वेध
- सुनील काथोटे
'Hit and Run' : ‘हिट अॅण्ड रन’ म्हणा किंवा ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ म्हणा... पुण्यातील अलिकडच्या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. बापाच्या पैशाची उधळपट्टी कशी करायची, इतकेच नाही, तर बड्या बापाचा मुलगा म्हणून समाजात कसे वावरायचे, हे प्रख्यात उद्योगपती विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने नुकतेच दाखवून दिले आहे. ‘हम तो ऐसेही जियेंगे... लोग मरे तो मरे...’ हीच या लोकांची मानसिकता झालेली आहे. पुण्यातील हे प्रकरण काही पहिले नाही. देशात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आणि यात अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. यात यांचं काहीच जात नाही. दारूचे दोन-चार पेग पोटात रिचवायचे आणि त्या नशेत जणू रस्ता आपल्याच बापाचा आहे, अशा तोर्यात बेदरकारपणे गाडी चालवायची. समोर कुणी आहे की नाही, हेदेखील बघायचे नाही. जो समोर येईल, त्याला उडवायचे. आपला गुन्हा पोटात घालण्यासाठी, कायद्याच्या कचाट्यातून आपल्याला सोडविण्यासाठी बापाजवळ भरपूर पैसा आहे, अशी पक्की मानसिकता या लोकांची झालेली असते. मात्र, अशा मस्तीभरल्या मानसिकतेत ज्यांना आपले स्वकीय गमवावे लागतात, त्यांच्यावर कोणती परिस्थिती ओढवली असेल, त्यांच्या घरात काय स्थिती असेल, याचा विचारही या लोकांच्या मनात येत नसतो. त्यांना तर फक्त त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगायचे असते.
'Hit and Run' : या घटना घडतच राहणार. कारण अमक्याला दारूच्या नशेत कारवर नियंत्रण ठेवता आले नाही, पण मी तर कार चालविण्यात एकदम निष्णात आहे, असे या पिढीतील प्रत्येकालाच वाटत असते आणि याच विचारात ते वावरत असतात. अशा घटना वारंवार घडत असतात, निष्पाप जीव उद्ध्वस्त होतात. त्यातच, जर असा गुन्हा करणारा अल्पवयीन असेल तर कायदाही त्याला आवश्यक ते संरक्षण देत असतो आणि नेमका हाच भाग या लोकांची मानसिकता वाढीसाठी कारणीभूत ठरत असतो. येथे मला कायद्यावर बोट ठेवायचे नाही, पण असा गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगारांना कायमची अद्दल घडावी, अशी काही तरी तरतूद कायद्यात असावी, असे वाटते. केवळ बालसुधारगृहात पाठवून मुख्य उद्देश साध्य होईल, असे वाटत नाही. कारण, आपल्याला येथे फक्त अडीच-तीन वर्षेच काढायची आहेत. त्यानंतर अमाप संपत्ती आपली वाट पाहत आहे, याची जाणीव त्यांना असते. या बालसुधारगृहातील वास्तव्यातही पैशाचे भूत त्यांच्या मनात थैमान घालत असते.
पुणे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला तर आजोबाच्या वचनामुळे बाल सुधार न्यायालयाने तत्काळ जामीनही मंजूर केला होता. मात्र, त्यामुळे समाजात निर्माण झालेला रोष पाहता, न्यायालयाला काही तासांतच आपला निर्णय बदलवावा लागला होता. मुलाची शिक्षा वडिलांना मिळाली. सध्या या मुलाचे वडील कारागृहात आहेत. ही कारवाई योग्यच म्हणावी लागेल. भविष्यात पुन्हा कोणतेही वडील पैशाच्या मस्तीतून आपल्या मुलांना मोकाट सोडणार नाही आणि त्यांचे नको ते लाड पुरविण्याचे धाडस करणार नाही.
'Hit and Run' : आता तो अल्पवयीन आरोपी बालसुधारगृहात असला, तरी त्याच्या बेदरकारपणामुळे ज्याचा जीव गेला, तो तर कधीच परत येणार नाही आणि आपली प्रिय व्यक्ती गमवावी लागल्याने ज्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला, त्यांचे दु:ख कधीच पुसता येणार नाही. या घटना रोज घडतात, दररोज कुणावर तरी दु:खाचा डोंगर कोसळतो... तो रोखण्यासाठी मात्र कायमस्वरूपी उपाय कुठेच सापडत नाही. अशा लोकांना ज्या इस्पितळात अपघातग्रस्त रुग्ण उपचार घेत आहे तेथे त्यांची सुश्रुषा करण्याची शिक्षा द्यायला हवी किंवा मग ज्या घरची व्यक्ती अपघातात गमावली गेली आहे त्या घरच्यांसोबत राहण्याची आणि त्यांची सेवा करण्याची शिक्षा द्यावी, यातून एक नवा आदर्श समाजापुढे उभा राहू शकतो. या घटनेमुळे आणखी एक घटना सहजपणे डोळ्यापुढे आली. या घटनेत ज्या व्यक्तीला आपला अल्पवयीन मुलगा गमवावा लागला, ती व्यक्ती अजूनही सुस्थितीत आलेली नाही. नागपूर येथून प्रकाशित होणार्या ‘दैनिक तरुण भारत’मध्ये ती व्यक्ती वरिष्ठ उपसंपादक आहे. त्या व्यक्तीचा 18 वर्षांचा मुलगा आर्यन जोशी असाच रात्री उशिरा आपल्या मित्रांसह घरी जात असताना भरधाव कारने त्याच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, जागेवरच तो ‘ब्रेन डेड’ झाला होता. या धडक देणार्या कार चालकाला पोलिस अजूनही शोधू शकलेली नाही. हे पोलिसांचे अपयश म्हणावे की पैशाचे जुगाड करून आरोपीने कायद्याच्या कचाट्यातून स्वत:ला दूर ठेवण्यात यश मिळविले, हा चर्चेचा मुद्दा आहे.
- 9881717091