व्यथा-उद्याने व मैदानांची....
-कचर्याचे साम्राज्य
नागपूर,
Ramnagar Green Gym Park : रामनगरातील ग्रीन जीम पार्क महापालिका व नासुप्रच्या दुर्लक्षामुळे ओसाड जंगल व कचरा पार्क झाला असून त्याचे या दोघांनाही सोयरेसुतक राहिलेले नाही. उलट ते आता पालकत्व नाकारत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. रामनगरातील राम मंदिरामागे विस्तीर्ण मैदान आहे. मैदानाच्या पश्चिम बाजूस नागरिकांच्या मागणीस्तव तत्कालीन खा. नितीन गडकरी यांनी दिलेल्या 24 लाख 99 हजार 830 रुपये निधीतून 2015-16 मध्ये ग्रीन जीम पार्क महापालिकेने तयार केला. तशी कोनशिलाही तेथे आहे.
Ramnagar Green Gym Park : एक सुंदर पार्क तयार झाल्याने तेथे लहान मुलांसह तरुण, वयस्कांची गर्दी होत असे. हिरवे गवत, विविध फुलझाडे, मोठे वृक्ष, ग्रीन जीम तयार करण्यात आले. उंच दोर व जाळीवरून चढणे वगैरे साहसी खेळांची व्यवस्था होती. या उद्यानात आल्यावर सकाळ- संध्याकाळ एक वेगळा आनंद मिळत होता. उत्साह, तजेला वाटत होता. या पार्कला आता 10 वर्षे होत आली आहेत. आत गेल्यावर तिथे थांबण्याची इच्छादेखील होत नाही. आत नजर फिरवल्यावर ओसाड जंगल व कचरा पार्क असेच शब्द कुणाच्याही तोंडून आपसूकच बाहेर येतील. सर्वत्र झाडांचा पाला-पाचोळा पडलेला दिसतो. प्रवेशद्वाराच्या उजव्या व डाव्या बाजूला तसेच संरक्षण भिंतीजवळ कचरा दिसतो. दारूच्या रिकाम्या बाटल्या सर्वत्र पडलेल्या दिसतात.
Ramnagar Green Gym Park : मैदान व हा पार्क या दरम्यान संरक्षण भिंत बांधून त्यात लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत. मात्र, तीन- चार जाळ्या समाजकंटकांनी चोरून नेल्या आहेत. दुपारी, सायंकाळी येथे प्रेमी युगल बसलेले असतात. अंधार पडला की, रात्री येथे दारुड्यांचा ओपन बार सुरू होतो. पार्कमधील जीम तेवढ्या सुस्थितीत आहेत. या पार्कशिवाय परिसरात इतरत्र ग्रीन जीम नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक व्यायामासाठी सकाळी येतात. एवढा अपवाद सोडला तर नागरिकांना पार्कमध्ये जावेसे वाटत नाही. ओसाड जंगल व कचरा पार्क झाला तो केवळ महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासच्या दुर्लक्षामुळे, असे परिसरातील नागरिक स्पष्टपणे सांगतात. हा ग्रीन जीम पार्क तयार झाल्यापासून मागील 10 वर्षांत महापालिकेच्या अधिकार्यांनी ढुंकुनही पाहिलेले नाही, असे नागरिकांनी सांगितले. तेव्हापासून पार्कची निगा राखली जात नाही. प्रशासकीय भाषेत सांगायचे झाल्यास कुठलेही मेंंटेनन्स या उद्यानाचे नाही. स्वच्छता अजिबातच नाही.
पालक कोण?
हे उद्यान कुणाचे, असा प्रश्न निर्माण झाला असून महापालिका व नागपूर सुधार प्रन्यास दोघेही पालकत्व नाकारत असल्याचे नागरिकांनी सांगितले.