निवडणुकांनंतर भारत-पाकिस्तान संबंध सुधारतील?

मरियम शरीफ यांची गुरुद्वारामध्ये बातचीत

    दिनांक :12-May-2024
Total Views |
राष्ट्ररक्षा
Mariam Sharif : भारतातील पंजाब राज्यातून शिखांचा एक जत्था करतारपूर गुरुद्वारा; जो पाकिस्तानमध्ये आहे; तिथे शिखांचा एक महत्त्वाचा सण ‘बैसाखी’ 18 एप्रिलला साजरा करायला गेला होता. तिथे त्यांना एक आश्चर्याचा धक्का बसला. पाकिस्तान पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफ, ज्या पाकिस्तानचे पूर्व पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या आहेत, त्यांनी या गुरुद्वारामध्ये येऊन या जत्थ्याशी बातचीत केली. शुद्ध पंजाबीमध्ये त्यांनी सांगितले की, त्या पाकिस्तान/भारताच्या पंजाबमधल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या कुटुंबाचे मूळ गाव अमृतसरजवळील जत्ती उमरा हे आहे; जेथून त्यांच्या आजोबांनी पाकिस्तानमध्ये 1947 मध्ये पलायन केले होते. पाकिस्तानमध्ये सगळे धर्म हिंदू, ख्रिश्चन, शीख, मुस्लिम यांना त्यांच्या प्रथा आणि सण साजरे करायची परवानगी आहे, जे अजिबात खरे नाही. त्यांच्या मते, पाकिस्तानमधले मुसलमान आणि भारतामधील शीख यांच्यामध्ये पुष्कळ साम्य आहे. त्यांची भाषा, राहणे, वागणुकीची पद्धत, संस्कृती खूप एकसारखी आहे. त्यांनी आपले वडील नवाज शरीफ यांची इच्छा भारताबरोबरचे आपले संबंध मजबूत करायची आहे, असे जत्थ्यासमोर सांगितले. त्यांना भारताबरोबरचा व्यापार वाढवून, आर्थिक संबंधसुद्धा मजबूत करायचे आहेत. मरियम नवाज शरीफ यांनी ही पण आठवण करून दिली की, 2015 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दोन देशांमध्ये संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला होता. त्याच साली मरियम नवाज शरीफ यांच्या मुलीचे लग्न होते, ज्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी लाहोरमध्ये खास दाखल झाले होते. असे वाटत होते की, दोन्ही देशांचे संबंध सुधारतील. परंतु त्यानंतर पुढच्या 10 दिवसांच्या आत पाकिस्तानी सैन्याने जम्मू विमानतळावर ड्रोन हल्ला करून दोन्ही देशांमधले संबंध बिघडवले.
 
 
mariyam-nawaz
 
मरियम विरुद्ध हमजा शरीफ : कुटुंबातील सत्तासंघर्ष
पाकिस्तानात 8 फेब्रुवारीला सार्वत्रिक आणि प्रांतीय निवडणुका झाल्या. पीएमएल-एन आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी यांनी संयुक्तरीत्या सरकार स्थापनेचा निर्णय घेतला. पीएमएल-एनला जास्त जागा असल्याने पंतप्रधानपद त्याच पक्षाला मिळाले. निवडणुकीपूर्वी लंडनमधील विजनवासातून परत आलेले नवाझ शरीफ स्वतः पंतप्रधानपदासाठी उत्सुक होते. पंजाबमध्ये पक्षाला बहुमत मिळाले होते, परंतु त्यांची प्रकृती सध्या चांगली नाही, असे मानले जाते, म्हणून त्यांनी आपले बंधू शाहबाज शरीफ यांना पंतप्रधान बनवण्याचे ठरवले आणि आपली राजकीय वारस Mariam Sharif मरियम शरीफ यांना पंजाबच्या मुख्यमंत्री बनवले. नवाझ शरीफ यांचे दोन वर्षांनी धाकटे बंधू शाहबाज शरीफ हेही दीर्घकाळापासून राजकारणात सक्रिय आहेत. दोघांची मुलेही मरियम आणि हमजा राजकारणात आहेत. इम्रान खान यांची सत्ता गेल्यानंतर एप्रिल 2022 ते ऑगस्ट 2023 या कालावधीत शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधानपद सांभाळले. त्यांनी तीन वेळा पंजाबचे मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. या कालावधीत 2013 ते 2017 दरम्यान नवाझ शरीफ पंतप्रधान होते. 2018 मध्ये भ्रष्टाचाराच्या खटल्यात दोषी ठरल्यानंतर ते दीर्घकाळ लंडनमध्ये विजनवासात राहिले. त्यानंतर शाहबाज शरीफ आणि मरियम शरीफ यांनी पक्षाची सूत्रे सांभाळली. त्यांच्या जोडीला शाहबाज यांचा मुलगा हमजा शरीफ हेही होते. हमजा 2008 ते 2018 या दरम्यान पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे सदस्य होते. 2018 ते 2022 दरम्यान ते पंजाबच्या प्रोव्हिन्शिअल असेंब्लीमध्ये विरोधी पक्षनेते होते. 30 एप्रिल 2022 ते 2 मे 2022 अल्प काळ ते मुख्यमंत्री होते. मरियम या पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्षा आहेत आणि हमजा उपाध्यक्ष आहेत. 8 फेब्रुवारीला झालेल्या निवडणुकीनंतर पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी हमजा उत्सुक होते. मात्र, मरियम स्पर्धेत असताना त्यांना संधी मिळाली नाही.
 
 
पाकिस्तान भारताविरुद्धचे आक्रमक धोरण बदलेल?
भारतात सध्या मधील निवडणुकीचे वातावरण आहे. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारतील का? पाकिस्तान भारताविरुद्धचे आक्रमक धोरण बदलेल का? पाकिस्तानमधले दहशतवादी निर्माण करायचे कारखाने बंद केले जातील का? पाकिस्तान भारताविरुद्ध सध्या चालू असलेला अफू, गांजा, चरसचा दहशतवाद थांबवेल का? पाकिस्तानचे सैन्य भारताबरोबर शांतता निर्माण करण्याच्या पक्षामध्ये आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पाकिस्तानला द्यावी लागतील. मात्र, Mariam Sharif मरियम नवाज शरीफ यांची करतारपूर गुरुद्वाराला भेट ही नक्कीच भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्याच्या संबंधात एक महत्त्वाचे पाऊल समजले पाहिजे. कारण हे पाऊल उचलण्याकरिता नवाज शरीफ, पाकिस्तानचे राजकीय पक्ष आणि पाकिस्तानी सैन्य यांचा त्यांना पाठिंबा असावा. भारताच्या वेगवेगळ्या पंतप्रधानांनी म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहनसिंग, अटलबिहारी वाजपेयी आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या कालखंडामध्ये पाकिस्तानशी भारताचे संबंध सुधारायचा प्रयत्न केला. परंतु शेवटच्या क्षणाला अपयश आले. असे मानले जाते की, पाकिस्तानी सैन्याचे धोरण एकच आहे, जे कधीही बदलणार नाही. ते म्हणजे ‘ब्लीडिंग इंडिया बाय थाउजंड कट्स’ म्हणजे भारताच्या अंगावर लहान लहान घाव घालून भारताला कायमचे रक्तबंबाळ करत राहायचे. हे धोरण बदली होईल का?
 
 
दरम्यान, बातमी आली की, चार ते सहा दहशतवाद्यांनी जम्मूच्या सीमेतून घुसखोरी केली आणि त्यांची उधमपूर जिल्ह्यामध्ये व्हिलेज डिफेन्स कमिटीच्या जवानांची चकमक झाली, ज्यात एका आपल्या जवानाचा मृत्यू झाला. म्हणजेच ‘कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच’ की, आणखीन काही? गुजरातच्या किनारपट्टीवर आलेल्या पाकिस्तानी जहाजातील 600 कोटी रुपये किमतीचे 86 किलो अमली पदार्थ तटरक्षक दलाने रविवारी जप्त केले. याप्रकरणी जहाजावरील 14 खलाशांना अटक करण्यात आली आहे. अरबी समुद्रात शनिवारी रात्री दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) यांच्या समन्वयाने ही कारवाई करण्यात आली. दहशतवादी टीटीपीशी घनिष्ठ संबंध असलेल्या अफगाण तालिबानचे पश्चिम सीमेवर पाकिस्तानला गंभीर आव्हान असूनही पाकिस्तानने भारताविरुद्ध पोसलेल्या दहशतवादी गटांना पोसणार नसल्याचे कोणतेही संकेत अद्याप दिलेले नाहीत. म्हणजेच पाकिस्तान अजूनसुद्धा भारताविरुद्ध लढण्याकरिता दहशतवादी गटांना महत्त्वाचे सामरिक शस्त्र समजतो. पुढे काय होईल हे येणारा काळच सांगेल, परंतु सुरुवात तरी चांगली झाली आहे.
 
पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला
पाकिस्तानमध्ये काही विद्वानांचे असे मत आहे की, पाकिस्तानी मुस्लिमांनी पाकिस्तानमध्ये राहणार्‍या शिखांवर हल्ले करून त्यांना भारतात पाठवायची चूक केली. शिखांचा वापर भारतातील हिंदू आणि शीख यामध्ये दरी निर्माण करण्याकरिता व भारताला तोडण्याकरिता करता आला असता. अर्थात हे विद्वान मुद्दाम विसरतात की, शीख धर्माचा उदय भारतातील हिंदूंचे रक्षण करण्याकरिताच झाला होता. Mariam Sharif मरियम नवाज शरीफ यांनी स्वतःला एक पंजाबी म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न करून भारतातील पंजाबच्या जनतेची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला. परंतु हे नक्की आहे की, नवाज शरीफ यांचे लक्ष हे काश्मीर मुद्यावरून कधीच हटणार नाही. एक कारण असे आहे की, नवाज शरीफ यांच्या पत्नी एक काश्मिरी भट होत्या. पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला पोहोचलेली आहे. एकीकडे पाकिस्तानात महागाईने कहर केलेला आहे, दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती, दहशतवादानेही नागरिक त्रस्त आहेत. महागाई दर 25 टक्क्यांपलीकडे आहे. ‘एशियन डेव्हलपमेंट बँके’च्या आकडेवारीनुसार, आशिया खंडातील पाकिस्तान हा राहणीमानाचा खर्च न परवडणार्‍या देशांत पहिल्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही केवळ 1.9 टक्के इतक्या कासव गतीने वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला 24 व्या वेळेला इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कर्ज देणार आहे आणि हे कर्ज मिळविण्याकरिता पाकिस्तान एक लोकशाही पाळणारा मवाळ देश आहे, हे सिद्ध करीत आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्य, नवाज शरीफ यांना भारताबरोबर आपले संबंध सुधारायला सांगत आहे.
 
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)
- ब्रिगेडियर हेमंत महाजन
- 9096701253
••