पराभवाच्या भितीने संभ्रमाच्या राजकारणाची केविलवाणी धडपड!

* काँगे्रसच्या अर्धवट चित्रफितीचा भोंगळे यांनी घेतला समाचार

    दिनांक :09-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर, 
BJP leader Devrao Bhongle : विकासाची दृष्टीच नसलेले काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते जनतेची दिशाभूल करून मतं मागतात, ही नवीन बाब नाही. मात्र आता तर सारी हद्दच पार करीत, सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल करून काँग्रेसने त्यांची संकुचित मानसिकता दाखवली आहे, असा घणाघाती आरोप करीत या कृतीचा निषेध भाजपचे नेते देवराव भोंगळे यांनी नोंदवला आहे.
 
 
bhongle
 
सोमवार, 8 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशाल जाहीर सभा चंद्रपुरात पार पडली. या सभेमध्ये चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार याचे जोरदार भाषण झाले. या भाषणाचा अर्धवट व्हिडिओ काँग्रेसकडून व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. काँग्रेसच्या या कृतीचा भोंगळे यांनी परखड शब्दात समाचार घेतला.
 
 
ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या विशाल सभेमध्ये उपस्थित लाखोंचा जनसमुदाय पाहुन काँग्रेसला पराभवाची भिती वाटू लागली आहे. सभेत मुनगंटीवार यांनी, काँग्रेसच्या ‘हुकूमशाही विरुद्ध लोकशाही’ च्या पोस्टरबाजीला उत्तर देताना आणीबाणीच्या काळातील अत्याचार, निरपराध लोकांना तुरुंगावास यासह 1984 ला सर्वसामान्य शीख समाजबांधवांवर झालेले काँग्रेसच्या राजवटीतील जनतेवर झालेल्या अत्याचारांचा पाढा वाचत होते. मात्र, मुनगंटीवार यांच्या या संपूर्ण भाषणाचा विशिष्ट भाग काढून करून व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. काँग्रेसने या भाषणाचा या संदर्भातील पूर्ण व्हिडिओ वायरल करायला हवा होता. परंतु, त्यांनी आपल्या सोयीनुसार विशिष्ट 23 सेकंदाचा व्हिडिओ वायरल केला. जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याची केविलवाणी धडपड करीत असलेल्या काँग्रेसने ‘सच्चाई बदल नहीं सकती, आपकी झुठी व्हिडिओबाजी से और नौटंकी से’ हे लक्षात ठेवावे, असा सज्जड इशाराही भोंगळे यांनी दिला आहे.
 
महिला काँग्रेसतर्फे निषेध
 
 
मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात जे भाष्य केले निषेध म्हणून, मंगळवारी शहरातील गांधी चौकात महिला काँग्रेस पदाधिकार्‍यांनी आंदोलन केले. या निषेध आंदोलनात काँगे्रस पक्षाच्या महिलांचा सहभाग होता.