देशात मोदी लहर नाही, मोदी जहर

    दिनांक :15-May-2024
Total Views |
- जयराम रमेश यांची घसरली जीभ
 
नवी दिल्ली, 
Jairam Ramesh : देशात चौथ्या टप्प्याचे मतदान संपून पाचव्या आणि सहाव्या टप्प्यासाठी प्रचाराची रणधुमाळी उडाली असताना, काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांची जीभ बुधवारी घसरली. देशात मोदी लाट अजिबात नाही, असा दावा करताना जयराम रमेश यांनी, ही मोदी लहर नाही, तर मोदी जहर आहे, असे अश्लाघ्य उद्गार काढले. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान जयराम रमेश यांना देशात मोदी लाट आहे का, म्हणजेच मोदी लहर आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर चिडून जयराम रमेश म्हणाले, देशात मला कुठेही मोदी लहर दिसत नाही, पण मोदी जहर दिसते. कारण, मोदी प्रत्येक भाषणामध्ये जातीयतेचे जहर म्हणजे विष पसरवीत आहेत. प्रत्येक भाषणामध्ये हिंदू-मुसलमान भेदभाव करीत आहेत. त्यांना देशातल्या विकासावर, महागाई किंवा बेरोजगारीवर बोलायचे नाही. कारण, त्यांच्याकडे या प्रश्नांवर उत्तरे नाहीत. म्हणून ते देशामध्ये जातीयतेचे जहर पसरवीत आहेत. म्हणून, मला देशात मोदी लहर कुठे दिसत नाही, तर मोदी जहर दिसते!
 
 
Jairam Ramesh
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वैयक्तिक हल्लाबोल करताना जयराम रमेश म्हणाले, ‘सत्यमेव जयते’ हे देशाचे ब्रीद वाक्य आहे, पण मोदींचे ब्रीद वाक्य ‘असत्यमेव जयते’ असे आहे. ते देशाचे पंतप्रधान असले, तरी ते ‘ब्लफमास्टर’ आहेत, असेही जयराम रमेश म्हणाले. आतापर्यंत मोदींवर अशी वैयक्तिक टीका फक्त Jairam Ramesh जयराम रमेश यांनीच केली असे नाही, तर त्याची सुरुवात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 2007 मध्येच ‘मौत के सौदागर’ म्हणून केली होती. त्यानंतर मणिशंकर अय्यर यांनी चहावाला म्हणून त्यांना हिणवले होते. त्या पलीकडे जाऊन गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळी मणिशंकर अय्यरच मोदींना उद्देशून नीच आदमी असे म्हणाले होते. त्यानंतर आता जयराम रमेश यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी लहर नव्हे, तर मोदी जहर दिसले आहे.