अवकाळीची डोकेदुखी!

    दिनांक :11-May-2024
Total Views |
वेध
- दीपक वानखेडे
Unseasonal rain : खेडेगावांत मातीच्या घरात राहणारी साधीसुधी माणसं, शेतात काबाडकष्ट करून पोटाला लागेल तितकीच खाणारी, बचत करून संसाराचा गाडा चालवणारी, आपल्या साध्यासुध्या बोलीभाषेतून सर्वांना प्रेम वाटणारी, अंगावर फाटकं पण ते नीटनेटकं शिवून कपडे घालणारी स्वाभिमानी माणसं आताशा शहरांत वस्ती करून राहणार्‍या आधुनिक प्रगतिशील लोकांना अडाणी वाटू लागली आहेत. ती माणसं जी निसर्गाच्या अगदी जवळ आहेत आणि त्यांनी अगदी पूर्वीपासून निसर्गाशी मैत्री करून, त्याच्याशी एकरूप होऊन जीवनाची दिशा ठरवली, ज्यांनी निसर्गाच्या रागा-लोभाचा अभ्यास केला. या निसर्गाचा र्‍हास होऊ नये, पुढच्या पिढीसाठी ही नैसर्गिक संपत्ती अबाधित राहावी, पुढच्या पिढीसाठी पाण्याचे नैसर्गिक स्रोत शाबूत राहावेत, या आकाशउंचीच्या विचारांनी या निसर्गाला तन्मयतेनं जपलं, त्या लोकांना आताच्या पिढीने वाळीत टाकल्यासारखं केलं आहे. निसर्ग ज्यांच्या झोपडीत पावसाच्या थेंबांच्या रूपानं प्रवेश करायचा, वार्‍याच्या रूपाने या माणसांशी हितगूज करायचा, त्या माणसांना आता सर्वांनी दूर लोटल्यामुळे की काय, निसर्ग कोपल्यासारखा वागतोय्. गेल्या काही दिवसांत सर्वांनी हे अनुभवलं आहे.
 
 
Unseasonal rain
 
मार्चच्या उत्तरार्धात सुरू झालेला उन्हाळा जूनच्या पूर्वार्धात संपायला येत होता. उन्हाळ्याच्या या दिवसांची एक खास ओळख होती. फळांचा राजा असलेल्या आंब्याची चव प्रत्येकाच्या जिभेवर रेंगाळत राहायची. उन्हाळ्याचा सुट्ट्यांचा हंगाम, घरोघरी चालणारे वाळवण असा हा एकंदर काळ राहायचा. पण ते निदान या उन्हाळ्यात तरी कुठेच दिसत नाहीये. ‘तीन दिवस उन्हाचे, चार दिवस पावसाचे’ असा काहीसा खेळ आता सुरू आहे; आणि पाऊसही साधासुधा नाही तर वादळी वारे आणि विजांचा कडकडाट! एकीकडे हा निसर्ग आहे तर दुसरीकडे माणसाची प्रगती. त्या प्रगतीच्या जोरावर आपण कसेही वागलो तरी विजय आपलाच आहे, हा भ्रम माणसांना आहे. मनुष्याने कितीही प्रगती केली तरी निसर्गाला मर्जीत घेता येत नाही, त्याला ताब्यात करू शकत नाही, हे मागील काही दशकात जगभरातील अनेक नैसर्गिक प्रकोपाने दाखवून दिले आहे. निसर्गावर आक्रमणकेल्यास निसर्ग या ना त्या रूपात चोख प्रत्युत्तर देतोच. याउलट त्याचे संतुलन राखल्यास तो मदतही करतो.
 
 
Unseasonal rain : गेल्या काही दिवसांपासून अवकाळीची ही डोकेदुखी तीव्र रूप धारण करीत आहे. त्यामागे एखादे हवामानशास्त्रीय कारण असेलही. पण वाढते प्रदूषण आणि बिघडलेली मानवी जीवन पद्धती हेही प्रमुख कारणांपैकी एक आहे. कोरोना काळात वाहने व औद्योगिक कारखाने बंद असल्यामुळे प्रदूषणात प्रचंड घट झाली होती, हे आपण विसरता कामा नये. निसर्ग संगोपनाशिवाय दुसरा पर्याय नाही, हे आजवरच्या अनेक अनुभवांवरून मानवाच्या लक्षात आले पाहिजेे. पर्यावरण र्‍हासाची सुरुवात 18 व्या शतकात औद्योगिक क्रांती घडून आल्यानंतरच सुरू झाली. हेच पर्यावरण व मानव यांच्यामधील विसंवादाचे महान पर्व ठरले. औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणीय संपदाच्या वापराला गती मिळाली. औद्योगिक क्रांतीनंतरच पर्यावरण आणि मानव यांच्यातील प्रस्थापित सुसंवाद नष्ट होण्यास सुरुवात झाली होती. शहरे वाढू लागली, मानवाचे राहणीमान उंचावले, गरजा व मागण्यांत वाढ झाली. मानवी विकासाच्या वाटचालीमध्ये पर्यावरणातील प्राणी, वनस्पती, हवा, मृदा, जमीन या संपदांवर अतिरिक्त ताण वाढत गेला. शहरीकरण व औद्योगिकीकरण यामुळे हवा, पाणी, जमीन इ. मध्ये अनेक दूषित व रासायनिक द्रव्यांचे प्रमाण वाढून पर्यावरणाचे प्रदूषण, ही गंभीर समस्या निर्माण झाली.
 
 
Unseasonal rain : पर्यावरणावर होणारा मानवी आघात एवढा जबरदस्त आहे की, जीवसृष्टीमध्ये त्यामुळे विस्कळीतपणा निर्माण होतो. मानवी क्रियांचा आघात निसर्गापेक्षा जास्त असल्याने भविष्यामध्ये ही पृथ्वी मानवास अन्न पुरवू शकेल की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. मानवाने दूरदृष्टीने, शहाणपणाने आपले कौशल्य निसर्गाच्या संमतीने उपयोगात आणले तर पर्यावरणात आघात होणार नाहीत व भविष्यकालीन मानवी जीवन निश्चितच सुखकारक बनेल. सध्या पर्यावरणातील जीवसमूहांचे परस्परावलंबीत्व धोक्यात येऊ लागले आहे. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम मानवावरच होणार आहे. हा धोका टाळण्यासाठी मानवाने पर्यावरणाच्या रक्षणासाठी कठोर उपायांचा अवलंब करणे, ही काळाची गरज आहे. पर्यावरणाचे संतुलन कायम राहावे, यासाठी सरकार अनेक उपाययोजना करीत आहे. पण त्याला लोकांचा पाठिंबा हवा आहे. प्रत्येक माणूस रोजचे जीवन जगताना पर्यावरणाचे नुकसान होऊ नये, या द़ृष्टीने जागरूक राहणे गरजेचे आहे. नाहीतर हवामान खात्याने सांगितले म्हणून अवकाळी येत आहे, असे गृहीत धरून आपण बिनधास्त पर्यावरणाचा र्‍हास, प्रदूषण करीत राहिलो तर एक दिवस अवकाळीची ही डोकेदुखी आपलं डोकं कायमच फोडल्याशिवाय राहणार नाही. 
 
- 9766486542