भाजपाच्या लल्लुसिंहांना फैजाबादमध्ये हॅट्ट्रिकची संधी

    दिनांक :15-May-2024
Total Views |
श्यामकांत जहागीरदार
 
नवी दिल्ली,
22 जानेवारीला अयोध्येतील रामजन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अयोध्येचे महत्त्व देशातच नव्हे, तर जगातही वाढले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटन केंद्र म्हणून याचे नाव झाले. त्यामुळे यावेळी अयोध्या धाम ज्या लोकसभा मतदारसंघात येते, त्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघाकडे देशाचे लक्ष लागले आहे. फैजाबादेत भाजपाचे Faizabad LokSabha-Lallusingh लल्लुसिंह यावेळी हॅट्ट्रिक करण्याच्या तयारीने रिंगणात उतरले आहेत. त्यांचा सामना सपाचे अवधेशप्रसाद आणि बसपाचे सच्चिदानंद पांडेय यांच्याशी आहे. लल्लुसिंह आणि अवधेशप्रसाद दोघेही तुल्यबळ राजकारणी आहेत. लल्लुसिंह खासदार होण्याच्या आधी पाचवेळा अयोध्या विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार होते.
 
 
Lallusingh
 
अवधेशप्रसाद फैजाबाद लोकसभा मतदारसंघात असलेल्या मिल्कीपूरचे सपाचे आमदार आहेत. 1977 मध्ये अवधेशप्रसाद पहिल्यांदा सोहावल विधानसभा मतादरसंघातून जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले. 1980 मध्ये मात्र त्यांचा काँग्रेस उमेदवाराने पराभव केला. 1985 मध्ये ते लोकदल, तर 1989 मध्ये जनता दलातर्फे विजयी झाले. 1991 च्या निवडणुकीत भाजपा उमेदवाराकडून ते पराभूत झाले. त्यानंतर अवधेशप्रसाद समाजवादी पक्षात आले. 1993, 1996, 2002 आणि 2007 अशा सलग चार विधानसभा निवडणुकीत ते सपातर्फे निवडून आले.
 
 
Faizabad LokSabha-Lallusingh  : 2008 मध्ये परिसिमनात सोहावल विधानसभा मतदारसंघ संपला आणि मिल्कीपूर राखीव विधानसभा मतदारसंघ अस्त्विात आला. 2012 मध्ये ते पहिल्यांदा मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. त्यावेळी अखिलेश यादव यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यावर मात्र अवधेशप्रसाद 2022 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून येत नवव्यांदा आमदार झाले. फैजाबाद लोकसभा मतदारसंघात अयोध्या, रुदौली, बिकापूर, मिल्कीपूर आणि दरियाबाबद असे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील मिल्कीपूर हा एकमेव मतदारसंघ सोडला, तर उर्वरित चारही विधानसभा मतदारसंघ भाजापाकडे आहेत. मिल्कीपूरमध्ये सपाचे अवधेशप्रसाद आमदार आहेत.