तभा वृत्तसेवा
हिंगणघाट,
stampede on flyover : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर नांदगाव चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावर मोठा खड्डा पडला आहे. रस्त्याच्या मधोमध असलेला हा खड्डा अपघातास निमंत्रण देत आहे. हा रस्ता बांधणार्या ठेकेदारावर तातडीने कारवाई करण्यात यावी व खड्ड्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शरद पवार राकाँ गटाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिला आहे.

शहरातील राष्ट्रीय महामार्ग 44 वरील नांदगाव चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाच्या बांधकामाला दोन वर्षे झाले असून पुलाचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे असल्याचा दाखलाच मिळाला आहे. काश्मीर ते कन्याकुमारी जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग असून या मार्गावरील पुलावर भला मोठा खड्डा वाहतुकीस अडथळा ठरत आहे. या महामार्गाने येता जाता वाहनधारकांना हा खड्डा चुकवताना त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या सुमारास वाहनधारकांना खड्डा दिसत नसल्याने अनेकदा या महामार्गावर दुचाकींचे अपघात घडले आहेत. या महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समिती ते सेंट जॉन कॉन्व्हेंटपर्यंत उड्डाणपूल तीन वर्षांपूर्वी निर्माण करून वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता. हा उड्डाणपूल सुरू होताच अनेकदा बंद करून वाहतूक वेगळ्या रस्त्याने वळवण्यात आली होती. यादरम्यान अनेकदा या उड्डाणपुलाची डाग डुजी करण्यात आली. मात्र आता तर या उड्डाणपुलावर आर पार मोठे भगदाड पडले आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावरून असंख्य जड वाहने धावतात. या भगदाडाची ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी व व दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल असा इशारा वांदिले यांनी दिला आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेश धोटे, संतोष तिमांडे, जावेद मिर्झा, अमोल बोरकर, किशोर चांभारे, अजय पर्बत, सुनील भुते, हेमंत घोडे, किशोर चांभारे, अनिल लांबट, आदी उपस्थित होते.