पुन्हा एकदा राहुल गांधी...

    दिनांक :27-Apr-2024
Total Views |
अग्रलेख...
काँग्रेसचे माजी अध्यक्ष Rahul Gandhi राहुल गांधी हे अजब व्यक्तिमत्त्व आहे. ते कधी काय करतील आणि काय बोलतील, याचा भरवसा नाही. राहुल गांधींमध्ये अनेक दुर्गुण असले, तरी त्यांच्यातील प्रामाणिकपणाला दाद दिली पाहिजे. राहुल गांधी म्हणजे काँग्रेस पक्षाचे नाजूक जागेचे दुखणे आहे; ज्यावर उपचारही करता येत नाही. राहुल गांधींवर समाजमाध्यमात जेवढे मीम्स तयार झाले, तेवढे खचित देशातील दुसर्‍या कोणत्याही नेत्यावर तयार झाले असतील. राहुल गांधींवरील व्यंग्यचित्रांची आणि विनोदांची गणतीच नाही. राहुल गांधी कधी कोणतीही गोष्ट गंभीरपणे बोलत नाही आणि त्यामुळे लोकही त्यांना गंभीरपणे घेत नाहीत. त्यांनी एखादा मुद्दा गंभीरपणे मांडण्याचा प्रयत्न केला तर त्यातून विनोदनिर्मिती होते. काही वर्षांपूर्वी चित्रपट अभिनेत्री आलिया भट हिच्याबद्दलही असेच अनेक विनोद तयार होत होते. साध्या साध्या प्रश्नांचे म्हणजे ‘कॉमनसेन्स’ असलेल्या प्रश्नांची उत्तरंही ती देऊ शकत नव्हती. तिच्या सामान्य ज्ञानावरही अनेक मीम्स आणि विनोद तयार झाले होते.
 
 
Rahul gandhi dksl;
 
Rahul Gandhi : राहुल गांधी म्हणजे काँग्रेसमधील पुरुषी आलिया भट आहे. काय बोलावे हे त्यांना जसे समजत नाही, तसेच काय बोलू नये, हेही समजत नाही. राहुल गांधी आणि आलिया भट यांचा ‘आयक्यू’ एकसारखाच म्हणायला हरकत नाही. काही काळाने आलिया भट यांनी किमान चित्रपटसृष्टीत आघाडीची अभिनेत्री म्हणून आपली प्रतिमा तरी तयार केली, पण राहुल गांधींना आपल्या आतापर्यंतच्या राजकारणात तेही जमले नाही. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 2019 मध्ये उत्तरप्रदेशातील अमेठीत पराभवाची चाहूल लागल्यामुळे राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघातूनही निवडणूक लढवली होती. अमेठीत त्यांचा अपेक्षेप्रमाणे पराभव झाला, पण वायनाडमधून ते जिंकले. त्यामुळे यावेळी पुन्हा एकदा राहुल गांधी वायनाड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरताना राहुल गांधी यांनी ‘व्यवसाय’ या स्तंभात ‘लोकसभा सदस्यत्व’ असा उल्लेख केला. हे पाहून हसावे की रडावे, ते समजत नाही. राहुल गांधींवर समाजमाध्यमात उगीच मीम्स तयार झाले नाही, त्यांची खिल्ली उडवल्या गेली नाही, याची यावरून खात्री पटते. ‘व्यवसाय’ म्हणजे ज्यातून तुम्हाला पैसे मिळतात वा तुम्ही पैसे कमावता. राहुल गांधी खासदारकीतून पैसे कमवत असतील! त्यामुळेच ‘व्यवसाय’ म्हणून त्यांनी आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा उल्लेख केला.
 
 
 
राजकारण हा व्यवसाय नाही तर सेवाकार्य आहे, असे आपण आतापर्यंत मानत होतो. पण Rahul Gandhi राहुल गांधींनी ते सेवाकार्य नाही तर व्यवसाय असल्याचे दाखवून दिले आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी एका औद्योगिक घराण्याकडून पैसे घेतले होते. त्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्दही झाले. त्यांनी आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा म्हणजे खासदारकीचा पैसे कमावण्यासाठी उपयोग करून घेतला. राहुल गांधींना कदाचित तसे अपेक्षित असावे. लोकसभा सदस्य म्हणून नियमित मानधन आणि अन्य सरकारी सोयी-सवलती वगळता राहुल गांधींनी याचा व्यवसाय म्हणून कसा वापर केला, त्यातून त्यांनी किती पैसे कमावले, ते अजून समोर आले नाही. लोकसभा सदस्यत्वाचा व्यवसायासारखा वापर करूनही त्यांनी ते लपवले नाही; उलट ‘डंके की चोट पे’ त्यांचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख केला. आतापर्यंत आपल्या देशातील अनेक नेत्यांनी राजकारणाकडे समाजसेवा म्हणून पाहिले. स्वातंत्र्य आंदोलनात हजारो लोकांनी आपला सहभाग दिला, सर्वस्वाचे बलिदान केले; पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी सरकारने लागू केलेले निवृत्ती वेतन घेण्यासही नकार दिला होता. आम्ही जे केले, ते देशासाठी केले; त्याचा मोबदला आम्हाला नको, असे या सर्वांनी बाणेदारपणे सांगितले होते. पण ‘खासदारकी’ हा आपला व्यवसाय असल्याचे सांगणार्‍या राहुल गांधींच्या या प्रामाणिकपणाचे सगळ्यांनी कौतुक केले पाहिजे. प्रत्येक वेळी त्यांची टिंगलटवाळीच केली पाहिजे, असे नाही. काही वर्षांपासून राहुल गांधींचे ‘इधरसे आलू डालो, उधरसे सोना निकलेंंगा’ हे वाक्य जगप्रसिद्ध झाले आहे. राहुल गांधींचा चेहरा हा बालक मंदिरात जाणार्‍या मुलांसारखा निरागस असतो. बालक मंदिरात जाणार्‍या मुलांना जसे काय बोलावे, आपल्या बोलण्याचा काय परिणाम होईल, याची जाणीव नसते, तशीच स्थिती राहुल गांधींची आहे. पन्नाशी ओलांडलेले राहुल गांधींमध्ये निरागसपणा भरला आहे. ते अल्लडपणे अजाणतेपणी परिणामांची पर्वा न करता बोलत असतात आणि स्वत:बरोबर आपल्या पक्षाचे नुकसान करून घेत असतात. आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्यात राहुल गांधींचा ‘हात’ कोणी धरू शकत नाही. सुदैवाने त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘पंजा’ म्हणजे म्हणजे हातच आहे.
 
 
Rahul Gandhi राहुल गांधी काँग्रेस पक्षात सेल्फ गोलसाठी प्रसिद्ध आहेत. आपण खोदलेल्या खड्ड्यात ते पडत असतात. त्यामुळे राहुल गांधी म्हणजे काँग्रेस पक्षासाठी ‘असून अडचण नसून खोळंबा’ असा प्रकार आहे. आपल्या मूर्खपणाने राहुल गांधी यांनी स्वत:चे, गांधी घराण्याचे आणि आपल्या पक्षाचेही जेवढे नुकसान केले, तेवढे ते भाजपानेही केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह गांधी घराण्याचे आणि काँग्रेस पक्षाचे मोठे शत्रू असल्याचे भासवले जाते, पण गांधी घराण्याचे आणि काँग्रेस पक्षाचे खरे शत्रू राहुल गांधीच आहेत. मोदी आणि शाह यांनी मिळून काँग्रेस पक्षाचे जेवढे नुकसान केले नाही, त्याच्या दहापट नुकसान राहुल गांधी यांनी केले आहे. कोणताही नेता आपल्या पक्षाला पुढे नेत असतो, विधानसभेपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुकीत विजयी करीत असतो, पण राहुल गांधी यांनी आपल्या 20 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत काँग्रेस पक्षाला एकही निवडणूक स्वबळावर जिंकून दिली नाही. विधानसभा आणि लोकसभा तर सोडा; पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही काँग्रेस पक्षाला विजय मिळवून दिला नाही. राहुल गांधींच्या समवयस्क प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी आपल्या नेतृत्वात पक्षाला विजय मिळवून दिला; स्वत: मुख्यमंत्रिपद भोगले, पण राहुल गांधींना असे काही करता आले नाही.
 
 
Rahul Gandhi : राहुल गांधींचे एकमेव कर्तृत्व म्हणजे गांधी घराण्यात त्यांचा जन्म झाला. मोठेपणाचा हा एकमेव निकष वगळता राहुल गांधी एकदम कर्तृत्वशून्य आहेत. राहुल गांधींच्या जागेवर दुसरा कोणताही नेता असता तर त्याने स्वत:चे कल्याण करून घेतले असते. मिळालेल्या संधींचे सोने केले असते, पण राहुल गांधी असे नतद्रष्ट आहेत, ज्यांनी सोन्यासारख्या मिळालेल्या संधींची माती केली. राहुल गांधींचा एकमेव छंद म्हणजे त्यांना पंतप्रधानांवर टीका करायला मनापासून आवडते. विशेष म्हणजे आपली लायकी आणि पात्रता न पाहता ते पंतप्रधानांवर टीका करीत असतात. पंतप्रधानांवर टीका करून आपण मोठे होऊ, असे कदाचित त्यांना वाटत असावे. विशेष म्हणजे पंतप्रधानांवर टीका करताना ते कोणताही भेदभाव करत नाही. पंतप्रधान मोदींवर ते जेवढ्या त्वेषाने तुटून पडतात, तेवढ्याच त्वेषाने त्यांनी आपल्याच सरकारचा एक अध्यादेश टराटरा फाडला होता. विशेष म्हणजे डॉ. मनमोहनसिंग हे आपल्या काँग्रेस पक्षाचे पंतप्रधान आहेत, याचे भानही त्यांनी ठेवले नाही. दुसरीकडे मोदींना ‘चौकीदार चोर है’ म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. तर, अशा राहुल गांधींचे काय करावे, ते काँग्रेसच्या नेत्यांना कळत नाही. काँग्रेस पक्ष जोपर्यंत राहुल गांधींना डोक्यावर घेऊन नाचेल, तोपर्यंत देशातील जनता त्या पक्षाला पायदळी तुडवल्याशिवाय राहणार नाही. पण काँग्रेस पक्षातील नेत्यांना तेवढे शहाणपण येत नाही. तसाही शहाणपणा आणि काँग्रेस पक्ष यांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. राहुल गांधींनी ते वेळोवेळी सिद्धच केले आहे.