गोदरेजमध्ये भाऊबंदकी; टाटांची नजरबंदी!

    दिनांक :28-Apr-2024
Total Views |
अर्थचक्र
- महेश देशपांडे
economic cycle : सरत्या आठवड्यामध्ये अनेक खुसखुशीत आणि लक्षवेधी अर्थवार्ता समोर आल्या. त्यांची सुरुवात गोदरेज घराण्याने करून दिली. देशातल्या या सर्वात जुन्या कॉर्पोरेट घराण्यातील भाऊबंदकी समोर आली. दरम्यान, भारतातील डीमॅट खात्यांची संख्या 15 कोटींवर गेल्याची माहिती समोर आली. याच सुमारास टाटा मोटर्स तामिळनाडूमध्ये जग्वार लॅण्ड रोव्हरची निर्मिती करणार असल्याची बातमी झळकली तर जगप्रसिद्ध तोशिबामध्ये कामगार कपातीचे संकट समोर आले. देशातील जुन्या कॉर्पोरेट घराण्यांपैकी एक असलेल्या गोदरेज कुटुंबातील दोन गटांनी आता एकमेकांच्या कंपन्यांच्या संचालकपदांचे राजीनामे दिले आहेत. गोदरेज कुटुंबाने एक शतकाहून अधिक काळापूर्वी स्थापन केलेल्या आपल्या विशाल समूहाचे औपचारिक विभाजन करण्यास सुरुवात केली आहे. आता ते लवकरच एकमेकांच्या कंपन्यांमधील शेअर्स विकणार आहेत. या दिशेने वाटचाल करीत, या वर्षाच्या सुरुवातीला, आदी आणि नादिर गोदरेज यांनी गोदरेज आणि बॉयसच्या बोर्डाचा राजीनामा दिला, तर जमशेद गोदरेज यांनी जीसीपीएल आणि गोदरेज प्रॉपर्टीजच्या बोर्डवरील आपली जागा सोडली.
 
 
jaguar
 
कुटुंबाच्या दोन शाखांमध्ये ही विभागणी होत आहे. एका बाजूला आदी गोदरेज आणि भाऊ नादिर गोदरेज तर दुसरीकडे त्यांचे चुलत भाऊ जमशेद गोदरेज आणि त्यांची बहीण स्मिता गोदरेज कृष्णा आहेत. ‘गोदरेज इंडस्ट्रीज अँड असोसिएट्स’चे नेतृत्व आदी गोदरेज आणि त्यांचे बंधू करतात. जमशेद गोदरेज आणि त्यांची बहीण ‘गोदरेज अँड बॉयस’चे प्रमुख आहेत. आदी-नादिर ‘गोदरेज अँड बॉयस’मधील आपला हिस्सा दुसर्‍या शाखेला विकणार आहे. जमशेद गोदरेज आणि त्यांचे कुटुंबीय ‘गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स’ आणि गोदरेज प्रॉपर्टीजमधील हिस्सा त्यांच्या चुलत भावांना हस्तांतरित करतील. या प्रकरणाशी परिचित लोकांच्या म्हणण्यानुसार ‘गोदरेज आणि बॉईस’च्या अंतर्गत अंदाजे 3,400 कोटी रुपयांची रिअल इस्टेट मालमत्ता जाईल. मालकी हक्क नियंत्रित करण्यासाठी स्वतंत्र करार केला जाईल. गोदरेज ग्रुपमध्ये जीसीपीएल, गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट आणि एस्टेक लाईफ सायन्सेस या पाच सूचिबद्ध कंपन्यांचा समावेश आहे.
 
 
economic cycle : गेल्या आठवड्यात गुरुवारी बाजार बंद होत असताना त्यांचे मार्केट कॅप 2.34 लाख कोटी रुपये होते. पाच सूचिबद्ध कंपन्यांनी 2023 मध्ये सुमारे 42 हजार 172 कोटी रुपयांचा महसूल आणि 4 हजार 65 कोटी रुपयांचा नफा नोंदविला आहे. ‘जी अँड बी’ ही खासगी मालकीची कंपनी आहे. हा समूह अभियांत्रिकी, उपकरणे, सुरक्षा उपाय, कृषी उत्पादने, रिअल इस्टेट आणि ग्राहक उत्पादनांसह विविध व्यवसाय चालवतो. तज्ज्ञांच्या मते, गोदरेज फॅमिली कौन्सिल दोन महत्त्वाच्या मुद्यांशी संबंधित मुख्य बारकावे शोधून काढत आहे. यामध्ये विभाजनानंतर ‘गोदरेज ब्रँड’ नावाचा वापर, संभाव्य रॉयल्टी देयके आणि ‘जी अँड बी’कडे असलेल्या जमिनीचे मूल्यांकन यांचा समावेश आहे. भावी पिढ्यांसाठी मालकीचे स्पष्ट वर्णन प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने विभाग सुमारे तीन वर्षांपासून काम करीत आहे. कुटुंब प्रमुख, आदी आणि जमशेद गोदरेज अनुक्रमे 82 आणि 75 वर्षांचे आहेत.
 

Godrej-Family-960x540 
 
दरम्यान, भारतातील डीमॅट खात्यांची संख्या 15.1 कोटींवर पोहोचली. मार्च 2024 मध्ये 31 लाख नवी डिमॅट खाती उघडली गेल्यामुळे ही वाढ झाली आहे. मोतीलाल ओसवाल या ब्रोकरेज कंपनीच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2024 मध्ये दरमहा सरासरी 3.1 दशलक्ष डीमॅट खाती उघडली गेली आहेत. हा कल वर्षभर सुरू राहण्याची अपेक्षा आहे. मार्चमध्ये भारतीय बेंचमार्क निफ्टी 1.5 टक्के वाढला. मजबूत मॅक्रो सिग्नल, दर कपातीच्या अपेक्षा, सतत परकीय गुंतवणूकदारांचा ओघ आणि एकूणच सकारात्मक जागतिक बाजाराचा कल यामुळे ही वाढ झाली. याशिवाय 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसर्‍या विजयाच्या शक्यतेनेही गुंतवणूकदारांमध्ये गुंतवणूक करण्याची आशा निर्माण झाली आहे. ‘सीडीएसएल’ आणि ‘एनएसडीएल या दोन ‘डिपॉझिटरी सर्व्हिस प्रोव्हायडर’ (डीएसपी) पैकी ‘सीडीएसएल’ मार्केट शेअर मिळवत आहे. याचा अर्थ नवीन डिमॅट खात्यांचा मोठा भाग ‘सीडीएसएल’सोबत उघडला जात आहे. ‘सीडीएसएल’च्या बाजारहिस्स्यात वाढ होत आहे. दुसरीकडे, ‘एनएसडीएल’ने डिमॅट खात्यांची एकूण संख्या आणि जोडलेली नवी खाती या दोन्हीसाठी वर्ष-दर-वर्ष बाजारातील हिस्सा गमावला आहे. ‘एनएसई’वरील सक्रिय ग्राहकांची संख्या मार्च 2024 मध्ये महिना-दर-महिना 1.8 टक्क्यांनी वाढून 40.8 दशलक्ष झाली. सध्या एकूण एनएसई सक्रिय क्लायंटपैकी टॉप पाच डिस्काऊंट ब्रोकर्सचा वाटा 63.8 टक्के आहे. मार्च 2023 मध्ये हे प्रमाण 59.9 टक्के होते.
 
 
economic cycle : आता उद्योग विश्वावर एक नजर. टाटा समूहाची उपकंपनी टाटा मोटर्स एक अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसह तामिळनाडूमध्ये बांधलेल्या आपल्या नवीन प्लांटमध्ये जग्वार लॅण्ड रोव्हर (जेएलआर) लक्झरी कार तयार करेल. रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. टाटा मोटर्सने यावर्षी मार्चमध्ये तामिळनाडूमध्ये नवीन प्लांट सुरू करण्याची घोषणा केली होती; पण लॅण्ड रोव्हरचे कोणते मॉडेल बनवणार याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. 2008 मध्ये टाटा ग्रुपची कंपनी टाटा मोटर्सने जग्वार लॅण्ड रोव्हर पूर्णपणे खरेदी केली होती. त्यावेळी कंपनीने फोर्ड मोटर कंपनीकडून हा स्टेक 2.3 अब्ज डॉलरला खरेदी केला होता. जग्वार लॅण्ड रोव्हरची विक्री सातत्याने वाढत आहे. जग्वार लॅण्ड रोव्हर इंडिया (जेएलआर इंडिया) ने त्यांच्या लक्झरी कारच्या विक्रीचा डेटा उघड केला होता. कंपनीने 2024 च्या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. भारतातील जग्वार लॅण्ड रोव्हर कारची किरकोळ विक्री 81 टक्क्यांनी वाढून 4,436 युनिट्स झाली आहे. रेंजरोव्हर आणि डिफेंडरची विक्री 100 टक्क्यांहून अधिक वाढली. रेंज रोव्हर या ‘स्पोर्टस युटिलिटी व्हेईकल’ची किरकोळ विक्री 160 टक्क्यांनी वाढली असून डिफेंडरच्या किरकोळ विक्रीत 120 टक्क्यांनी वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. हा डेटा वार्षिक आधारावर जारी करण्यात आला होता. 2024 मध्ये बाजारात आलेल्या ‘डिस्कव्हरी स्पोर्ट’ या नवीन मॉडेलच्या विक्रीत 50 टक्क्यांनी वाढ झाली असून ‘रेंजरोव्हर इव्होक’च्या विक्रीत 55 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
 
 
जगभरातील नामांकित कंपन्यांमधील टाळेबंदीची लाट थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अमेरिकेतील अनेक मोठ्या कंपन्यांनी या वर्षी केलेल्या टाळेबंदीनंतर आता जपानमधील कर्मचार्‍यांनाही याचा फटका बसत आहे. टाळेबंदी करणार्‍या कंपन्यांच्या यादीत आता ‘तोशिबा’ या जपानी कंपनीचे नाव जोडले गेले आहे. याचा अनेक कर्मचार्‍यांना फटका बसणार आहे. तोशिबा सुमारे पाच हजार कर्मचार्‍यांना कामावरून कमी करणार आहे. कंपनीच्या या कर्मचारी कपात योजनेचा देशांतर्गत बाजारावर परिणाम होणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. कंपनी कामावरून कमी करत असलेल्या कर्मचार्‍यांची संख्या जपानमधील एकूण कर्मचार्‍यांच्या सात टक्के इतकी आहे. 2015 मध्येही या कंपनीमध्ये मोठी टाळेबंदी झाली होती. तोशिबाची ही सर्वात मोठी टाळेबंदी आहे. यापूर्वी, तोशिबाने 2015 मध्ये हजारो कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले होते, तेव्हा कंपनीमध्ये लेखा अनियमिततेचे प्रकरण समोर आले होते. त्यावेळी हिशेबातील अनियमिततेमुळे कंपनी वादात सापडली होती. त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवला. यावेळी कंपनीच्या मुख्यालयात बॅक-ऑफिसच्या कामात गुंतलेल्या कर्मचार्‍यांवर कपातीचे संकट आहे. कर्मचार्‍यांना कंपनीतून स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय मिळणार आहे. अहवालानुसार या छाटणी योजनेमुळे कंपनीला विशेष सेवानिवृत्ती लाभ आणि आऊट प्लेसमेंट सेवांवर सुमारे 100 अब्ज येन खर्च येणार आहे.
 
 
economic cycle : गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कंपनीला जपानी स्टॉक एक्स्चेंजमधून डीलिस्ट करण्यात आले होते. डीलिस्टिंगमध्ये, जपान इंडस्ट्रियल पार्टनर्स कन्सोर्टियमने भागधारकांकडून शेअर्स परत खरेदी करण्यासाठी 2.4 ट्रिलियन येन खर्च केले होते. बँकांकडून त्यापैकी 1.4 ट्रिलियन येन कर्ज घेऊन व्यवस्था करण्यात आली. यासाठी तोशिबाची मालमत्ता बँकांकडे गहाण ठेवण्यात आली. जगभरातील कंपन्या ऑपरेटिंग खर्च कमी करण्यासाठी पुनर्रचनेचा अवलंब करत असून टाळेबंदीवर लक्ष केंद्रित करीत आहेत.
(लेखक आर्थिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)