तभा वृत्तसेवा
अचलपूर,
Pandit Pradeep Mishra : भगवान शंकरांचा पार्वती मातेसोबत विवाह झाला, त्यावेळी त्यांनी मातेला नंदीवर बसवून म्हणजे धर्मावर स्वार होऊन सोबत कैलासावर नेले होते. आज प्रत्येक विवाहित स्त्रीने फक्त पत्नी म्हणून नव्हे तर धर्मपत्नी म्हणून सहवास करावा. लग्न झाल्यावर पतीसोबत धर्मपत्नी म्हणून सर्व जबाबदार्या पार पाडाव्या, असे आवाहन पं. प्रदीप मिश्रा यांनी शिवमहापुराण कथेच्या पाचव्या दिवशी केले.

परतवाडा शहरात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचा शुक्रवारी पाचवा दिवस होता. गुरूवारी रात्रीच्या सुमारास परतवाडा अचलपूर शहरासह कथेच्या ठिकाणीही हलका पाऊस आला होत . त्यामुळे परिसरात चिखल निर्माण झाला होता. परंतु सकाळी कथा सुरू होण्याआधीच सर्व वातावरण निवळले होते. पाचव्या दिवशी भगवान महादेव-पार्वती मातेच्या विवाह संस्काराची कथा सांगताना ते म्हणाले की, शंकरांनी पार्वती मातेशी विवाह करून त्यांना आपल्या नंदीवर म्हणजेच धर्मावर स्वार करून कैलासावर नेले होते. शंकराचे वाहन म्हणजे नंदी ! नंदीची परिभाषा सांगताना महाराज म्हणाले की, विवाह संस्कार झाल्यानंतर महिलांनी फक्त पत्नी म्हणून राहू नका तर धर्मपत्नी म्हणून सहवास करा. पती जसा असेल तसा त्याच्या घरी सुख, सुविधा, भौतिक गरजा पूर्ण होत नसल्या तरी धार्मिक विधीप्रमाणे पती-पत्नीत्व स्वीकारल्यानंतर धर्मपत्नी म्हणून वावरताना त्याच्या घरातील मंडळी आई, वडील, बहीण, भाऊ असा सर्वांचाच आदर करा. सर्वांशीच नाते जुळवा. भौतिक सुखाची आस केल्यामुळेच सुखी संसारात द्वेष निर्माण होतो. त्यामुळे पत्नी होऊन चालणार नाही तर धर्मपत्नी होऊन सहवास करा, असे ते म्हणाले.
खा. बोंडे यांच्यासह दिग्गजांची हजेरी
दरम्यान, निवडणूक प्रचारार्थ व्यस्त असलेले खा. डॉ. अनिल बोंडे यांनी शिवमहापुराण कथास्थळी कथा श्रवण केली. यावेळी आमदार रवी राणा देखील उपस्थित होते. मंचावरून भाविकांकडून महाराज व आयोजकांचे आभार व्यक्त करताना ते म्हणाले की देशातील धर्म रक्षणाचे काम पंडित प्रदीप मिश्रा करीत असून प्रत्येक हिंदू भाविकाला, लहानापासून वृद्धापर्यंत प्रत्येकाला मंदिराची वाट दाखविण्याचे कार्य करणार्या पं. प्रदीप मिश्रा यांचा संपूर्ण हिंदू धर्म, देश आभारी राहील असेही ते म्हणाले.