महादेव अ‍ॅपप्रकरणी नारायणगावातून 70 जण ताब्यात!

    दिनांक :15-May-2024
Total Views |
- पुणे पोलिसांची कारवाई
 
पुणे, 
Mahadev Betting App Case : महादेव बेटिंग अ‍ॅपच्या ‘मनी लॉन्ड्रिंग’ घोटाळ्याच्या तारा पुणे जिल्ह्यातील नारायणगावपर्यंत पोहोचल्या आहेत. नारायणगावातील एक संपूर्ण इमारतच ‘बेटिंग मनी लॉन्ड्रिंग’साठी वापरण्यात येत होती, अशी धक्कादायक माहिती समजल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी संबंधित इमारतीवर छापेमारी केली. तेथून तब्बल 70 ते 80 जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. महादेव बेटिंग अ‍ॅप मनी लॉन्ड्रिंग आतापर्यंत मुंबई किंवा अन्य मोठ्या महानगरांपर्यंतच मर्यादित असल्याचे समोर आले होते. परंतु, आता थेट पुणे जिल्ह्याच्या नारायणगावसारख्या ग्रामीण भागात या प्रकरणाच्या तारा पोहोचल्याने हे प्रकरण नेमके किती खोलवर रुजले आहे, याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
 
 
Mahadev Betting App Case
 
ईडीच्या विनंतीवरून केंद्र सरकारने महादेव बेटिंग अ‍ॅपवर बंदी घातली आहे. या अगोदर महादेव बेटिंग प्रकरणात बॉलिवूडमधील कलाकार साहिल खान, हुमा कुरेशी, हिना खान, रणवीर कपूर, कपिल शर्मा अशा अनेक कलाकारांची नावे देखील पुढे आली. हे सगळे चौकशीच्या रडारवर आहेतच. या प्रकरणी साहिल खानला अटकही झाली. त्यातच छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल हे देखील चौकशीच्या जाळ्यात अडकले आहेत.
 
 
Mahadev Betting App Case : महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणाच्या तपासादरम्यान, ईडीला दररोज नवनवी माहिती मिळत आहे. या संदर्भात ईडीने अनेक बॉलिवूड कलाकारांना समन्स बजावले आणि त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासही सांगितले. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासादरम्यान, आरोपींनी महादेव बेटिंग अ‍ॅपची आणि त्याच्याशी संबंधित इतर अ‍ॅप्लिकेशन्सद्वारे कमावलेल्या कोट्यवधी रुपयांचा वापर करून अमाप मालमत्ता खरेदी केल्याचे उघड झाले आहे.
 
शाही लग्न सोहळ्यामुळे मोठे नेटवर्क उघड
महादेव बुक अ‍ॅपचा संस्थापक सौरभ चंद्राकरने मित्र रवी उप्पलसोबत महादेव ऑनलाईन अ‍ॅप तयार केले होतं. या अ‍ॅपवर ऑनलाईन बेटिंग केली जात असे. सौरभ चंद्रकारचा फेब्रुवारी 2023 मध्ये, संयुक्त अरब अमिरातमध्ये शाही विवाहसोहळा पार पडला. त्याच्या शाही विवाह सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी मोठमोठे सेलिब्रिटी आले होते. या शाही थाटामुळे हे लग्न ईडीच्या निशाण्यावर आले आणि त्यानंतर ‘मनी लॉन्ड्रिंग’चे सर्वांत मोठे नेटवर्क उघड झाले.