अध्यात्म वाटिकेतील जाईची वेल संत जनाबाई

    दिनांक :12-May-2024
Total Views |
संत प्रबोधन
महाराष्ट्रातील स्त्री संतांनी जी लोककल्याण, प्रबोधनाची परंपरा सातत्याने सुरू ठेवली, त्यामध्ये Saint Janabai संत जनाबाईचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ‘दासी’ म्हणून काम करणारी एक स्त्री दळण-कांडण करत स्वयंपाक, घासणे-पुसणे, धुणी-भांडी करत अभंग लेखनसुद्धा करायची. यामध्ये संत जनाबाईचा मोठेपणा आहे. संत नामदेवांनी त्यांना लेखणीचा अधिकार दिला. लिहिण्याचं बळ दिलं. त्यामुळे लक्षात येते की, तत्कालीन संतांनी पहिल्यांदा स्त्रियांना लिहिण्याचा अधिकार दिला व व्यासपीठ उपलब्ध करून दिले. म्हणून संत जनाबाई म्हणतात -
डोईचा पदर आला खांद्यावरी ।
भरल्या बाजारी जाईन मी ॥
 
 
Janabai-23
 
स्त्री संतांनी स्त्री जीवनाची मांडलेली वातहत Saint Janabai संत जनाबाई अधिक उजागर करतात. ‘विठु माझा लेकुरवाळा’ हा त्यांचा सामाजिक व्यापकत्वाचा भाव अतिशय महत्त्वपूर्ण आहे. असं म्हणतात की, साक्षात विठोबाकडून दळण व कांडण करून घेणारी, त्याच्याकडून अनेक कामं करून घेणारी लडिवाळपणे भांडणारी स्त्री संत म्हणजे संत जनाबाई. एवढा मोठा अधिकार संत जनाबाईंना प्राप्त झाला होता.
डोईचा पदर आला खांद्यावरी ।
भरल्या बाजारी जाईन मी ॥
हाती घेईन टाळ खांद्यावरी वीणा ।
आता मज मना कोण करी ॥
पंढरीच्या पेठे मांडीयेले पाल ।
मनगटावर तेल घाला तुम्ही ॥
जनी म्हणे देवा मी झाले येसवा ।
निघाले केशवा घर तुझे ॥
 
 
सर्व कृत्रिम व निरर्थक स्वरूपाच्या सामाजिक संकेतांच्या पलीकडे असलेली Saint Janabai संत जनाबाईंची भक्तप्रेमस्वरूप भक्ती रंगात रंगून जाणारी धुंद, बेभान, तल्लीन करणारी आहे. आर्त भक्तीच्या अनुभवात रंगून गेल्याशिवाय ईश्वरी साक्षात्कार होणे अशक्य आहे. या अलौकिक अवस्थेचा जनाबाईला आलेला हा अनुभव व तिचे ईश्वराप्रती असणारे प्रेमाचे नाते अस्सल असल्याचे आपल्याला जाणवते. भक्तीची इतकी अगतिकता तिच्या अभंगातून विठ्ठलाविषयीच्या भक्ती प्रेमामध्ये होती. भक्तिभावाच्या उत्कट अवस्थेची सहज स्मरणीय आणि सत्त्व मधुर अवस्था म्हणजे जनाबाईचं विठ्ठल भक्ती प्रेम! भक्तसम्राट नाम्याच्या घरी जनी दासी म्हणून राहिली. गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड गावातील ‘दमा’ नावाच्या एका शूद्र भागवत भक्ताची जनी मुलगी होती. दमा हा पंढरीचा भक्त. वारकरी होता. खुद्द जनाबाई सांगते की,
माझ्या वडिलांचे दैवत । तो हा पंढरीनाथ ॥
 
 
संत जनाबाईच्या जीवनातील ठेव म्हणजे पंढरीची वारी करणारी तिची आई करुंड व संत नामदेवांनी केलेला दासी म्हणून तिचा स्वीकार. विठ्ठलाच्या संकेताने जनाबाई पाच-सात वर्षांची असतानाच दमा शेटजीच्या घरी तिला पोहोचवून देण्यात आले. संत नामदेवाचा संत सहवास लाभला. काही वर्षांतच तिची मातादेखील गेली. त्यानंतर फक्त संत सहवास व विठ्ठलाची ओढ एवढेच काय भांडवल तिच्या जीवनामध्ये होते.
माय मेली बाप मेला । आता सांभाळे बा विठ्ठला ॥
मी तुझे गा लेकरू । नको मजशी अव्हेरू ॥
 अशी आर्त हाक ती परमपिता विठ्ठलाला मारते.
 
 
संत जनाबाईचा आत्मविश्वास
अनाथ असतानाही भक्तिप्रेम आपण करू शकतो. भगवंताला आपण आळवू शकतो. त्याला प्रसन्न करून घेऊ शकतो व स्त्री जीवनाचा उद्धार करू शकतो. त्याचे गुणगान आपल्या लेखणीद्वारे आपण व्यक्त करू शकतो, असा आत्मविश्वास तिच्याकडे होता. म्हणूनच संत जनाबाई लिहितात -
स्त्री जन्मा म्हणवुनी न व्हावे उदास ।
साधुसंता ऐसे केले जनी ॥
संतांचे घरची दासी मी अंकिली ।
विठोबाने दिली प्रेम कळा ॥
 
 
अशा प्रकारचा भाव असल्यामुळे तिच्या जीवनातील पोरकेपण संपले आणि तिने एक नवीन नाते तयार केले. या नात्याला तिने नेहमी साद घातली व विठ्ठलाला आपलेसे करून घेतले.
‘पांडुरंग माझा पिता, रखुमाई माझी माता’ हे नवीन नाते तिच्या जीवनामध्ये उदयास आले आहे. संत जनाबाईच्या जीवनामध्ये आलेली ही आत्मविश्वासाची अवस्था, अगतिकता व त्यातून तिने भगवंताला अतिशय उत्कट भावनेने आळविले आहे आणि भगवंत हेच तिच्या जीवनातील महत्त्वाचे सार आहे. माझ्या जीवनामध्ये आता भगवंताशिवाय कोणीही नाही. म्हणून फक्त भगवंत विठ्ठल परमात्माच माझे कल्याण करू शकतो. त्यामुळे ती विठ्ठलाला म्हणते -
गंगा गेली सिंधूपाशी । त्याने अव्हेरिले तिसी ।
तरी ते सांगावे कवणाला । ऐसे झाले बा विठ्ठला ॥
जल कोपे जलचरा । माता अव्हेरी लेकुरा ।
जनी म्हणे शरण आले । अव्हेरिता ब्रीद गेले ।
 
 
जर, गंगा नदी समुद्राकडे आली आणि समुद्राने तिला नाकारले तर, तो अपमान त्या समुद्राचा आहे. जसे लेकराला मातेने नाकारणे, असा तो प्रकार होईल. भगवंत भक्तांना राखतो. त्याचे रक्षण करतो. या ब्रीदापासून तो परामुक्त होईल. म्हणून भगवंता तू माझे रक्षण कर, अशी आर्त हाक ती विठ्ठलाला देते.
भक्ताला भगवंताशिवाय दुसरा कोणाचा आधार नाही. तू दुसर्‍या कोणाचा आसराही घेत नाही. हा ईश्वर व भक्त यांचा संबंध येथे स्पष्टपणे सुचित करतो की, ईश्वरापर्यंत पोहोचविणारा हमखास मार्ग म्हणजे नामस्मरणाचा होय. तो जनाबाईंनी अंगीकारला होता.
 
 
जनाबाईचा नामस्मरणाचा संदेश
एक नाम अवघे सार । नाम तारक हे थोर ।
 नामे तारिले अपार ॥ अशिक्षित असूनही नामाचा महिमा Saint Janabai संत जनाबाई जाणताना दिसतात. ‘संत नामदेव मनोज ती नामाची जननी’ अशा संबोधने लेखन करते. नामाचा असा हा अगाध महिमा जनाबाई तिच्या अभंगातून गाते. नामाबद्दलचं तिचं प्रेम हे असीम व निषिम आहे. विठ्ठलाच्या नामस्मरण चिंतनामुळे ती अजरामर ठरली आहे. ‘सामर्थ्यशाली नाम फुकाचे’ असून ते सर्वांनी घ्यायला पाहिजे, असा आग्रह ती धरते. ती सर्वांना उपदेश करते
नामफुकट चोखट । नाम घेता न ये विट ।
मना लागो हाची धंदा श्रीरामकृष्ण हरी गोविंदा ॥
जीवे करू नित्य नेम । सदा विठोबाचे नाम ॥
 
 
नामाच्या खर्‍या स्वरूपाची जनाबाईला पारख झाली आहे. विशिष्ट शब्दाचा वा अक्षर समुच्चयाचा उच्चार म्हणजे नामस्मरण नाही तर नाम हा निर्गुण, निराकार अशा शुद्ध ब्रह्माचा वर विठोबाची निशाणी असल्याचा शिक्का आहे. संतांनी त्याला मान्यता दिलेली आहे.
निराकारीचे नाणे । शुद्ध ब्रह्मीचे ठेवणे ।
प्रयत्न काढीले बाहेरी । संत साधू सवदागिरी ॥
व्यास, वशिष्ठ, नारदमुनी । टाकसाळ घातली त्यांनी ॥
हारप चाले तिने लोका । पारख नामयाची जनी ॥
वरती विठोबाची निशाणी ॥
 
 
नामस्मरणाचा सुखाचा, खात्रीचा मार्ग
उपलब्ध योगमार्गाचा शीण कशाला घ्यायचा? हासुद्धा प्रश्न संत जनाबाई उपस्थित करतात. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेला नामाचा मार्ग जनाबाईंनी पुढे चालू ठेवला. संत ज्ञानेश्वरांबद्दलदेखील तिला अपार आदर आहे. म्हणून ती संत ज्ञानेश्वरांबद्दल आदर व्यक्त करते -
ज्ञानाचा सागर । सखा माझा ज्ञानेश्वर ॥
 
 
Saint Janabai जनाबाईंच्या एकूणच साहित्यामध्ये प्रेम, उत्कटता, आर्त भावना, परमेश्वरविषयक लडिवाळपणा हा तिच्या अभंगाचा विशेष जाणवतो. आख्यान काव्य, श्रीकृष्णाची बालक्रीडा अभंग रूपाने गायलेली आहे. हरिश्चंद्राख्यान आणि थालीपाक या रचनेमुळे कथाकाव्य लेखनाचेही श्रेय त्यांच्या अभंग रचनेला मिळाले आहे.
भक्त सम्राट असलेल्या संत नामदेवासारख्या एका संताच्या घरी दासी म्हणून जगलेली ही जनाबाई आपल्या लेखन सामर्थ्याने, आपल्या उत्कट भक्तीने परमेश्वराला जिंकून घेते व तिने सांगितलेला भक्तीचा सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण व त्यातून उद्धाराचा झालेला मोकळा मार्ग हा तिला संतवाटिकेतील जाईची वेल बनवते. तिच्या अभंग रचनेमुळे काव्यरचनेची उत्कटता, भक्तीच्या रंगात प्रेम निर्माण करते. तिचा हा भक्ती सुगंध सर्व संत परिवारामध्ये दरवळत राहतो. ही जनाबाईची लोककल्याणासाठी प्रबोधनाची मोठी कामगिरी आहे.
 
- प्रा. डॉ. हरिदास आखरे
- 7588566400