संजयसिंहांनी घेतली स्वाती मालिवाल यांची भेट

    दिनांक :15-May-2024
Total Views |
- विभवकुमारांवर अद्याप कारवाई नाही
 
नवी दिल्ली, 
Sanjay Singh- Swati Maliwal : आपचे राज्यसभा सदस्य संजयसिंह यांनी बुधवारी आपच्या राज्यसभा सदस्य स्वाती मालिवाल यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दिल्ली महिला आयोगाच्या वंदना त्यांच्यासोबत होत्या. यावेळी काय चर्चा झाली, ते समजू शकले नाही. सोमवारी सकाळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी केजरीवाल यांचे खाजगी सचिव विभवकुमार यांनी स्वाती मालिवाल यांच्याशी गैरवर्तन केले, तसेच त्यांना मारहाणही केली होती. याची तक्रार मालिवाल यांनी तातडीने पोलिस नियंत्रण कक्षाकडे केली होती. त्यानुसार, पोलिस केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. मालिवाल सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यातही गेल्या होत्या, मात्र त्यांनी या घटनेची लेखी तक्रार केली नाही.
 
 
Sanjay Singh- Swati Maliwal
 
Sanjay Singh- Swati Maliwal : मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या मारहाणीबाबत स्वाती मालिवाल यांनी दोन दिवसांत कोणतेच विधान केले नाही. जवळपास 30 तासांच्या चुप्पीनंतर आपचे राज्यसभा सदस्य संजयसिंह यांनी मंगळवारी सायंकाळी मालिवाल यांना मारहाण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, विभवकुमार यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल, असा निर्वाळाही त्यांनी दिला होता. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे, आम्ही ती खपवून घेणार नाही, आप स्वाती मालिवाल यांच्या पाठिशी असल्याचा दावाही संजयसिंह यांनी केला होता.
 
 
 
Sanjay Singh- Swati Maliwal : मात्र, संजयसिंह यांच्या दाव्याला 24 तास उलटून गेल्यानंतरही आपतर्फे विभवकुमार यांच्यावर कोणतीही कारवाई झाल्याचे दिसले नाही. याबाबत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली नाही. महत्त्वाचे म्हणजे आप विभवकुमार यांच्यावर कोणती कारवाई करणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांना आपमधून काढणे वा निलंबित करणे, ही गुन्ह्याची तीव्रता पहाता पुरेसे म्हणता येणार नाही. स्वाती मालिवाल यांची नाराजी दूर करण्यासाठी संजयसिंह यांनी मालिवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याचे समजते.