहे. अनेक लहान मुलं मोठ्या माणसांसारखे हावभाव करत डान्स करत असतात. पौगंडावस्थेत प्रेमाची भावना निर्माण होणे हे नैसर्गिक आहे; पण त्या नैसर्गिक भावनेला अश्लीलतेचा स्पर्श होता कामा नये. कारण ती नैसर्गिक भावना अतिशय पवित्र असते नि स्वाभाविक असते. आज अनेक पालकांना वाटतं की, आपली मुलं फेमस व्हावीत. त्यांना फेमस करण्यासाठी ते त्यांच्या बालपणाचा खून करीत आहेत. स्वतःची हौस भागवण्यासाठी मुलांवर अन्याय करणे कितपत योग्य आहे? तुम्ही मुलांना जन्म दिला म्हणून त्यांच्यासोबत काहीही करण्याचा अधिकार तुम्हाला मिळत नाही. म्हणून आज बालसंस्कार जितके गरजेचे आहे, त्याहून अधिक पालकांवर संस्कार करणे महत्त्वाचे आहे. मुळात पालकांना मानसोपचाराची नितांत गरज आहे. ही मानसिक अवस्था बिघडल्याचीच लक्षणे आहेत. आता सरकारनेही यात हस्तक्षेप करण्याची गरज येऊन ठेपली आहे. मुलांकडून अशाप्रकारची कामे करून घेण्यावर बंदी घातली पाहिजे. लहान मुलांकडून पालकच अशी कामे करवून घेतात तेव्हा मन सुन्न होतं आणि या लहान लेकरांना पाहून हिंदी कवी धर्मवीर भारती यांच्या ओळी आठवतात,
‘यह पान फूल सा मृदुल बदन
बच्चों की जिद सा अल्हड़ मन
तुम अभी सुकोमल, बहुत सुकोमल,
अभी न सीखो प्यार!’