मुंबई उत्तर-पश्चिममधून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

    दिनांक :30-Apr-2024
Total Views |
मुंबई, 
शिवसेनेचे जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार Rabindra Waikar रवींद्र वायकर यांना मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतची घोषणा करण्यात आली. मुंबई उत्तर-पश्चिममध्ये शिवसेनेचा खासदार असल्याने हा मतदारसंघ स्वाभावीकपणे शिवसेनेकडे गेला. येथील विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर शिवसेनेत असले तरी, त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर सध्या ठाकरे गटात असून, या क्षेत्रातून ते उबाठा गटाकडून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे कदाचित शिवसेनेने मुलाच्या विरोधात वडिलांना उमेदवारी देणे उचित समजले नसावे किंवा वडीलदेखील त्यासाठी तयार नसावेत. अशी शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेने अन्य उमेदवारासाठी चाचपणी सुरू केली होती.
 
 
Rabindra Waikar
 
अखेर याच लोकसभा क्षेत्रात येणार्‍या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातून 2009, 2014 आणि 2019 असे सलग तीन वेळा निवडून येणार्‍या रवींद्र वायकरांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. वायकर तब्बल 20 वर्षे मुंबई महापालिकेचे नगरसेवक राहिले असल्याने त्यांना राजकाराणाचा दांडगा अनुभव आहे. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात महायुतीची ताकद मोठी आहे. या मतदारसंघात सहा विधानसभेपैकी तीन ठिकाणी अमित साटम, भारती लव्हेकर, विद्या ठाकूर हे भाजपाचे तर एका क्षेत्रात स्वतः रवींद्र वायकर आमदार आहे. त्यामुळे सहापैकी 4 आमदार महायुतीचे असून, सुनील प्रभू आणि ऋतुजा लटके हे दोन महाविकास आघाडीचे आहेत. तुलनेने बघता महायुतीचे पारडे येथे जड आहे. आता शिवसेनेचे रवींद्र वायकर विरुद्ध उबाठाचे अमोल कीर्तीकर अशा दोन शिवसैनिकांमध्ये लढत असून, यात वायकरांसमोर अमोल कीर्तीकर हे नवखे आहेत. शिवाय शिवसेनेचा मतदार आणि स्वतः त्यांचे वडील गजानन कीर्तीकर हे दोन्ही वायकरांच्यासोबत असल्याचे चित्र आजघडीला असल्याने अर्धे मैदान Rabindra Waikar वायकरांनी आधीच मारल्यात जमा आहे.