आईपलीकडची स्त्री...

    दिनांक :12-May-2024
Total Views |
mother : परवा वर्तमानपत्रात एका खटल्याच्या निकालाची बातमी वाचली. खटल्याच्या तपशिलात शिरायची गरज नाही. एका पतीने पत्नीकडून आपल्या मुलीचा ताबा मिळावा यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वर्षभरापूर्वी त्या दोघांचा घटस्फोट झाला तेव्हापासून मुलगी आईजवळ राहत होती. पतीच्या बाजूने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि मानवी हक्क कार्यकर्ता इंदिरा जयसिंग यांनी युक्तिवाद केला. ‘मुलीच्या आईचे विवाहबाह्य संबंध असल्यामुळे मुलीला आईच्या ताब्यात देणे योग्य नाही’ असे मत त्यांनी युक्तिवादात मांडले. यावर उच्च न्यायालयाने दिलेले उत्तर असे की, ‘चांगली पत्नी नसणे, याचा अर्थ संबंधित महिला चांगली ‘आई’ नाही असा नव्हे. व्यभिचार हे घटस्फोटाचे कारण असू शकते. परंतु अपत्याचा ताबा आईकडे न देण्याचे ते कारण असू शकत नाही,’ असे निरीक्षण नोंदवून मुलीचा ताबा आईकडे देण्यात आला.  केकेआर ठरली प्लेऑफमध्ये पोहोचणारी पहिली टीम
 
 
jijabai
 
mother : आता मुद्दा असा आहे की, ‘आई’ असणारी आणि ‘व्यभिचार करणारी’ व्यक्ती तर एकच आहे. इंदिरा जयसिंग यांनी महिलेच्या ‘वागणुकीचा’ निकष लावला तर उच्च न्यायालयाने ‘आई’ हा निकष लावला. म्हणजे फक्त आई असणे हे एक असामान्य गुणवैशिष्ट्य आहे का? यासंदर्भात महाभारतातील कुंतीची कथा आठवणे अपरिहार्य आहे. दुर्वास ऋषींनी शिवसेन राजाच्या कन्येवर, कुंतीवर प्रसन्न होऊन वर दिला होता. ‘ज्या देवाचे स्मरण करशील, तो देव वश होईल’ अशी ती शक्ती होती. लग्नापूर्वी कुंतीने सहज सूर्यदेवाचे स्मरण केले. सूर्यदेव प्रकट झाले आणि त्यांनी कुंतीच्या नाभीला बोट लावले. ‘तुला माझ्याप्रमाणेच तेजस्वी पुत्र होईल...’ असा आशीर्वाद देऊन ते अंतर्धान पावले. आणि खरोखरच कुंतीला सूर्यपुत्राचा लाभ झाला. या अनपेक्षित घटनेने कुंती घाबरून गेली. समाजाच्या भीतीने तिने सूर्यपुत्राला नदीत सोडून दिले आणि हे सत्य दडवून ठेवले. आता या प्रसंगी कुंतीने कशाला प्राधान्य दिले हे तर सर्वश्रुतच आहे. म्हणजे एका स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वात आई असण्याबरोबरच अनेक गुण-अवगुण एकवटले असतील तर केवळ ती ‘आई’ आहे म्हणून श्रेष्ठ ठरते का? आपल्या संस्कृतीने मातेचा नेहमीच गौरव केला आहे. किंबहुना मातेला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे.
 ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी।’
‘न मातु:परदैवतम्।’
‘कुपुत्रो जायते क्वचिदपि, माता कुमाता न भवति।’
‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.’
 

sindhutai 
 
‘देवाला प्रत्येक ठिकाणी जन्म घेणे शक्य नव्हते म्हणून त्याने आई निर्माण केली.’
असे आणि यासारखे असंख्य वाक्प्रचार, सुभाषिते, श्लोकांनी प्रत्येक भारतीय मनाचे सॉफ्टवेअर तयार झाले आहे. ही उपरोक्त ब्रह्मवाक्ये शाळेत निबंधात लिहून, पाठ करून आईबद्दल अतिउदात्त धारणा प्रस्थापित झाल्या आहेत. आई म्हटले की ममतेचा सागर, त्यागमूर्ती, आदर्श, वात्सल्य, करुणा इत्यादी घासून गुळगुळीत झालेले शब्द वापरलेच पाहिजेत, असा एक अलिखित नियम आहे. याशिवाय चित्रपट-मालिकांमध्ये दाखवलेली आई तर अतिरंजित रूपात असते. ऐन कसोटीच्या, जीवन-मरणाच्या प्रसंगात ही सिनेमातली आई मुलासमोर भात्यातले एक ब्रह्मास्त्र सोडते. ‘मैने तुम्हे नौ महिने अपने पेट मे पाला है...’ प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला आव्हान देणारे हे ‘भावनिक ब्रह्मास्त्र.’ मुलाला क्षणात गारद करणारे!
 
 
mother : वास्तविक, नऊ महिने बाळाला पोटात सांभाळणे हा काही विश्वपराक्रम नाही; जन्मणार्‍या बाळावर केलेले उपकार तर नाहीच नाहीत. ही अत्यंत नैसर्गिक अशी शारीरिक घटना आहे; ज्यात भावी आईचे काहीही कर्तृत्व नाही. ‘तुला नऊ महिने पोटात वाढवले आणि तुझ्यासाठी खस्ता खाल्ल्या...’ हे वाक्य ऊठसूट हुकमी एक्क्यासारखे का म्हटले जाते, हे अनाकलनीय आहे. ‘गाजर का हलवा’ खाऊ घालणारी, सतत टिपे गाळणारी, मशीनवर कपडे शिवणारी, डोक्यावर घमेले घेऊन दगड उचलणारी, स्वतः उपाशी राहणारी अशा ठरावीक साच्यातील आईची प्रतिमा चित्रपटात रंगवली जाते. पण आई हीसुद्धा एक हाडामांसाची जिवंत व्यक्ती आहे. तिला चांगल्या-वाईट संवेदना आहेत. तिचा ठरावीक स्वभाव आहे. तिला आवडीनिवडी आहेत. ही वस्तुस्थिती महत्त्वाची नाही का?
 
 
प्रत्येक आई आपल्या कुवतीनुसार, बुद्धीनुसार अपत्यांची काळजी घेत असते. संगोपन करते. कुठेही गेली तरी तिचा जीव लेकरांमध्ये गुंतलेला असतो. अपत्याच्या सुखासाठी ती शक्य असेल ते सारे करते. आई आणि मुले हे एकमेकांचे सर्वस्व असतात. निरपेक्ष प्रेम हे आईचे वैशिष्ट्य असते. त्यामुळे मायलेकांचे नाते हे सर्वोत्कृष्ट मानले आहे. मुलांच्या शिक्षणासाठी, प्रगतीसाठी, सुरक्षित भविष्यासाठी ती वैयक्तिकरीत्या अनेक तडजोडी करते. ही प्रत्येक आईची गुणवैशिष्ट्ये आहेत. ती सर्वसामान्य आहेत, अंगभूत आहेत. पण अनेकदा, ती मुलांच्या अती लाडापोटी चुकतेसुद्धा. ‘सुपरकीड’ची ‘सुपरमॉम’ बनण्याच्या हव्यासापोटी ती भरकटतेही. मुलांवर आपल्या अपेक्षांची ओझी लादून, त्यांचे बाल्य हिरावले जाते आहे, याचेही तिला भान नसते. मुलांचे बोट धरून चालताना, त्यांना वाढवताना ती सक्षम झाल्यावर एक क्षण असा येतो जेव्हा मुलांचे बोट अलगद सोडून त्यांना स्वातंत्र्य द्यायचे असते. मुलांचे विवाह झाले की आईच्या भूमिकेतून हलकेच अंग काढून घ्यायचे असते. पण ही समयोचित वागणूक अनेक आयांना जमतेच असे नाही.
 
 
mother : ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे’ (कोणी लिहिले आहे देव जाणे) हे ब्रह्मवाक्यसुद्धा आईवर लादले जाते. मातेच्या भूमिकेतून तिने कधी बाहेरच येऊ नये, असा ‘सोयीस्कर बहुमान’ तिच्या गळी उतरवला जातो आणि या अपेक्षांच्या दडपणाखाली, ‘पुत्राचे सहस्त्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद’ असे म्हणत ती अपत्याचे लाड करते. त्याच्या चुका पोटात घालते. स्वतः झिजत राहते आणि मग या आईचे काळीज प्रेयसीकडे घेऊन जाताना मुलगा ठेचकाळतो, तेव्हा ‘तुला लागले तर नाही ना बाळा?’ असा हुंकार त्या आईच्या काळजातून येतो. हे तर आईच्या उदात्तीकरणाचे अतिरेकी उदाहरण आहे. त्यावर अजून तडका मारणारी लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते?’ यातल्या अरुंधतीला ‘महाराष्ट्र भूषण’ नक्की मिळणार बघा! सध्याची मालिकेची लांबण बघता ‘आई तू कशाला काही करते?’ असे म्हणावेसे वाटते. वास्तविक, भारतीय संस्कृतीने ‘मातृत्वा’चा गौरव केला आहे; ‘आई’ या मर्यादित व्यक्तिमत्त्वाचा नाही. मातृत्व ही एक उदात्त, उन्नत वृत्ती आहे. ती मानवी जीवनाची परमोच्च, उत्कट भावना आहे. सगळ्या संतांना त्यांचे परमभक्त ‘माउली’ म्हणतात.
 
 
mother : ‘विठु माझा लेकुरवाळा’ या संत जनाबाईच्या अभंगातून किंवा ‘बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई’ या संत एकनाथांच्या अभंगातून प्रतीत होणारे सर्वव्यापी, निरपेक्ष निर्मळ मातृत्व उच्च कोटीच्या संतांमध्ये प्राधान्याने दिसून येते. राणी कौसल्येला आदर्श मातृत्वाचे प्रतीक समजले जाते. पण हा बहुमान कैकेयीला का मिळाला नाही? कारण तिच्या मातृत्वाला स्वार्थ आणि मत्सराची किनार होती. महानायक श्रीकृष्णाची आई देवकी, पण श्रीकृष्ण वाढला तो यशोदेच्या वत्सल छायेत. अगदी प्रसिद्ध उदाहरणे बघायची तर फ्लॉरेन्स नाईटिंगेल, मदर टेरेसा, माता जिजाबाई, सिंधुताई सपकाळ यांचे वंदनीय मातृत्व कायम प्रेरणा देणारे आहे आणि महत्त्वाचे म्हणजे ही मातृत्व वृत्ती पुरुषातही असते तसेच आई होऊ न शकलेल्या स्त्रीच्या ठायीही असते.
 
 
थोडक्यात काय, तर आई आणि मातृत्व वृत्ती यांच्यात गल्लत होऊ नये. स्त्री ही व्यक्ती म्हणून उत्तम असेल तर ती आई म्हणूनही उत्तमच असते. अविवेकी, अविचारी स्त्री असेल तर ती आईही तशीच असू शकते. स्त्री व्यक्तिमत्त्वाचे सर्वांगीण मूल्यमापन केल्यानंतरच तिच्या mother ‘आईपणा’ला जोखणे गरजेचे आहे. म्हणूनच केवळ ‘आई होणे’ हे जीवनाचे सार्थक नाही तर जिजामातेसारखी मातृत्व वृत्ती असेल तरच शिवाजी घडतात. मुलांना सतत उपदेश देऊन, त्यांची तुलना करून अनेक क्लासेसना पाठवून संस्कार होत नसतात. पालकांची दैनंदिन, प्रासंगिक वागणूक आणि कौटुंबिक वातावरण यातून संस्कार आपोआप झिरपतात. म्हणूनच म्हणावेसे वाटते, ‘आई तू कशाला काही करते?’
 
- डॉ. साधना कुलकर्णी