Vaishali Darekar : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी आणखी चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यात कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना संधी देण्यात आली आहे. जळगावमधून करण पवार, हातकणंगलेतून आबा पाटील व पालघर लोकसभा मतदार संघातून भारती कामडी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. कल्याण मतदारसंघात मु‘यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार असून, त्यांनाच यावेळीही उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कल्याणमध्ये शिंदे विरुद्ध दरेकर यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.
Vaishali Darekar : उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले, मी शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांना परत शिवसेनेत घेणार नाही. प्रत्येकाने अनुभव घ्यायचा आहे, त्यांचा गुरू अनुभव शिकवेल. यावेळी कल्याण मतदारसंघात दरेकर मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, आमच्या दोघांच्या आजोबांचा ऋणानुबंध होता. आपण हुकूमशाहीविरोधात एकत्र आलो होतो. आज आमचे जमले नाही, भविष्यात जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नये.
कोण आहेत वैशाली दरेकर?
- 2009 मध्ये वैशाली दरेकर या मनसेकडून लोकसभा निवडणुकीला उभ्या होत्या, त्यांना एक लाखांहून अधिक मते मिळाली होती.
- 2010 मध्ये कल्याण डोंबिवली मनपामध्ये मनसेतर्फे नगरसेविका म्हणून निवडून आल्या त्यानंतर त्यांच्याकडे विरोधीपक्ष नेतेपद आले.
- 2009 च्या अगोदर त्या शिवसेनेत होत्या. त्यानंतर मनसेत गेल्या व पुन्हा शिवसेनेत आल्या.