जिल्हा परिषद शाळेतील 470 विद्यार्थी प्राविण्यसूचीत

28 May 2024 20:15:19
गोंदिया, 
Zilla Parishad School : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यात गोंदिया जिल्हा परिषदेच्या एकूण 22 शाळेतील 470 विद्यार्थी प्राविण्यसूचीत आले असून 536 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांनी अभिनंदन केले आहे.
 

LSKAD 
 
जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात एकूण 22 माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमधून इयत्ता दहावीमध्ये एकूण 1358 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. जिल्ह्यातील जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बनाथर, काटी, सौंदड, नवेगावबांध, बोंडगावदेवी, गांगला शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तर 16 शाळांचा निकाल 90 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. उल्लेखनीय म्हणजे, बनाथर येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्वाधिक 42 विद्यार्थ्यांनी प्राविण्यसूचीत स्थान प्राप्त केले. त्याखालोखाल गोरेगाव येथील शहीद जान्या तिम्या माध्यमिक शाळेतील 40 विद्यार्थ्यांनी, सडक अर्जुनी येथील 38, सुकळी डाकराम येथील 37, एकोडी व परसवाडा येथील प्रत्येकी 36, वडेगाव येथील 31, तिरोडा येथील 27, देवरी 27, सौंदड 26, नवेगावबांध 17, काटी 14, दवनीवाडा येथील 12, कट्टीपार 9, आमगाव 6, ककोडी 2, अर्जुनी मोरगाव 9, बोंडगावदेवी 5, कावराबांध 10 व जिल्हा परिषद शाळा साखरीटोला येथील 11 विद्यार्थी प्राविण्यसूचीत आले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 266 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवत्ता वाढीस लागली असून त्याबद्दल विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
 
 
 
राज्यात सर्वत्र, खासगी शाळा महाविद्यालयाचे प्रमाण वाढले आहे. मात्र, ग्रामीण भागातील परिस्थिती पाहता शेतकरी, कामगारांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येच शिक्षण घेतात. या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषद प्रशासन कटीबध्द आहे. शैक्षणिक विकासासाबद्दल पालकांनी जागरूक राहावे, आपले पाल्य सुध्दा गुणवत्ता यादीमध्ये येवून मोठमोठ्या पदांवर जाऊ शकतात, असा आत्मविश्‍वास बाळगावा, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये व प्राथमिक शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांनी व्यक्त करून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Powered By Sangraha 9.0