तभा वृत्तसेवा
मुंबई,
Dr. Raju Waghmare : काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी पक्षातील गलिच्छ राजकारणारला कंटाळून काँग्रेसला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला.
काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, राजू पारवे, संजय निरुपम, बाबा सिद्धीकीसारख्या बड्या नेत्यांनी साथ सोडल्यानंतर आता काँग्रेसची बाजू जोरकसपणे माध्यमांसमोर मांडणारे राजू वाघमारे यांनी काँग्रेसमधील अंतर्गत गलिच्छ राजकारणाला कंटाळून पक्षाला रामराम ठोकला. लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर काँग्रेसला एकामागून एक असे हादरे बसू लागले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेचे उपरणं टाकून, भगवा ध्वज देऊन राजू वाघमारे यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी राजू वाघमारे म्हणाले की, काही नेत्यांच्या गलिच्छ राजकारणामुळे पक्षाची अवस्था वाईट झाली आहे. काँग्रेस पक्ष आता उद्धव ठाकरे यांच्या हाताखाली दबलेला आहे. सांगली आणि भिवंडी येथील जागेबाबत असाच निर्णय झाला. सांगलीची जागा शिवसेनेने जाहीर केली. भिवंडीची जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली. या सर्व प्रकाराचा परिणाम माझ्यावर झाला आहे. यामुळे मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी विकास काय आहे, हे दाखवून दिले आहे. त्यांनी कमी वेळेत राज्याचा मोठा विकास केला आहे.
हिंदुधर्म सर्वांत सहिष्णु
काँग्रेसमध्ये धर्मनिरपेक्ष विचारधारेवर चालणाऱ्या राजू वाघमारेंना एकदम विरोधी हिंदूत्ववादी विचारधारेत काम करणे जमेल का? याबाबत विचारलेल्या प्रश्नावर वाघमारे म्हणाले, काँग्रेसमध्ये आम्ही होतो, तेव्हा हिंदूत्व सोडलेले होते, असे म्हणणे योग्य होणार नाही. काँग्रेसमध्येही आम्ही आपल्या धर्माचे पालन करीतच होतो. या देशात ८० टक्के हिंदू आहेत. हिंदूधर्म हा सर्वांना सामावून घेणारा आहे. सर्वात सहिष्णु आहे, त्यामुळे न जमन्यासारखे काही नाही.