मनपा घाटकोपरच्या घटनेचा बोध घेणार का?

माजी मंत्री सुनील देशमुख यांचा सवाल

    दिनांक :15-May-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
Municipality Ghatkopar incident : मुंबई घाटकोपर येथे आलेल्या चक्रीवादळात जाहिरातीचे होर्डिंग कोसळून 14 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. अनेक गंभीररीत्या जखमी झाले. अशीच घटना काही दिवसांपूर्वी अमरावती शहरातल्या इर्विन चौकात घडली होती. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती. या उपरही नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मनपा आयुक्त व प्रशासक घाटकोपरच्या घटनेचा बोध घेताना दिसत नाही. त्यांनी तातडीने शहरातल्या अशा होर्डिंगवर कारवाई करावी, अशी मागणी माजी मंत्री सुनील देशमुख यांनी केली आहे.
 
szdF
 
 
शहरांमध्ये बहुतांश मुख्य रस्त्यांवर आणि बाजारपेठेत रस्त्यालगतच्या उंच इमारतींवर अवाढव्य आकाराचे होर्डिंग लावले गेले आहेत. यापैकी किती अधिकृत, किती अनधिकृत आहेत याची मोजदाद प्रसानाकडे आहे की नाही, हा सुद्धा प्रश्नच आहे. ते उभारल्या नंतर किंवा अनेक वर्षे तसेच उभे राहिलेल्या नंतर त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट, ते मजबुतीने उभे आहेत की नाहीत याचे स्टॅबिलिटी चेकिंग करण्याची साधी तसदी सुद्धा प्रशासनाकडून घेतल्या जात नाही. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, खबरदारी म्हणून हे सगळे सुरक्षा उपाय योजण्याची गरज आहे. ही जबाबदारी अधिकारी घेणार आहे की, त्याकरिता सुद्धा एखाद्या निष्पाप जीवाचा बळी जाण्याची प्रशासन वाट बघत आहे, हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे. मान्सून पूर्व अवकाळी पाऊस आणि लवकरच येणार्‍या पावसाळ्याच्या पृष्ठभूमीवर ही खबरदारी घेणे गरजेचे आहे. भविष्यात एखाद्याचा जीव गेल्यास मनपा अधिकार्‍यांवरच सदोष मनुष्यवधाचा दाखल करण्याची पाळी येऊ शकते, असा इशारा डॉ. सुनील देशमुख यांनी दिला आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या काळात प्रभात चौकातील जीर्ण इमारत पडून मोठी जीवितहानी झालेली होती. त्यात कायदेशीर भोग मनपा अधिकार्‍यांना भोगावे लागले, तरी प्रशासन यातून बोध घेत नाही, याचे आश्चर्य आहे.
 
 
दोन वर्षाच्या प्रशासक काळात मनपाच्या कारभाराचे विकृतचित्र अमरावतीकरांनी अनुभवले आहे. नानाविध घोटाळे, स्वच्छता कंत्राटाचा खेळखंडोबा, कमिशनबाजी, नागरिकांवर लादलेला वाढीव मालमत्ता कराचा बोजा आणि यात काही लोकप्रतिनिधींचे असलेले आर्थिक हितसंबंध व त्यातून हेतूपरस्पर साधलेले मौन मनपा प्रशासनाच्या अब्रूची लक्तरे आधीच वेशीवर टांगल्या गेली आहे. अनेकवेळा प्रशासनाच्या अनागोंदी कारभारावर ताशेरे ओढून सुद्धा ती आटोक्यात आलेली नाही. विद्यमान लोकप्रतिनिधींचा सुद्धा त्यांच्यावर वचक राहिलेला नसल्याची टिका डॉ. देशमुख यांनी केली आहे.