संत एकनाथांची भूतदया : एक चिंतन

28 Apr 2024 04:45:00
संत प्रबोधन
- प्रा. डॉ. हरिदास आखरे
Saint Eknath : संत एकनाथ हे पैठण निवासी साधुवृत्तीचे व आपले गुरू जनार्दन स्वामी यांच्यावर परमनिष्ठा असणारे प्रकांड पंडित होत. दिवसभर साधना करायची आणि त्यावरती संध्याकाळी प्रवचन किंवा कीर्तन करायचं, असा त्यांचा नित्य नियम. भगवंताची पूजा षोडशोपचार तीसुद्धा अतिशय मनोभावे करावी, असा त्यांचा निश्चय. घरी आलेला प्रत्येक याचक जेवण केल्याशिवाय जाऊ नये, हा त्यांचा दयाभाव. प्रत्येकाला पोटभर अन्न मिळावं, आपल्याकडे असलेली संपन्नता प्रत्येकाच्या मुखामध्ये घास घालण्यासाठी त्यांनी आयुष्यभर ती धनसंपदा खर्ची घातली. स्वतः पत्नी गिरजाबाई आणि त्यांचा साक्षात परमात्मा पांडुरंग त्यांच्या घरी ‘गावबा नोकर’ म्हणून काम करीत होता. संत एकनाथ यांनी स्वतः पत्नी गिरजाबाई व शिष्य यांच्यासोबत दिवसभर पत्रावळी, जेवणावळी, स्वयंपाक याचे सातत्य राहावे इतकी श्रीमंती त्यांच्याकडे होती. संत एकनाथ हे धनसंपदेने संपन्न संत होते. पैठण या गावातील त्यांचं वास्तव्य म्हणजे त्या परिसरातील भक्ती सुगंध.
 
 
sant_eknath_maharaj
 
‘जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत ।’ हा विचार त्यांनी सातत्याने जागवला होता. आणि ‘जे जे भेटे भूत ते ते मानिजे मी ऐसे ।’ हा विचार त्यांनी जगवला होता.
गंगेवरती आंघोळीला गेल्यानंतर एका यवनाने त्यांच्या अंगावर पान खाऊन थुंकावं आणि त्यांनी गंगेमध्ये पुन्हा जाऊन आंघोळ करावी, असं खूप वेळा झाल्यानंतर तो शरण आला. परंतु, त्याला समजून सांगताना ते म्हणतात की, तुझ्यामुळे मला 108 वेळा गंगेचे स्नान घडलं. इतका सकारात्मक दृष्टिकोन व एखाद्याला क्षमा करण्याची वृत्ती संत एकनाथांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये प्रकर्षाने जाणवते.
 
 
‘यवन अंगावरील थुंकला । प्रसाद देऊन मुक्त केला ॥’ ही साधुवृत्ती एकनाथांच्या ठाई होती.
आज वर्तमान काळामध्ये जगताना एखाद्याच्या पायाचा धक्का जर आपल्याला लागला तर त्याच्या जीवनाचा उद्धार करत त्याच्यामुळे आपण त्याला शिव्याशाप देऊन मोकळे करून टाकतो. परंतु, संत एकनाथ हे भूतदया जोपासणारे संत होते. पाण्याची कावड काशीला घेऊन जात असताना भर मे महिन्यामध्ये काशी विश्वनाथाला अभिषेक करायचा असा निश्चय; परंतु रस्त्यामध्ये एक गाढव आपल्या शेवटच्या घटका मोजत असल्याचं आणि पाण्यावाचून तडफडत असल्याचं दिसताच संत एकनाथ महाराज स्वतः पाण्याची कावड त्याच्या मुखामध्ये टाकून त्याचा जीव वाचवण्याचं काम करतात.
 
 
Saint Eknath : संत एकनाथांना प्रत्येक प्राणिमात्रामध्ये भगवंत दिसतो. सर्व मनुष्यमात्रांना ते प्रत्येक प्राणिमात्रामध्ये भगवंत पहा, असाच संदेश देतात. संत एकनाथांनी आपल्या संपूर्ण जीवनभर एकनाथी भागवत, भारुडे, गवळणी, विंचू चावला, दादला नको ग बाई अशा प्रकारचे रूपक करत समाजाला जागृत करण्याचं काम केलं. माणसाच्या जीवनामध्ये असणारे षड्र्िपू हे सहा शत्रू यांना जर आपण सांभाळू शकलो तर तो मनोवृत्तीचा विजय आहे, असा तत्त्वज्ञानी विचार ते प्रतिपादन करतात. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर आणि अहंकार या षट विंचवांचा चावा जेव्हा मनुष्य देहाला होतो, मनुष्याच्या मनाला होतो तेव्हा त्याचा उतारा किंवा त्यावरती एकच उपाय तो म्हणजे ‘संतांचे धरावे ते पाय.’
 
 
संत उपदेश
जीवनामध्ये व्यापकत्व देण्याची भावना, त्यागाची भावना, दानाची भावना, समाधानाचा भाव अशी व्यक्ती जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत हा विंचू त्याच्या विषयाचा उतारा होऊ शकत नाही. संत एकनाथांनी या सर्व षड्विकारांना ताब्यात ठेवण्याचं महत्त्वाचं साधन म्हणजे भगवंताचं नामस्मरण व त्यांची आठवण हा उपाय सांगितला. संसारात राहून परमार्थ करता येतो, असा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला. संत एकनाथांनी आळंदीत जाऊन संत ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. आज तीच प्रत आपण सर्वांनी प्रमाण मानलेली आहे. ‘वारकरी संप्रदाय’ ही संत ज्ञानेश्वरांची प्रत विशेष मान्यता प्राप्त आहे.
 
 
Saint Eknath : संत एकनाथांनी सामाजिक एकतेच्या बाबतीत अग्रेसर राहून सामाजिक विषमता दूर करण्यासाठी, सामाजिक अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. जातिभेद दूर करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. संत साहित्यातून त्यांनी रंजन व प्रबोधन अशा प्रकारची दृष्टी देऊन संत साहित्याला अजरामर केले आहे. संत एकनाथांच्या ‘भावार्थ रामायणा’वरून महाराष्ट्रातील सामाजिक दशा, आर्थिक पळजळ, त्या काळातील धार्मिक मंडळ ही ढोंगीपणावर आधारलेली होती. या सर्व बाबींचा मागोवा त्यांनी ‘भावार्थ रामायण’मध्ये घेतला आहे. संत एकनाथांनी अध्यात्माच्या निश्चित मार्गाने एखाद्या व्यक्तीचा सामाजिक, धार्मिक व आध्यात्मिक विकास होऊ शकतो हे सांगितले.
 
 
संत एकनाथांनी आचाराला विशेष महत्त्व देत कुप्रथेला आळा घातला. अस्पृश्यतेविरुद्ध बंड केले. आचाराची शुद्धता सर्वांना पटवून दिली. प्रेमळपणा, सौजन्य, शांती या गुणांच्या बळावर त्यांनी समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्याची महत्त्वाची कामगिरी केली. म्हणूनच संत एकनाथांना ‘शांती ब्रह्म’ या उपाधीने सन्मानित केले जाते. समाजातील अंधश्रद्धा, कुप्रथा याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांनी भारुडे व गवळणी यांचं लेखन केलं. तो उपदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्या काळात स्त्रियांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी ‘रोडगा’ नावाचं भारुड लिहून स्त्रियांच्या मनाची दशा व अस्वस्थता त्यातून व्यक्त केली आहे. स्त्रियांना त्या काळात नकाराचे स्वातंत्र्य नव्हते. बालपणातच आई-वडील त्यांचं लग्न लावून द्यायचे आणि जसा असेल तसा त्या नवर्‍यासोबत त्यांना संसार करावा लागत होता. त्याविरुद्ध बंड उठवण्यासाठी संत एकनाथांनी- ‘फाटकेच लुगडे तुटकीशी चोळी, त्याला शिवाय दोरा नाही, मला दादला नको गं बाई’ - अशा प्रकारची उपरोधात्मक टीका त्या बालविवाहाविरुद्ध तत्कालीन कालावधीमध्ये लिहिली. समाजातील महारीन, माळीन, भटिन, परीतीन, कुटीन या सगळ्या समाजातील स्त्रियांचे दुःख त्यांनी मूक भावनेतून, गवळणीच्या रूपातून, भारुडांच्या रूपातून स्त्री समाजाचे धारिष्ट्य त्या काळात दाखवलं होतं.
 
 
Saint Eknath : संत एकनाथ हे महाराष्ट्रातील सुधारकांचे सुरुवातीच्या काळातील एक महत्त्वाचे संत सुधारक होते. अस्पृश्यांचा ज्या काळात उच्चवर्णीयांनी सावली आणि आवाज टाळला होता, त्या काळात त्यांनी अस्पृश्यांना जवळ केले होते. मे च्या रखरखत्या उन्हामध्ये जेव्हा एक अस्पृश्य समाजातील मुलगा नदीच्या वाळवंटामध्ये भटकत होता, तेव्हा त्याला जवळ करून योग्य मार्ग दाखवत घरापर्यंत पोहोचवले होते. याचा राग उच्चवर्णीयांनी धरून त्यांना त्यास नदीत आंघोळ करण्यास भाग पाडले होते. पण त्याला न जुमानता यांनी अस्पृश्यांना नेहमीच मार्ग दाखवण्याचे कार्य केले होते. त्यांची प्रत्येक कविता भाव-कविता आहे.
 
 
Saint Eknath  : ‘काय करीशी काशीगंगा भितरी चंगा नाही तो ।’ या कवितेमध्ये आपल्याला प्राणी, वनस्पती, व्यक्ती सर्व भेटतात आणि ते आपआपले अस्तित्व, आपलं बोलणं साकारताना दिसतात. त्यातून प्रत्येक व्यक्तीचं अस्तित्व आपली भावना आणि आपला आवाज साकारताना दिसतोय. संत एकनाथांनी आपला आचार, विचार, उच्चार या तिन्ही गोष्टींमध्ये एकता व शुद्धता ठेवून आचाराचा परम आदर्श समाजासमोर ठेवला होता. त्यांची 300 च्या वर भारुडे, गवळणी ही त्या प्रत्येक गोष्टीची साक्ष देताना दिसतात. त्यांच्या वर्तणुकीचा सारांश एकच की, अंत:करणांमध्ये भूतदया असली पाहिजे आणि प्रत्येक व्यक्ती जो आपल्याला भेटेल तो साक्षात भगवंताचं रूप आहे म्हणून जवळ केलं पाहिजे. एवढ्या पुरोगामी विचारांचे संत एकनाथ आपल्याला भूतदयेचा एक आदर्श वस्तुपाठच देऊन जातात.
 
- 7588566400 
Powered By Sangraha 9.0