शेवटचे तीन दिवस... अजूनही सहा जागांवर उमेदवार ठरेना!

    दिनांक :29-Apr-2024
Total Views |
- मविआ, महायुतीत घोळ कायम
 
मुंबई, 
Lok Sabha Elections-Candidates : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. मात्र, अजूनही ठाणे, पालघर, नाशिक, उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम, दक्षिण मुंबई या सहा जागांवर महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार जाहीर करण्यात आले नाहीत.
 
 
elec dkop
 
Lok Sabha Elections-Candidates : या सर्व मतदार संघात 20 मे रोजी मतदान होत आहे. आज मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये उबाठा गटाकडून अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजन विचारे यांनी अर्ज भरला. दुसरीकडे दक्षिण-मध्य मुंबईतून महायुतीकडून राहुल शेवाळे यांनी अर्ज दाखल केला. असे असले तरी, मविआ व महायुती दोघांनाही काही ठिकाणी उमेदवार निश्चित करता आले नाही. ज्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार ठरला, तिथे मविआचा उमेदवार ठरला नाही, तर ज्या ठिकाणी मविआला उमेदवार मिळाला, तिथे महायुतीचा उमेदवार ठरला नाही.
दक्षिण मुंबई : येथे उबाठा गटाकडून अरविंद सावंत यांनी अर्ज भरला. मात्र, महायुतीत जागा नेमकी कोणता पक्ष लढणार, यावर चर्चा सुरू आहे. शिवसेनेकडून यामिनी जाधव यांचे नाव निश्चित मानले जात असताना भाजपानेही येथे दावा केला आहे.
ठाणे : उबाठा गटाकडून राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज भरला. मात्र, महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. ठाण्यात शिवसेनेकडून नरेश म्हस्के यांचा उमेदवारी निश्चित असल्याचे बोलले जात आहे.
उत्तर मुंबई : महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार असून, महाविकास आघाडीत जागा कुणाला सोडायची, यावर चर्चा सुरू आहे.
उत्तर-पश्चिम मुंबई : उबाठा गटाकडून अमोल कीर्तीकर यांना आज पक्षाचा एबी फॉर्म मिळाला. तिथेच, महायुतीचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही. शिवसेनेने रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्याची तयारी केली असली, तरी त्यांच्या नावाला मनसे आणि भाजपाचा विरोध आहे.
पालघर : उबाठा गटाकडून भारती कामडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, महायुतीकडून राजेंद्र गावीत यांना उमेदवारी नेमकी कोणत्या पक्षातून द्यायची हा निर्णय व्हायचा आहे.
नाशिक : उबाठा गटाकडून राजाभाऊ वाझे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर होऊ शकला नाही.