भारतातील प्राचीन ज्ञानपीठे

    दिनांक :24-May-2024
Total Views |
संस्कृती
भारतात प्राचीन काळी (अखंड भारत) कानाकोपर्यांत शिक्षणाची असंख्य केंद्रे वसलेली होती. अगदी लहान-लहान विद्याकेंद्रे तर किती होती, त्याची गणतीच नाही. यातील बहुतांशी विद्याकेंद्रे आसुरी वृत्तीच्या धर्मांध मुसलमान आक्रमकांनी उद्ध्वस्त करून टाकली. ज्ञानकेंद्रांच्या या अपरिमित हानीचे दुष्परिणाम आपण आजही पदोपदी भोगत आहोत. प्राचीन भारत हा शिक्षण क्षेत्रात अग्रेसर होता. भारतीय शिक्षणपद्धत जगमान्य होती. आजसारखी तरुण पिढी तेव्हा उच्च शिक्षण घेण्यास विदेशात तर जात नव्हतीच, उलट विदेशातून असंख्य जिज्ञासू ज्ञानार्जन करण्यासाठी भारतीय विद्यापीठात येत असत.
 
 
V1
 
तक्षशिला विद्यापीठ
Ancient University of India : ‘तक्षशिला’ विद्यापीठाला ‘भारताची बौद्धिक राजधानी’ म्हणून देखील संबोधले जाते. तक्षशिला हे जगातील पहिले विद्यापीठ मानले जाते. आजच्या पाकिस्तानात (रावळपिंडीपासून 18 मैल उत्तरेकडे) असलेले हे विद्यापीठ इसवी सनाच्या 700 वर्षे पूर्वी स्थापन करण्यात आले. पुढे इसवी सन 455 मध्ये पूर्व युरोपच्या आक्रमकांनी अर्थात् हुणांनी ते नष्ट केले. जागतिक स्तरावर ख्याती असलेल्या या विद्यापीठाने अंदाजे 1200 वर्षे ज्ञानदानाचे प्रचंड मोठे कार्य केले. श्रेष्ठ आचार्यांची परंपरा निर्माण केली. अनेक जगप्रसिद्ध विद्यार्थी दिले. तक्षशिला विद्यापीठ बंद पडल्यानंतर काही वर्षांतच मगध राज्यात (आजच्या बिहारमध्ये) नालंदा विद्यापीठ स्थापन झाले. ही दोन्हीही नामवंत विद्यापीठे एकाच वेळी कधीही कार्यरत नव्हती. असे म्हणतात की, तक्षशिला या नगरीची स्थापना भरताने आपल्या मुलाच्या म्हणजे तक्षाच्या नावावर केली. पुढे येथेच विद्यापीठ स्थापन झाले. जातक कथांमध्ये तक्षशिला विद्यापीठाविषयी बरीच माहिती मिळते. या कथांमध्ये 105 ठिकाणी तक्षशिला विद्यापीठाचे संदर्भ मिळतात. त्या काळात म्हणजे अंदाजे 1 सहस्र वर्षे तक्षशिला ही संपूर्ण भरतखंडाची बौद्धिक राजधानी होती. तिची ही ख्याती ऐकूनच आर्य चाणक्यसारखे विद्वान मगध (बिहार) येथून इतक्या दूर तक्षशिलेला आले. ‘सुसीमजातक’ आणि ‘तेलपत्त’ बौद्ध ग्रंथात याविषयी तपशील मिळतो.
 
 
तक्षशिला विद्यापिठातील चिकित्सा शास्त्राचे प्रगत केंद्र होते. इसवी सनाच्या 500 वर्षांपूर्वी, जेव्हा चिकित्सा शास्त्राचे नावही जगात कुठेच नव्हते, तेव्हा तक्षशिला विद्यापीठ हे चिकित्सा शास्त्राचे फार मोठे केंद्र मानले जात होते. येथे 60 हून अधिक विषय शिकवले जात होते. एकाच वेळी 10 सहस्र 500 विद्यार्थ्यांना शिकण्याची सोय होती.
 
 
विद्यार्थ्यांची उज्ज्वल परंपरा
या विद्यापीठाच्या स्थापनेनंतर म्हणजेच इसवी सनापूर्वी 700 वर्ष, येथून शिकून गेलेला पहिला जगप्रसिद्ध विद्यार्थी म्हणजे पाणिनी ! त्यांनी पुढे संस्कृत भाषेचे व्याकरण सिद्ध केले. इसवी सनापूर्वी 6 व्या शतकात चिकित्सा शास्त्र शिकलेला जीवक (किंवा जिबाका) हा पुढे मगध राजवंशाचा राजवैद्य झाला. त्याने अनेक ग्रंथ लिहिले. इसवी सनापूर्वी 4 थ्या शतकातील अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणजे आर्य चाणक्य, जे पुढे ‘कौटिल्य’ नावाने प्रसिद्ध झाले.
 
 
Ancient University of India : चिनी प्रवासी आणि विद्यार्थी ‘फाहियान’ हा वर्ष 405 मध्ये तक्षशिला विद्यापीठात आला. हा काळ या विद्यापीठाचा पडता काळ होता. पश्चिमेकडून होणार्‍या आक्रमकांच्या संख्येत वाढ झाली. अनेक आचार्य विद्यापीठ सोडून गेले. फाहियानने तसे लिहून ठेवले आहे. पुढे सातव्या 7 व्या शतकात तक्षशिला विद्यापीठाची महती ऐकून आणखी एक चिनी प्रवासी ह्युएन-त्सांग अथवा युआन श्वांग तेथे गेला. त्या वेळी त्याला विद्याभ्यासाची कसलीही खूण तेथे आढळली नाही.
 
 
विक्रमशील विद्यापीठ (बिहार)
Ancient University of India : आठव्या शतकातील बंगालचा पाल वंशीय राजा धर्मपाल यानेे या विद्यापीठाची स्थापना आजच्या बिहार येथे केली होती. या विद्यापीठाच्या अंतर्गत 6 विद्यालये होती. प्रत्येक विद्यालयात 108 शिक्षक होते. 10 व्या शतकातील प्रसिद्ध तिबेटी लेखक तारानाथ यांनी या विद्यापीठाचे विस्तृत वर्णन केलेले आहे. या विद्यापीठात प्रत्येक द्वाराला एक-एक प्रमुख आचार्य नियुक्त होते. नवीन प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्याची आचार्य परीक्षा घ्यायचे. त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच विद्यापीठात प्रवेश मिळत असे. हे आचार्य होते - पूर्व द्वार - पं. रत्नाकर शास्त्री, पश्चिम द्वार - वर्गाश्वर कीर्ती, उत्तर द्वार - नारोपंत आणि दक्षिण द्वार प्रज्ञाकर मित्रा. यातील नारोपंत हे महाराष्ट्रातून आलेले होते. आचार्य दीपक हे विक्रमशील विद्यापीठाचे सर्वाधिक प्रसिद्ध आचार्य आहेत.
 
 
Ancient University of India : 12 व्या शतकात येथे 3 सहस्र विद्यार्थी शिकत होते. हा या विद्यापीठाचा पडता काळ होता. पूर्वेत आणि दक्षिणेत मुसलमान आक्रमक पोहोचत होते अन् भारतातील ज्ञानाची साधने आणि स्थाने उद्ध्वस्त करीत होते. म्हणूनच उत्खननात जे अवशेष सापडले आहेत, त्यावरून असे लक्षात येते की, या विद्यापीठाच्या मोठ्या सभागृहात तब्बल 8 सहस्र लोकांची बसायची व्यवस्था होती! या विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांमध्ये तिबेटी विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक होती. बौद्ध धर्माच्या ‘वज्रयान’ संप्रदायाच्या अभ्यासाचे हे महत्त्वाचे आणि अधिकृत केंद्र होते. नालंदा विद्यापीठ उद्ध्वस्त झाल्यानंतर अंदाजे 6 वर्षांनी म्हणजेच वर्ष 1203 मध्ये नालंदा जाळणार्‍या बख्तियार खिलजीने हे विद्यापीठ देखील जाळून टाकले ! 
 
(संकलित)