महाग आरोग्य विमा आणि बरंच काही...

    दिनांक :12-May-2024
Total Views |
अर्थचक्र
- महेश देशपांडे
सामान्यांच्या दृष्टीने सरत्या आठवड्यातील महत्त्वाची बातमी म्हणजे Health insurance आरोग्य विम्याचा हप्ता महागणार आहे. याखेरीज विमान प्रवासात जादा सामान नेल्यास खिशावर अतिरिक्त भार पडणार असल्याचीही वार्ता आहे. दरम्यान, बासमती तांदळाच्या निर्यातीचा विक्रम झाला असून रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीत वाढ नोंदविण्यात आली आहे. विमा नियामक प्राधिकरणा (इर्डा) ने नुकतेच आरोग्य विम्याच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. यानंतर विमा क्षेत्रात काही बदल होऊ शकतात. त्याचा परिणाम भविष्यात विम्याच्या हप्त्यावर दिसू शकतो. नवीन नियमानुसार आता काही आजारांसाठी विमा दावा घेण्यासाठी जास्तीत जास्त तीन वर्षे वाट पाहावी लागणार आहे. पूर्वी ही मुदत चार वर्षे होती. ‘इर्डा’ने केलेल्या बदलांनंतर विमा कंपन्या वेगवेगळ्या पॉलिसींच्या प्रीमियममध्ये बदल करण्याच्या विचारात आहेत. ‘आयसीआयसीआय प्रुडेंशियल स्मार्ट लाईफ’सह ‘स्मार्ट किड’ पॉलिसीच्या प्रीमियममध्ये 7.5 टक्क्यांवरून साडेबारा टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ‘एचडीएफसी अर्गो’ने कंपनीला सरासरी प्रीमियम 7.5 टक्के ते 12.5 टक्के वाढवावा लागेल, असे म्हटले आहे. विमा कंपन्याही याबाबतची माहिती ई-मेलद्वारे ग्राहकांना देत आहेत. विमा कंपन्यांनी दिलेल्या माहितीमध्ये सांगण्यात आले आहे की, तुम्हाला चांगली योजना देण्यासाठी प्रीमियम दर (विम्याच्या किमती) किंचित वाढवावे लागतील. विमा योजनेच्या कामगिरीचा आढावा घेण्यासोबतच कंपन्यांनी उपचार खर्चात झालेली वाढही विचारात घेतली आहे.
 
 
health-insurance
 
‘एचडीएफसी अर्गो’ म्हणते की, प्रीमियम वाढ थोडी त्रासदायक असू शकते; परंतु आवश्यक असेल, तेव्हाच ती केली जाते. ‘इर्डा’ला माहिती देऊनच विमा हप्त्यात वाढ केली जाते. दरांमधील हा बदल नूतनीकरण प्रीमियमवर परिणाम करू शकतो. नूतनीकरणाची तारीख जवळ येईल तसतशी पॉलिसीधारकांना याबद्दल माहिती दिली जाईल. ‘एको जनरल इन्शुरन्स कंपनी’चे उपाध्यक्ष रुपिंदरजीत सिंग म्हणाले की, काही Health insurance विमा कंपन्या प्रीमियम 10 ते 15 टक्के वाढवू शकतात. ‘इर्डा’ने नुकत्याच केलेल्या बदलांमध्ये, आरोग्य विमा घेण्यासाठी वयोमर्यादा न ठेवण्याचाही प्रस्ताव आहे. यापूर्वी ही मर्यादा 65 वर्षांची होती. ते म्हणाले की, वाढत्या वयाबरोबर व्याधींचा धोका वाढतो. त्यामुळे वयानुसार प्रीमियमची रक्कमही वाढवता येते. प्रीमियम सरासरी 10 ते 20 टक्के वाढू शकतात. कारण विमा कंपन्यांना आपल्या वाढत्या खर्चाची काळजी घ्यावी लागते. भारतातील वैद्यकीय महागाईचा दर वार्षिक 15 टक्के इतका आहे. प्रीमियम वाढण्याचे ते एक कारण आहे. ऑनलाईन इन्शुरन्स ब्रोकरच्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांमध्ये देशात आरोग्य विमा घेणार्‍या लोकांकडून भरलेल्या सरासरी रकमेत लक्षणीय वाढ झाली आहे. एका अहवालानुसार, 2019 ते 2024 या काळात सरासरी रक्कम 48 टक्क्यांनी वाढून 26 हजार 533 रुपये झाली आहे. या वाढीमागे दोन कारणे दिली जात आहेत. पहिले, उपचारांच्या खर्चात झपाट्याने झालेली वाढ (वैद्यकीय महागाई) आणि दुसरे म्हणजे कोविड-19 साथीच्या आजारानंतर आरोग्य विम्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे.
 
 
Health insurance : आता आणखी काही लक्षवेधी बातम्या. अन्नधान्याच्या बाबतीत भारत आघाडीवर आहे. देशात गव्हासह तांदळाचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. देशातून मोठ्या प्रमाणात निर्यातदेखील केली जाते. दरम्यान, बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये भारत आघाडीवर आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात भारताने मोठ्या प्रमाणात बासमती तांदळाची निर्यात केली आहे. वर्षभरात निर्यातीतून भारताने 48 हजार 389.2 कोटी रुपये कमावले आहेत. पाकिस्तानच्या अडथळ्यानंतरही भारतातर्फे मोठ्या प्रमाणात तांदळाची निर्यात केली जात आहे. सौदी अरेबिया हा भारतीय बासमती तांदळाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. त्याला भारताने 10.98 लाख टन बासमती तांदूळ विकून 10 हजार 391 कोटी रुपये कमावले. एप्रिल 2023 ते मार्च 2024 दरम्यान भारताने जगातील 100 हून अधिक देशांमध्ये 52 लाख 42 हजार 511 टन बासमती तांदूळ निर्यात केला. एवढा बासमती तांदूळ कधीच निर्यात झाला नव्हता. प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात तांदळाची निर्यात झाली आहे. 2023-24 मध्ये भारताने बासमती तांदळाची मोठ्या प्रमाणात निर्यात केली असून सरासरी 1113 डॉलर प्रतिटन या दराने निर्यात केली आहे. 2022-23 मध्ये सरासरी 1050 डॉलर प्रतिटन या दराने बासमतीची निर्यात केली गेली. मागील वर्षाच्या मानाने यावर्षी तांदळाची मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या दराने निर्यात केली आहे. भारताने उरुग्वे या देशाला सर्वात जास्त दराने तांदळाची निर्यात केली आहे. 1966 युएस डॉलर प्रतिटन या दराने तांदळाची विक्री केली आहे.
 
 
Health insurance : दरम्यान, टाटा समूहाच्या ‘एअर इंडिया’ने प्रवाशांना धक्का दिला आहे. आता ‘एअर इंडिया’ने सामान नेणे महाग होणार आहे. या एअरलाईनने मोफत सामानाची मर्यादा 20 किलोवरून 15 किलोपर्यंत कमी केली आहे. ‘एअर इंडिया’चे नियंत्रण सरकारकडून घेतल्यापासून टाटा समूह ‘एअर इंडिया’ला फायद्यात आणण्यासाठी नवीन पावले उचलत आहे. सरकारच्या नियंत्रणाखाली ‘एअर इंडिया’ला अंदाजे 50 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. विमान कंपनीने ट्रॅव्हल एजंटना पाठवलेल्या अधिसूचनेत या निर्णयांची माहिती दिली आहे. ‘एअर इंडिया’ने म्हटले आहे की, इकॉनॉमी कम्फर्ट आणि कम्फर्ट प्लस श्रेणींमध्ये प्रवास करणार्‍या प्रवाशांना आता 15 किलोपर्यंतची एक हँडबॅग मोफत घेता येणार आहे. टाटा समूहाने 2022 मध्ये ‘एअर इंडिया’ विकत घेतली. यापूर्वी ‘एअरलाईन’ला ‘चेक-इन बॅगेज’ म्हणून 25 किलोपर्यंतची बॅग घेऊन जाण्याची परवानगी होती. गेल्या वर्षी ती 20 किलोपर्यंत कमी करण्यात आली होती. आता ‘डीजीसीए’ने कमाल 15 किलोची बॅग असा नियम केला. देशातील बहुतेक खासगी विमान कंपन्या केवळ 15 किलोपर्यंत मोफत ‘चेक-इन बॅग’ची परवानगी देतात. आता हाच नियम ‘एअर इंडिया’मध्येही लागू करण्यात आला आहे. ‘इंडिगो’सारख्या बजेट एअरलाईन्स प्रवाशांना फक्त एक बॅग घेऊन जाण्याची परवानगी देतात; परंतु ‘एअर इंडिया’मध्ये 15 किलोपर्यंत अनेक बॅगा घेऊन जाता येतात. विमान वाहतूक नियामक ‘डीजीसीए’च्या नियमांनुसार, सर्व विमान कंपन्यांना प्रवाशांना किमान 15 किलोची बॅग बाळगण्याची परवानगी द्यावी लागते.
 
 
भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीत रशियाचा वाटा पुन्हा वाढला आहे. ताज्या आकडेवारीवरून दिसून आले आहे की, एप्रिल महिन्यात भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी 40 टक्के वाटा एकट्या रशियाचा होता. त्याआधी मार्च महिन्यात एकूण आयातीमध्ये रशियातून येणार्‍या कच्च्या तेलाचा वाटा 30 टक्के होता. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची आयात वाढली आहे. वाढत्या भू-राजकीय तणावामुळे गेल्या महिन्यात कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली होती, अशा परिस्थितीत भारतीय रिफायनर्सनी पैसे वाचवण्यासाठी पुन्हा रशियाच्या कच्च्या तेलाची खरेदी वाढवली. त्यामुळे एप्रिल महिन्यात एकूण आयातीत रशियाचा वाटा पुन्हा वाढला. ‘व्होर्टेक्सा’ या एनर्जी कार्गो ट्रॅकरच्या मते भारतीय रिफायनर्सनी एप्रिलमध्ये रशियाकडून दररोज 1.78 दशलक्ष पिंप कच्चे तेल आयात केले. मार्च महिन्यात झालेल्या आयातीपेक्षा हे प्रमाण 19 टक्के अधिक आहे.
 
 
Health insurance : गेल्या महिन्यात भारतीय रिफायनर्सदेखील रशियन कच्च्या तेलाचे सर्वात मोठे खरेदीदार बनले. भारतीय रिफायनर्सच्या 1.78 दशलक्ष पिंप प्रतिदिन खरेदीच्या तुलनेत चीनची आयात प्रतिदिन 1.27 दशलक्ष पिंप इतकी होती. चीन दुसर्‍या क्रमांकावर होता. युरोपने एप्रिल महिन्यात रशियाकडून दररोज 396 हजार पिंप कच्चे तेल खरेदी केले. एप्रिल महिन्यात रशियाने पुन्हा एकदा भारताच्या बाबतीत स्त्रोत देशांमध्ये पहिले स्थान मिळविले. एप्रिल महिन्यात भारताने रशियाकडून सर्वाधिक कच्च्या तेलाची खरेदी केली. त्यानंतर इराक, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसारखे देश आले. आकडेवारीतील सर्वात मनोरंजक बाब म्हणजे भारताच्या चार सर्वात मोठ्या पुरवठादारांमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या रशियाने इराक, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या एकूण पुरवठ्यापेक्षा जास्त पुरवठा केला.
(लेखक आर्थिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)