सीईओ वाघमारे यांनी घेतली कर्तव्यदक्ष अधिकारी, कर्मचार्‍यांची दखल

जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीत लावले फलक

    दिनांक :03-Apr-2024
Total Views |
वाशीम, 
CEO Waghmare जिल्हा परिषदेअंतर्गत उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचा पायंडा मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी पाडला असून मार्च महिन्यात उत्कृष्ट कामगिरी बजावणार्‍या कर्मचार्‍यांचे अभिनंदन करणारा फलक जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीत झळकला आहे.
 
ceo
 
 
फेब्रुवारी महिन्यात रिसोड तालुका आरोग्य अधिकारी रामहरी बेले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुहास कोरे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, सहाय्यक गटविकास अधिकारी उदय जाधव आणि मंगरूळपीर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रवींद्र सोनोने या सहा अधिकार्‍यांनी आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्यामुळे ते सी. ई.ओ. यांचे उत्कृष्ट अधिकारी ठरले होते. त्यांच्या कामाची दखल घेणारे पोस्टर्स मार्च महिन्यामध्ये जिल्हा परिषदेच्या इमारतीत झळकले होते. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत घरकुलाचे उत्कृष्ट काम करणारे घरकुलाचे इंजिनियर (आर.एच. इ.) यांचे अभिनंदन करणारे बॅनरही जिल्हा परिषदेत लावण्यात आले होते.कितीही चांगले काम करा शासकीय पातळीवर त्याची दखल कुणी घेत नाही असा सर्वसाधारण समज रूढ झाला आहे. हा समज वाशिम जिल्हा परिषदेने हद्दपार केला असल्याचे दिसून येत आहे. आता नुकतेच मार्च महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे कर्मचारी यांचे अभिनंदन करणारे फलक जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसमोर लावण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा परिषद शाळा साखरा येथील शिक्षक विनोद झनक, दिगंबर घोडके आणि जि. प. शाळेचे शिक्षक संतोष इढोळे यांचा समावेश आहे.कारंजा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शंकर नांदे यांच्या कामाची दखल घेण्यात आली आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्रतज्ञ डॉ. आशिष बेदरकार आणि डॉ. अविनाश पुरी यांनी डोळ्यांच्या सर्वाधिक शस्त्रक्रिया केल्याबद्दल त्यांनाही या फलकामध्ये मानाचे स्थान देण्यात आले आहे. मुख्यालयामध्ये कार्यरत असणारे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहायक प्रकल्प संचालक सचिन गटलेवार विस्ताराधिकारी मदन नायक यांच्यासह संपूर्ण स्टाफचे सीईओंच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.CEO Waghmare भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात भाग घेऊन राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल शाळेतील मुख्याध्यापकासह संपूर्ण शिक्षकांचे व कर्मचार्‍यांचेही अभिनंदन करण्यात आले आहे. पंचायत विकास निर्देशांकामध्ये वाशीम जिल्हा राज्यातून पहिला आल्याबद्दल उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांच्या मार्गदर्शनात मंगरुळनाथ विस्तार अधिकारी भाऊराव बेलखेडकर यांच्यासह सर्व गट विकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांचाही सन्मान करण्यात आला आहे.जिल्ह्यामधील अंगणवाड्या बोलया करण्यासाठी परिश्रम घेणार्‍या टीमवरही जिल्हा परिषदेच्या वतीने कौतुकाची थाप मारण्यात आली आहे. यामध्ये विस्तार अधिकारी मदन नायक, पर्यवेक्षिका मीनाक्षी सुळे, सविता दराडे, चीफ मिनिस्टर फेलो विनिता उगावकर आणि फाईन आर्टिस्ट असलेले धम्मदीप भगत यांचा समावेश आहे.