संत प्रबोधन
- प्रा. डॉ. हरिदास आखरे
संत ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’मध्ये जे तत्त्वज्ञान सांगितले. ज्या भागवत धर्माचा पाया घातला, त्या भागवत धर्माचे तत्त्वज्ञान एकूणच महाराष्ट्रभर व महाराष्ट्राबाहेर पोहोचविण्याचे जिकिरीचे काम ज्यांनी केले व वारकरी संप्रदायाला खरे प्रचारक म्हणून लाभले ते Saint Namdev संत नामदेव. ते एक आगळे वेगळे अलौकिक प्रचारकार्य करणारे संत होत.
ज्ञानदेवे रचिला पाया । उभारले देवालया ॥
नामा तयाचा किंकर । जेणे केला हा विस्तार ॥
नाथ दिला भागवत । तोच मुख्य आधार ॥
तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ॥
असे संत बहिणाबाई एका सुंदर अभंगामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा वर्णन करतात. त्यामध्ये Saint Namdev संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांनी स्थापन केलेल्या भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत नेऊन त्याचा विस्तार करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. प्रचाराची महत्त्वाची भूमिका त्यांच्याकडे होती. ‘शतकोटी अभंग करीन’ ही त्यांनी केलेली प्रतिज्ञा. त्यांच्या नावावर जवळजवळ अडीच हजार अभंग आहेत. मराठवाड्यातील नरसी बामणी या गावातील संत नामदेवांचे आई-वडील दामाशेटी व गोणाई यांचे कुटुंब पंढरपूरला स्थायिक झाले. मुळातच विठ्ठल भक्त असणारे संत नामदेव व त्यांचा परिवार हे सर्वजण अभंग रचित. विठ्ठलाच्या भक्तीची ओढ त्यांना पंढरपूरपर्यंत घेऊन गेली. शके 1213 मध्ये संत नामदेव व संत ज्ञानेश्वरांची आळंदी येथे भेट झाली. संत ज्ञानेश्वरांशी झालेल्या चर्चेतून त्यांनी औंढा नागनाथ येथील विसोबा खेचर यांना गुरू मानले आणि ‘नामा कच्चा’ असा दिलेला शेरा त्यांनी विसोबा खेचर्यांना गुरू मानून तो नामा अध्यात्मामध्ये पक्का केला. त्यानंतरच अद्वैत तत्त्वज्ञान त्यांनी प्रमाण मानले.
संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांसोबत तीर्थावळी केली. संपूर्ण भारतभर भ्रमण करून त्यांनी संत ज्ञानेश्वरांना सोबत दिली. त्या काळात त्यांनी अनुभवलेले समाजजीवन, धर्मकार्य एकूणच सामाजिक परिस्थिती त्यांना अनुभवता आली. त्यातून त्यांनी धर्मप्रचाराचे कार्यसुद्धा हाती घेतले. जेव्हा संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेतली, तेव्हा संत नामदेव त्याठिकाणी हजर होते. संत ज्ञानेश्वरांनी जो धर्मविचार ‘ज्ञानेश्वरी’मध्ये मांडला होता, तो समाजापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांनी संत नामदेवावर सोपविली होती. शेवटच्या क्षणी संत ज्ञानेश्वर संत नामदेवांना असे म्हणतात, ‘‘नामदेवा हा धर्मविचार तुला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. त्याचा प्रसार करण्याचे कार्य तुला करायचे आहे. आता मी जातो. परंतु, राहिलेले माझे कार्य तुम्हाला पूर्ण करायचे आहे.’’
नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ॥
असा अध्यात्म विचार भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत Saint Namdev संत नामदेवांनी या भागवत धर्माचा प्रचार सुरू केला. प्रदेशच्या प्रदेश ओलांडत ते पंजाबपर्यंत पोहोचले. तेथे गुरुदासपूर जिल्ह्यात घुमान येथे नामदेवांनी आपल्या मठाची स्थापना केली. त्यांनी तब्बल 20 वर्षे पंजाबात भ्रमण केले. आपल्या धर्माचा प्रसार व प्रचार केला. प्रवासाची कोणतीही साधनं नव्हती. शासनाकडून कोणतेही मानधन नाही. तरीही हा आगळावेगळा संत आपला धर्मविचार या प्रांतातून पंजाबपर्यंत पोहोचवतो. यामध्ये त्यांची प्रचारकाची भूमिका आपल्याला प्रत्ययास येते. अतिशय सामान्य परिस्थितीत आपले ध्येय जर निश्चित असेल तर आपण आपला विचार परप्रांतामध्ये जाऊनही रुजवू शकतो, असा विचार संत नामदेवांनी आपणा सर्वांना दिला. प्रचार करताना भाषेची अडचण येत होती. तेव्हा पंजाबी भाषा शिकण्याचे धारिष्ट्य त्यांनी ठेवले. त्यांची मधूर वाणी आणि तितकेच त्यांचे शुद्ध आचरण पाहून मोठ्या संख्येत पंजाबी लोकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. नामदेवांनी हिंदी भाषेतदेखील अभंग रचना केल्या. त्यांची सुमारे 125 हिंदी पदे आज उपलब्ध आहेत. त्यापैकी 61 पदे शिखांच्या पवित्र मानल्या जाणार्या ‘गुरुग्रंथ साहेब’मध्ये समाविष्ट आहेत. ती ‘संत नामदेवजी की मुखबाणी’ या नावाने प्रसिद्ध आहेत.
पंजाबात नामदेवांची अनेक मंदिरे उभारली गेली. त्यातून त्यांचा मोठेपणा सिद्ध होतो. आजही घुमान येथे माघ महिन्याच्या शुद्ध द्वितीयेला मोठी यात्रा भरते. त्यांनी मराठीत विपूल अभंग रचना केली आहे. ‘शतकोटी अभंग करीन’ ही त्यांची प्रतिज्ञा होती. परंतु, त्यांच्या अभंगांची संख्या आज सुमारे अडीच हजार एवढी आहे. त्यांच्या अभंगात आत्मचरित्रपर अभंग, संत ज्ञानेश्वर चरित्रपर अभंग आणि परमार्थिक, आत्म निवेदन अभंग असे प्रकार त्यांच्या अभंगांमध्ये पाहायला मिळतात. ज्ञानेश्वरांनंतर 54 वर्षे नामदेव धर्मप्रसाराचे काम करीत होते. म्हणून बहिणाबाईंनी त्यांना विस्ताराची भूमिका म्हणून त्यांचा गौरव केला आहे.
त्यांच्या समकालीन असलेल्या संत जनाबाई ह्या दासी म्हणून काम करायच्या. जनाबाईंनी संत नामदेवांचे शिष्यत्व पत्करले होते. घरात पडेल ते काम करावे, अभंग रचावे आणि संत नामदेवांच्या अभंग रचनेमध्ये मदत करावी, हे संत जनाबाईंचे कार्य होते. यातून Saint Namdev संत नामदेवांनी स्त्री संतांना दिलेला लेखणीचा अधिकार अतिशय स्पष्ट होतो. ज्या काळात स्त्री बंदिस्त होती, त्या काळात संत विचाराने स्त्रियांना लिहिण्याचं बळ दिलं, हेसुद्धा जनाबाईच्या रूपाने या ठिकाणी स्पष्ट होते. संत नामदेवांचे समकालीन संत म्हणजे गोरा कुंभार, नरहरी सोनार, सावता माळी, संत चोखामेळा हे होत. त्यांनीही अभंग रचना केली आहे. नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांचे चरित्र आदी, तीर्थावडी व समाधी या तीन प्रकरणात लिहिले आहे. ‘नामदेवांची गाथा’ हे ज्ञानेश्वरांच्या चरित्राचे एक महत्त्वाचे साधन असून ‘ज्ञानेश्वरांचे समकालीन ज्ञानेश्वर चरित्रकार’ म्हणून संत नामदेवांचा गौरव केला जातो. वयाच्या 81 व्या वर्षी म्हणजेच शके 1272 मध्ये संत नामदेव यांनी पंढरपूर येथे समाधी घेतली.
संत नामदेवांचा भक्ती संदेश
‘माता, पिता, बंधू, कुलगुरू, दैवत, सखा सर्व गोत केशिराज’ अशी त्यांची अवस्था ईश्वरभक्तीच्या ओढीमुळे झाली होती. जीवनव्यापी रूढी पुढे जिथे मातृ, पितृभक्ती सर्वस्वी महत्त्व शून्य बनली.
‘अमृताहुनी गोड नाम तुझे देवा’ अशी संत नामदेवांच्या मनाची अवस्था झाली होती. त्यांच्या दृष्टीने उघडच मानवी जीवनातील सर्व गोडी प्रभू नामामध्ये साठवलेली आहे. केशिराजाचे चरणरज होण्याच्या भाग्याचा सूर्य त्यांच्या जीवनात केव्हाच उगवल्यामुळे क्रिया, कर्म, धर्म, जातिभेद या सर्व गोष्टी त्यांच्या प्रत्ययी अस्तंगत झाल्या आणि गटात ठेवलेल्या होत्या.
ज्याची यारे मन देखीयेले तुझे,
त्याची लोक लाज मावळली
नाही तया क्रिया, नाही तया कर्म,
वरना श्रम धर्म सुखदुःख
नाही देहस्फूर्ती जाती, कुळ भेद,
अखंड आनंद येक्यतेचा
नामा म्हणे त्यांचे चरणरज व्हावे,
हेची भाग्य द्यावे केशिराज
नामदेवांच्या मनाचे सर्व व्यापार सदैव ईश्वरभक्तीचा अलौकिक स्तराशी संलग्न राहिलेले असली, तरी लौकिक पातळीवरील एक शल्य त्यांना बोचत असल्याचे दुःख त्यांच्या अभंग वाणीतून सातत्याने प्रकट झालेले दिसते. ही यादी हिनतेचे दुःख यातील ते पायी वाट्यास येणार्या सामाजिक विटंबनेचे दुःख मांडतात.
Saint Namdev : साखरभाताचा मधुर आस्वाद घेत असताना त्यात मधूनच एखादा मातीचा खडा लागावा अथवा सुरेल एखादे गीत ऐकत असताना त्यातूनच विरस उत्पन्न व्हावा. एखादा बदलून पाणी पडावा, अशा प्रकारे त्यांच्या मनात आधारभूत असलेली यातिहिनता व सामाजिक विषमता यांच्या कटू जाणिवेने ते अस्वस्थ झालेले आहेत. ती त्यांनी आपल्या अभंगातून सातत्याने व्यक्त केली आहे. जातीयतेचे दुःख त्यांच्या मनात सातत्याने दुखत राहते. ‘हीन जाती प्रभू काही मोरी करी’ ही त्यांची व्यथित गाथा अंत:करणाने विचारलेला प्रश्न आहे. भक्तहीन जाती जन्माला येतात, ही खरे पाहता अर्थपूर्ण घटना आहे. हीन जातीत जन्मल्यामुळेच दुःख येतात. जातीतल्या अंतर्मुख कृतीच्या नम्र सत्त्व माणसाला देवाजवळ अधिक ताकदीने नेणारे आहे आणि देवाने ही कर्मठ अहंकारी विरुद्ध हीन जातीच्या भक्ताची कडकडून बाजू घेतली आहे, असा त्यांचा अनुभव आहे.
‘हीन दीन जात मोरी पंढरीके राया,
ऐसा तुमने दर्जी कायक बनाया’
असे आपल्या जाती हिनतेबद्दल ते भगवंताशी भांडण करताना दिसतात. परंतु, संत नामदेवांची भक्ती इतकी ताकदीची होती की, जिकडे नामदेव तिकडे देवाने देऊळ फिरवावे, हे स्वाभाविकच आहे. कारण, ‘मी तो भक्तरूप, भक्त माझे स्वरूप, प्रभा आणि दीप जया परी’ असे देवाचे स्पष्ट सांगणे आहे. ‘त्या देख देखताही दृष्टी मन माझे निवे वाटे त्या घालावे हृदया माझी’ इतकी देवाचे नामदेवाचे अपरंपार प्रेम होते. ‘सृष्टीही पै बुडे तरी न सोडी तुझ’ इतकी नामदेवांना देवाची असाधारण ओढ आहे. पुन्हा विशिष्ट मूर्ती म्हणजेच देव, असा भाव त्यांचा कदापिही नव्हता. संकुचित संकल्पनेचा संदुकीत न पडणे इतकी त्यांची ईश्वराविषयीची श्रद्धा व्यापक व विशाल होती. सोबतच सुजाणसुद्धा होती.
सबाह्य अभ्यंतरी स्वरूप कोदले द्वैत निरसले दृश्यकारे
अशा प्रकारच्या अनुभवाचे अमृत पान Saint Namdev संत नामदेवांनी केलेले आहे. ‘देवावीन ओस स्थळ नाही’ अशी त्यांची प्रचीती आहे. ‘सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझे रूप पूर्ण’ असा त्यांना अद्वैत तत्त्वज्ञानाचा साक्षात्कार झालेला आहे. खर्या भक्तीमुळे त्यांच्या ठिकाणी निर्मळ अद्वैत दृष्टी उदयास आलेली आहे. आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी भक्तीचा साररूप आहे तोच त्यांनी आपल्या प्रचार कार्यातून मांडला. अलौकिक भागवत धर्माच्या ज्ञानसाधनेच्या प्रचाराचे कार्य महाराष्ट्र देशीचे तत्त्वज्ञान, भक्ती परंपरा पंजाबपर्यंत घेऊन जाणारे त्यांचे अलौकिक कार्य आहे. त्यामुळेच प्रांतभेदाची, भाषावादाची बंधने तोडून टाकणारा हा संत आहे. संतांचा हा विश्वबंधुत्वाचा विचार संत नामदेवांनी भारतभर पोहोचवला आहे.
- 7588566400